Home | Magazine | Madhurima | Madhurima Article 'Yes, I like men'

होय, मला पुरूष आवडतात

अनामिका | Update - May 14, 2019, 12:16 AM IST

पण नाव उघड न करता का होईना स्त्रीला या विषयावर प्रामाणिकपणे व्यक्त व्हावं वाटतंय हे महत्त्वाचं नाही का?

  • Madhurima Article 'Yes, I like men'

    शीर्षक वाचून अनेकांची उत्सुकता चाळवली असेल. लेख वाचून भुवया उंचावतील. पण नाव उघड न करता का होईना स्त्रीला या विषयावर प्रामाणिकपणे व्यक्त व्हावं वाटतंय हे महत्त्वाचं नाही का?

    मी एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये कामाला आहे. १५ वर्षांपूर्वी अरेंज मॅरेज झालेय. दोन मुलंही आहेत. मी आतापर्यंत पुणे, मुंबईतल्या कंपन्यांमध्ये काम केलेय. माझी घरची परिस्थिती बेताची. जबाबदारीच्या ओझ्याने स्वप्न, इच्छा या साऱ्यांना मी लहानपणीच तिलांजली दिली. जबाबदारीने मनावर इतका खोल आघात झालेला की, मी माझ्या मैत्रिणींमध्ये कधीच वावरत नसे. एकटीच, माझ्या वाटेने जायला आवडायचे. मैत्रिणीही मला टाळायच्या. मित्रांचा तर प्रश्नच नव्हता. माझं कॉलेज लाइफही असंच एकट्याने गेलेलं. माझं ग्रॅज्युएशन छोट्या शहरात झालं. नंतर पुण्यासारख्या मोठ्या शहराची माझी ओळख झाली. पोस्ट ग्रॅज्युएशन तिथनंच मी पूर्ण केलं. वय वाढल्यावर मन अधिक हळवं होतं म्हणतात. तसं माझं पुण्यात झालं. ज्या वयात मुली जोडीदाराची स्वप्न रंगवतात त्या वयात मी पुस्तकात गढून जायचे. पण आता मला जाणवत होतं.. माझं काही तरी चुकलंय, चुकतंय. पण उमगत नव्हतं. मग एक पुस्तक हाती लागलं. प्रेमाची ओळख या पुस्तकाने मला करून दिली. मी. गडबडले. सल्ला घ्यायला जवळची एकही मैत्रीण नव्हती. अवघ्या १० मिनिटांत अंघोळ करून साघी पावडरही न लावता बाहेर पडणारी मी आता आरशासमोर अधिक वेळ घालवू लागले. मलाच उमगेना मला काय झाले? पुण्यात कंपनीत नोकरी लागली. माझा पहिलाच जॉब. तिथंही मुलींच्या घोळक्याला टाळत माझं पुरुष सहकाऱ्यांमध्येच वावरणं अधिक. मला ते चांगलं वाटायला लागलं. रूमवर आल्यावरही मी त्यांच्याशी बोलत. कधी माझ्या भूतकाळावर, तर कधी भविष्यावर. त्यातला एक इतका जवळचा मित्र की, त्याच्याशी बोलल्याशिवाय दिवसच सरत नसे. आजही सरत नाही. आम्ही लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. त्याला माझ्या भावना बोलून दाखवल्या. तोही तयार झाला, पण जात आडवी आली. कधी नव्हे ते मिळालेलं प्रेम क्षणात परकं झालं. आयुष्याशी तडजोड करत पुन्हा स्वप्नांना तिलांजली दिली. आम्ही दोघांनीही तो जॉब सोडला. आता दोघेही आपापल्या मार्गी लागलेलो. कुटुंबाने लग्न निश्चित केलं. माझं लग्न झालं. नवीन कंपनीमध्येही मला महिला सहकाऱ्यांपेक्षा पुरुष सहकाऱ्यांमध्येच अधिक वावरायला आवडते. त्यांची वैचारिक भूमिका, विचार करण्याची पद्धत महिलांच्या तुलनेत अधिक चांगली वाटते. त्यांची निर्णय घेण्याची क्षमता, सहकार्याची भावना चांगली वाटते. आज लग्नाच्या १५ वर्षांनंतरही वेळ मिळेल तसं माझ्या जुन्या, नव्या मित्रांशी बोलते. का? हा प्रश्न माझ्यासाठी कधीच महत्त्वाचा नव्हता. काहींनी माझ्या बोलण्याचा त्यांच्या पद्धतीने अर्थ लावला.


    नवीन मित्र जोडायला मला आवडतं. त्यांच्याशी बोलायला. त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायला आवडते, पण त्यांच्यात मी गुंतत नाही. महिला सहकारी माझ्या अपरोक्ष माझ्या या पुरुषी मैत्रीवर टीका करतात. कुटुंबातही माझी अशीच चर्चा होते, पण मी माझ्या मर्यादेत आहे. मी माझ्या मनासाठी माझ्या भूमिकेवर कायम आहे. म्हणूनच खंबीरपणे म्हणतेय. हो, मला पुरुष आवडतात. कुणाला याचा काय अर्थ काढायचा ते काढा...

Trending