आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचतीची करा योग्य गुंतवणूक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बचत आणि गुंतवणुकीमध्ये फक्त नोकरदार महिलांनी लक्ष घालावं असा एक गैरसमज आहे. नवऱ्यासोबत जॉइंट अकाउंट असण्यातच गृहिणी धन्यता मानतात. मात्र बचत आणि गुंतवणुकीचा संबंध गृहिणींशीही असतोच. एकुणातच महिला, बचत आणि गुंतवणुकीचा विविध अंगांनी आढावा घेणारा माहितीपूर्ण लेख. नोकरदार महिला असो किंवा गृहिणी, या सर्वांनी बचत आणि गुंतवणुकीबद्दल जागरूक असायला हवं. जेणेकरून महिलांना किंवा त्यांच्या कुटुंबाला भविष्यात कुठल्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. त्या दृष्टीनं उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरू शकणाऱ्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल.

जमाखर्चाचं ताळतंत्र
प्रत्येक महिन्यासाठी स्त्रियांनी स्वत: असं स्वतंत्र आणि व्यक्तिगत बजेट तयार करायला हवं.  आपल्या गरजा आणि इच्छा यातलं अंतर समजून घेऊन मगच खर्च करावा. अनावश्यक खर्च असा काटेकोरपणे दीर्घकाळापर्यंत टाळल्यास मोठी बचत करता येऊ शकते. जर महिलांच्या नावावर स्वतंत्रपणे बँक खातं नसेल अथवा फक्त नवऱ्यासोबत जॉइंट अकाउंट असेल तर प्रत्येक महिलेनं सरकारी बँकेत स्वत:चं स्वतंत्र बँक खातं सुरू करावं. 

बचत आणि नियमित गुंतवणूक
अधिकाधिक बचत करण्याचा प्रयत्न करा. तुमची ही बचत नियमितपणे योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची सवय लावून घ्या. तुम्ही तुमच्याजवळ जितकी रोख रक्कम बाळगाल तितका तो पैसा खर्च होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी महिन्याच्या सुरुवातीलाच गुंतवणूक करा. नियमित डिपॉझिटच्या स्वरूपात  रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी,  पीपीपीएफ, सुकन्या समृद्धी, एनपीएस आणि एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय असू शकतो. 

गुंतवणूक ध्येय निश्चित करा 
गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचं गुंतवणुकीचं उद्दिष्ट निश्चित करा. बचत नेमक्या कुठल्या कारणासाठी करायची याची स्पष्टता तुम्हाला असायला हवी. तरच बचतीसाठी आवश्यक रक्कम आणि गुंतवणुकीचा कालावधी याबद्दल तुम्ही ठाम निर्णय घेऊ शकाल. निवृत्तीनंतर नियमित पेन्शन मिळण्यासाठी तुम्ही बचत करत असाल तर  एनपीएस निवडू शकता. मुलीचं लग्न अथवा शिक्षणासाठी ‘सुकन्या’ घेऊ शकता. मुलाचं शिक्षण अथवा अन्य दीर्घकालीन आवश्यकतांसाठी पीपीएफए, एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडातली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. 

कंटिंजेन्सी फंड
जर तुम्हाला छोट्या अथवा मध्यम कालावधीमध्ये पैशाची आवश्यकता पडणार असेल तर तुम्ही आरडी, एफडी, एनएससी, लिक्विड फंड यामध्ये गुंतवणूक करू शकता.  अशा योजनांमध्ये गुंतवलेला पैसा, तातडीची आवश्यकता भासल्यास तुम्ही उपयोगात आणू शकता.  

भेट स्वरूपातील रोख रक्कम
जर तुम्हाला कुटुंबातील अथवा परिचितामधील एखाद्या व्यक्तीकडून मोठ्या स्वरूपातील रोख रक्कम भेट स्वरूपात मिळाली असेल तर ही रक्कम सुकन्या, पीपीएफसारख्या योजनांमध्ये गुंतवा. अशा योजनांवर कर आकारला जात नाही. मात्र, या योजनांच्या माध्यमातून इतर योजना अथवा एफडीच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्नावर कर आकारला जातो. कराच्या रचनेनुसार हा कर आकारला जातो. 

सोन्यातली गुंतवणूक
बहुतांश महिला सोन्यामधील दागिन्यांच्या गुंतवणुुकीला पसंती देतात. मात्र दागिने अथवा धातुरूपातील सोनं हा गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय नाही. गुंतवणुकीसाठी सॉवरेन गोल्ड बाँड आणि गोल्ड ईटीएफसारख्या पर्यायांचा विचार करा. सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. जसे की, यावर प्रतिवर्षी २.५ टक्के व्याज मिळतं, आठ वर्षांनंतरच्या मॅच्युरिटीनंतर रिडीम केल्यावर कॅपिलटल गेन टॅक्समध्ये सूट मिळते. शिवाय मेकिंग चार्जेसही आकारले जात नाहीत. 

विमा
हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम पॉलिसीचा गुंतवणुकीसाठी जरूर विचार करावा. जर कुटुंबात कुणी तुमच्यावर अवलंबून असेल तर टर्म इन्शुरन्ससुद्धा घ्या. दुर्दैवानं तुमच्याबाबत एखादी  वाईट  घटना घडल्यास परिवाराला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही. पुरुषांच्या तुलनेत महिलांचं आयुर्मान अधिक असल्यानं महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी प्रीमियम भरावा लागतो. 

टॅक्स 
ज्या नोकरदार महिलांचं उत्पन्न हे करदेय उत्पन्न असतं त्यांनी गुंतवणूक करताना टॅक्सचाही विचार करावा.  नवरा किंवा कुटुंब सदस्यांशी विचारविनिमय करून गुंतवणुकीची एखादी उत्तम योजना बनवता येऊ शकते. गुंतवणुकीचे काही प्रकार आणि खर्च असे असतात की ज्यावर पती-पत्नी दोघांनाही कर सवलत मिळू शकते. याबद्दल माहिती नसल्यास तज्ञांचा सल्ला घेऊनच गुंत‌वणुकीचं नियोजन करा.  

बातम्या आणखी आहेत...