आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोककलावंतांची मुलं!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोककलेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या लावणी कलाकरांची पुढची पिढी शिकून-सवरून स्वत:चा ठसा उमटवते आहे. अर्थात पालकांनी जपलेल्या लोककलेबद्दल त्यांना आदर आहेच. पण या पुढच्या पिढीला स्वत:चं अवकाश निर्माण करण्याची जिद्द आहे. 

 

लहानपणी सगळीच लहान मुले आईच्या मायेत, सावलीत वाढत असतात. आईकडे आपले हट्ट पुरवून घेत असतात अशा वयात मला माझ्या आईने आपल्यापासून दूर ठेवलं. शिक्षणासाठी हाॅस्टेलला ठेवलं. मला तेव्हा खूप वाईट वाटायचे. पण आईने शिक्षण घेण्यासाठी तुला हाॅस्टेलला राहावेच लागेल, असे सांगितले. तेव्हा मला आईचा खूप राग यायचा. काहीच करू नये, असे वाटायचे. आईपासून दूर जाऊ नये. आई सतत आपल्यासमोर असावी, असे वाटायचे. तेव्हा मी अवघा चार वर्षांचा होतो. अजून तोंडातून पूर्ण शब्दही येत नव्हते. बाेबड्या भाषेत आईला मला घरी ने म्हणून रडत सांगायचो. तेव्हा आईलाही खूप रडू यायचे. ती माझी समजूत घालायची, पण मी ऐकत नव्हतो. आता माझे शिक्षण पूर्ण होऊन माझी या पदावर निवड झाली तेव्हा हे सर्व आठवून मला माझ्या आईचा अभिमानच वाटतो. मला तेव्हा हे कधीच समजायचे नाही की आईने मला आपल्यापासून लांब का ठेवले? आता मात्र आईने तेव्हा घेतलेल्या निर्णयाचे महत्त्व मला जास्त चांगले कळते... हे शब्द आहेत यूपीएससीमध्ये निवड झालेले अमित काळे यांचे. 

 


नगर येथील प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी राजश्री काळे यांचे चिरंजीव अमित काळे यांनी यूपीएससीमध्ये २१२ रँक मिळवून कलेक्टर होण्याचे स्वप्न साकार केले. सध्या ते दिल्ली येथे प्रशिक्षण घेत आहेत. शिक्षणाचे महत्त्व जाणून अमित यांच्या आई राजश्री काळे यांनी आपल्या मुलाला बालवाडीपासून हाॅस्टेलला घालून शिक्षणाचे बाळकडू पाजले. आपल्या अवघ्या चार वर्षांच्या कोवळ्या मुलाला आपल्यापासून दूर करून शिक्षण घेण्यासाठी हाॅस्टेलला ठेवणे एवढे सोपे नव्हते. मात्र, राजश्री यांनी कोणत्याही माया, मोह व बंधनांना बळी न पडता आपल्या मुलाला उच्च शिक्षण घेण्यासाठी काळजावर दगड ठेवत आपल्यापासून दूर ठेवले. 

 


माझी आई राजश्री काळे या लावणी सम्राज्ञी व सिने कलावंत म्हणून प्रसिद्ध. गावोगावी कार्यक्रमासाठी आईला जावे लागे. वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत मी आईबरोबर कार्यक्रमांना गावोगावी जात असे. तेव्हा मला काहीच समजत नव्हते. नंतर मात्र आईने आपल्या कार्यक्रमांमुळे माझ्या शिक्षणाचे हाल होऊ नयेत म्हणून हाॅस्टेलला ठेवण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे, उच्च पदावर नोकरी करावी, मोठा सरकारी अधिकारी होऊन समाजासाठी काही तरी करावे हे आईचे  स्वप्न होते. त्यासाठी  आईनं अनेक गोष्टींचा त्याग केला. घरच्यांच्या विरोधात जाऊन मला हाॅस्टेलला ठेवण्याचा निर्णय तिने घेतला. कारण तोपर्यंत आमच्या कुटुंबातून शिक्षणासाठी घराबाहेर असे कोणी पडलेच नव्हते. शिक्षणाचा वारसा आमच्या कुुटुंबात नव्हताच. शिक्षणाचं महत्त्व नव्हतं.  माझ्या आईने हे महत्त्व लक्षात घेऊन मला शिक्षणासाठी प्रेरित केले. अनेकदा आर्थिक अडचणही यायची. आई आपल्या अनेक गरजा बाजूला ठेवून माझ्या शिक्षणासाठी पैसे पाठवायची. याची जाणीव मला असायची. त्यामुळे अनेकदा काटकसर करत आपल्या गरजा कशा कमी ठेवायच्या हे शिकलो. 

 


लहानपणी हाॅस्टेलमध्ये असताना मी आजारी पडलो की आई जवळ असावी असे वाटायचे. मात्र, हाॅस्टेलच्या नियमांमुळे आईला भेटता यायचे नाही. तिला मी आजारी आहे हे कळवले की तिलाही खूप वाईट वाटायचे. आपल्याला वाईट वाटले की आईलाही दु:ख होते हे कळू लागल्यावर मी आईला काही कळू नये याची काळजी घेत असे.  आईही  हे समजून घ्यायची. लहानपणीचा काळ खूप कठीण होता. दहावी झाल्यावर माझी जिद्द वाढली. अकरावी, बारावीचे शिक्षण पुण्यातील आपटे महाविद्यालयात घेतले. पुण्यातील व्हीआयटीतून इंजिनिअरिंग झाल्यावर मी यूपीएससीच्या परीक्षांची तयारी सुरू केली. दिल्लीला जाऊन अभ्यास सुरू केला. या काळात आईने खूप प्रोत्साहन दिले. यूपीएससीची परीक्षा देणाऱ्या तरुणांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप बनवण्यात आला होता. या ग्रुपला अनेक दिग्गज अधिकारी मार्गदर्शन करायचे. 

 


वेळेचे नियोजन, रात्रंदिवस अभ्यास करून २०१६ मध्ये मी परीक्षा दिली. त्यात असिस्टंट कमांडंटची (BSF) पोस्ट मिळाली. २०१७ मध्ये ८१२ रँक येऊन मला इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिसेसमध्ये (IDES) पोस्ट मिळाली. एवढ्या यशावर न थांबता २०१८ मध्ये परत परीक्षा दिली. त्यात २१२ रँक आला.  आयएएससाठी निवड झाली. त्याचे सध्या  दिल्ली येथे प्रशिक्षण सुरू असून आॅगस्टपासून मसूरी येथे प्रशिक्षणासाठी जाणार आहे.

 


माझ्या शैक्षणिक जीवनातील यशाची सर्वात माेठी प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे माझी आई आहे. तीच माझा आदर्श आहे. एक लावणी सम्राज्ञी म्हणून ती यशस्वी आहेच, त्याच बरोबर चित्रपटातील कामाबद्दल राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिचा गौरव झाला आहे. लावणीच्या क्षेत्रात जपान, अमेरिका, इंडोनेशिया, न्यूझीलंड येथे माझ्या आईने कार्यक्रम केले. तिने राज्य शासनाच्या मार्फत तेथे लावणीचे प्रशिक्षण दिले, ही माझ्यासाठी खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. माझ्या आईच्या जिद्दीमुळे, तिच्या त्यागामुळे, प्रोत्साहनामुळे मी या पदापर्यंत पोहोचू शकलो, ही बाब मी विसरू शकणार नाही. मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यासाठी मी प्रयत्न सुरू ठेवले. बारावीनंतर याची तयारी करणे आवश्यक असते. मात्र, याचे मार्गदर्शन मला नंतर मिळाले. अनेक जणांकडून मला ही परीक्षा अवघड असून यात यश मिळणे शक्यच नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, मला आत्मविश्वास होता की आपण यात यश मिळवू शकू. इतरांच्या सांगण्यावरून प्रयत्न करणे न सोडता अभ्यासातील सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शनामुळे ही परीक्षा उत्तीर्ण होता येते हाच युवा पिढीसाठी माझा संदेश आहे.

 

माधवी कुलकर्णी
लेखकाचा संपर्क : ९३४००६१८०६

बातम्या आणखी आहेत...