आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अपडेट’ असणं अत्यंत गरजेचं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माधवी कुलकर्णी

कुठल्याही धंद्यात अथवा व्यवसायात स्पर्धा असतेच. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तर ही स्पर्धा अधिकच जीवघेणी होत चालली आहे. अशा परिस्थितीत उद्योगात टिकून राहणं ही तारेवरची कसरत होऊन बसते. ज्या स्त्रिया पूर्णवेळ व्यवसायात असतात त्यांच्यासाठी तर हे अधिकच आव्हानात्मक बनते. मात्र उद्योगात टिकून राहायचं असेल, स्वत:चा ठसा उमटवायचा असेल तर स्वत:ला सतत अपडेट ठेवणं अत्यावश्यक असल्याचं, प्रिंटिंग व्यवसायातल्या लक्ष्मी देशपांडे यांना वाटतं...   
लक्ष्मी यांच्या माहेरी एकत्र कुटुंब पद्धती होती. संपूर्ण नंदाल कुटुंब प्रिंटिंग व्यवसायातच होतं. यांच्या घरातच प्रिंटिंग प्रेस होती. कागद, फाइल्स, शाई, मशिनरी, बाजारभाव, नफा, तोटा, गणितं ऐकतच लक्ष्मी मोठ्या झाल्या.  शालेय वयात त्या  वडलांना, काकांना व्यवसायात छोटी कामं मदत म्हणून करत. या मदतीच्या जोडीला निरीक्षण,परीक्षण, निरनिराळे अनुभव लक्ष्मी साठवून ठेवत. त्यातूनच त्यांचं या व्यवसायाबद्दल आकर्षण वाढलं. आणि या क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बारावीनंतर त्यांनी संगणकाचं प्रशिक्षण घेतलं. प्रिंटिंग व्यवसायात या नव्या तंत्रज्ञानाचा फायदा होईल ही दृष्टी ठेवून. काळानुरूप बदल करत त्यांच्या काकांनी संगणक ऑफसेट मशीन विकत घेतले. लक्ष्मी यांनीही डीटीपी,एमएस-सीआयटी शिकून घेतले. घरच्या व्यवसायात सुबकता आली. कामं पटापट होत गेली. लग्नपत्रिका, अहवाल, बुक बाइंडिंगची कामं मिळाली. या व्यवसायातले काम तातडीचे म्हणजे अर्जंट असते. ग्राहकाला ते चांगले, लवकर व वाजवी दरात हवे असते. हे सर्व ओळखून लक्ष्मी यांनी कामात तत्परता राखली. वेळप्रसंगी आर्थिक नुकसान, मनस्ताप, कष्ट सोसले पण जिद्द सोडली नाही. लग्नानंतर लक्ष्मी यांच्या सासरी  नोकरीचे वातावरण होते. लक्ष्मी यांचे मन व्यवसायात रमणारे. त्यांच्यापुढे प्रश्नचिन्हं उभे राहिले. पण पती, सासू, सासऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिल्यानं,लक्ष्मींना व्यवसायात पूर्ण लक्ष देता आले. हाती घेतलेले काम पूर्ण करूनच उठायचे, कामावर निष्ठा, प्रामाणिकपणा, कष्ट, तक्रारीचा सूर न लावणं, या गोष्टी त्या वडलांकडून शिकल्या. कच्चा माल खरेदी करणे, बँकेचे व्यवहार, हिशेब यातले सगळे बारकावेही लक्ष्मी स्वत:च हाताळतात. 

महिलांनी ‘अपडेट’ राहायलाच हवं 


अपडेट राहणं म्हणजे केवळ बाह्य व्यक्तिमत्त्वातला बदल मला अपेक्षित नाही. स्त्री नोकरी करणारी असो अथवा व्यवसाय-उद्योग करणारी असो. आपापल्या क्षेत्रातली सर्व अपडेट माहिती तिच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे असं मी मानते. त्यालाच मी अपडेट राहणं म्हणते. माझ्या व्यवसायासंदर्भातल्या मुद्रक व्यावसायिकांचे दरवर्षी संमेलन असते. त्याला मी आवर्जून उपस्थित राहते. त्यामुळे अनुभव कळतात. थोरामोठ्यांच्या भाषणातून शिकायला मिळते. नवीन ओळखी होतात. हा व्यवसाय आव्हानात्मक आहे. फार कमी संख्येने या क्षेत्रात स्त्रिया काम करतात. महिलांनी अधिकाधिक संख्येनं याही क्षेत्रात यावं, असं मला वाटतं. 

लेखिकेचा संपर्क : ९३४००६१८०६