आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकोशी मध्य लटपटीत अस्थिरता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


स्वत:ला आवडतं म्हणून किंवा फक्त भटकायचं म्हणून स्वत:साठी प्रवास करणाऱ्या बायका विरळाच. अलीकडे हे चित्रं जरासं बदलू पाहत असलं तरी अशा बायकांची संख्या मोजकीच आहे. प्रवासाला निघण्याचा उत्साह, तयारीची गडबड आणि मुक्कामी पोहोचल्यावर घरची काळजी, पुन्हा परतीच्या प्रवासाची ओढ अशा भावनांची गर्दी बायकांच्या मनात होत असते. अशा सगळ्या धांदलीत भटकंतीचा निखळ आनंद कुठे तरी मागेच राहून जातो...


प्रिय अव्वा 
मुद्दाम तुला उशिरा पत्र लिहितेय. कारणं देखील तशीच होती. 
तुझं पत्र आलं त्या आधीच फोनवर तुझ्या कूर्ग दौऱ्याबद्दल तू बोलली होतीस आणि त्यानंतर तूच जाणं रद्द केलंस तेही सांगितलंस. तुझ्याजवळ तेव्हा कारण नव्हतं, पण मला समजू शकतंय. या मधल्या काळात मी पण अगदी सेम याच मानसिकतेतून जातेय. तुला सांगू का अव्व्वा? आपण जेव्हा प्रवास करायचा म्हणून उत्साहाने पिशव्या भरतो तेव्हा आपल्या मनात त्या गावाचं चित्र असतं, तिथली निवांतता असते. आपल्या दैनंदिन कामांच्या धबडग्यात तो दोनतीन दिवसांचा बदल खुणावतो. म्हणून मग आपण उत्साही होतो. 


मात्र, खरी कसोटी आपल्या प्रवासाचा दिवस जवळ येतो तेव्हा असते. मला काय वाटतं सांगू का? म्हणजे बघ आपली तयारी सुरू असते आणि त्या वेळी घर मात्र अगदी स्थिर असतं. आपण बाहेर पडायच्या तयारीत असतो तेव्हा पडदे छान झुलत असतात, नेहमीची चिऊ पाण्याच्या भांड्यापाशी येऊन पाणी पीत असते, घड्याळाची  टिकटिक तशीच लयीत सुरू असते. टीव्हीत तशाच बातम्या गळत असतात. इतकंच काय, पण घरातली माणसंदेखील आपल्याला अच्छा म्हणून पुन्हा घरात टीव्ही तरी बघतील, जेवतील, झोपतील तरी. त्या वेळी आपण मात्र प्रवासात असतो. घरात नाही.

 

अव्वा, मी तुला आधीही बोलले होते बघ. मला हल्ली ही मध्य लटपटीतली अस्थिरता आवडत नाही. ताण येतो. पूर्वी त्या पौराणिक मालिकेतले देव लोकं डोळे मिटले की गायब होत आणि जिथं जायचं तिथं प्रकट होत. तशी एखादी सोय हवी. सगळ्या तडतडीतून निवांतपणा हवा वाटतो, पण घरातून पाय निघताना मन जड होतं. आणि सगळं करून जायचं तिथे गेल्यावरदेखील तिथून परतताना पुन्हा तीच भावना मनात येते. ठहराव हवा वाटतो अव्वे! अढळपद हवं आहे. जिथून आपल्याला कुणी हाकलून लावणार नाही असं एखादं मन मिळावं ही अपेक्षा फार मोठी आहे. पण जिथे आपली शांतता अक्षत राहील अशी जागा हवी असेल तर? ती आपल्याला घरात का नाही मिळत? घर आपलं असतं ना? घरातल्या सर्वांसाठी आपण त्यांच्या सोयी सहज देऊ करतो, मग घराला आपली गरज का कळत नसेल? संध्याकाळ होत आली की माझ्या मनात हेच विचार येतात. आणि मग इरावती कर्व्यांचा ‘वेड लागलेलं घर’ नावाचा लेख आठवतो. असं वाटतं इरावतीबाईंकडून काही काळासाठी ते घर मागून घ्यावं आणि मग आपणच घराला मोठ्यांदा सांगावं की, “ऐकताय ना भिंती, खिडक्या, दारांनो, मला निवांतपणे झोके घेत विविधभारती ऐकायचं आहे. अजिबात त्रास देऊ नका.” आणि मग खिडक्यांनी स्वत:हून झुळझुळ वारा देत झोका झुलवावा, दारांनी कुरकुर करू नये. घड्याळाने तर अगदी काही काल थांबून जावं आणि दुपारचा तेवढा प्रहर आपलं मन भरेपर्यंत तसाच गोठवून ठेवावा. अव्वे, कित्ती मजा येईल ना? असं खरं व्हायला पाहिजे. 

 

तुलाही कूर्गला जाताना असंच वाटलं होतं का? म्हणून तू जायचं रद्द केलंस का? सविस्तर लिही.
तुला एक सांगते, परवा स्टाफच्या सगळ्या बायका बोलत होत्या की आता कुठे तरी जाऊ या. मग एकेकीने काय काय आयडिया आणि जागा सांगितल्या. कुणाच्या मनात तिचं फार्म हाऊस होतं, तर कोणाच्या मनात वनभोजनाचा बेत होता. कोणी म्हणे अमकीच्या घरी जाऊ. पण सगळ्या एका मतावर ठाम होत्या की कुठेही गेलो तरी तिथे स्वयंपाक करायचा किंवा आपापल्या घरून एकेक पदार्थ करून न्यायचा. मी सुचवून पाहिलं की, अशी जागा शोधा जिथं फक्त आपण जायचं, चहा नाश्ता आणि जेवण सगळं आपल्याला तिथेच मिळेल. तेव्हा दोन सेकंद कोणी काहीच बोललं नाही आणि मग सगळ्या एकदम हो – हो म्हणाल्या. 


माझ्या सर्व सहकारी मैत्रिणींची अशा वेळी मला फार काळजी वाटते. त्यांच्या डोक्यातून स्वयंपाकघर निघतच नाही. आणि इतक्या वर्किंग वुमन म्हणून फुशारक्या मारत असलो तरी आपापल्या कार्यालयात भोजनाचे किंवा छोट्या मोठ्या संमेलनाचे दिवस आले तरी तो विभाग हटकून स्त्रियांकडे सोपवला जातो. मला कळतच नाही. विचारलं तर उत्तर मिळतं, ”बायका चांगलं करू शकतात. त्यांना सवय असते.” पण मग कधी तुम्हीही करून बघा की. असं बोललं ना तर खीखी हसतात!

 

मग मला खूप राग येतो. मोकळ्या मोकळ्या म्हणून आधुनिक म्हणून आयफोन वापरणाऱ्या स्त्रिया पाहिल्या तरी त्यांच्या पायातली अदृश्य बेडी स्पष्ट दिसायला लागते. अव्वे, आजूबाजूला घडत्या घटना आणि त्यात आपल्या मनातल्या विचार आणि अनुभवाची आवरणे चढून थरच्या थर तयार झालेत आणि त्याच्या एकत्रित सारणाचं कडबोळं तुला मी पाठवतेय लिहून. पण मला खात्री आहे की तुला सगळं पत्र नीट समजणार आहे. 


कूर्गला पुन्हा कधी जातेयस ते जरूर कळव आणि हो, माझ्यासाठी कॉफी सीड्स खरंच आण. साऊला निरोप दे असं म्हणणार नाही कारण अगं काय निरोप द्यायचा तिला? आनंदभाविनी बनणं सोपं नाहीय ना अव्वा?
आणखी काय? थांबते.
तुझी 
मी 
ता.क. – पु. शि. रेग्यांची सावित्री, रेणू, मनवा आता ओळीने वाचायला काढून ठेवते पुन्हा! कूर्गवरून सावित्री आणि त्यामुळे इतकं सगळं आठवलं. त्याचं क्रेडिट फक्त तुलाच. त्यासाठी तुला चोकोचिप्स आइस्क्रीम कोन देणार!

माधवी भट, चंद्रपूर
madhavpriya.bhat86@gmail.com 

 

बातम्या आणखी आहेत...