आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुबनीनं जपलेलं पर्यावरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारमधील मधुबनी जिल्हा ओळखला जातो तो पारंपारिक चित्रकलेसाठी. पण मधुबनी ही केवळ चित्रकला नाही. महिलांचं आणि एकूणच मानव जातीची निसर्गाशी असलेली नाळ घट्ट करणारं ते प्रतीक आहे. या जिल्ह्यातल्या महिलांच्या आसपासचा निसर्ग त्यांच्या कलेत डोकावतो तो केवळ कला म्हणून नाही. तो निसर्ग त्यांनी स्वत:च्या जगण्यातही फुलवला आहे. बिहारमधल्या या मागास भागाला कलेच्या माध्यमातून गावातल्या महिलांनी आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिलीय. हजारो महिलांना स्वावलंबनाची वाट सापडली आहे. परंपरा, कला आणि पर्यावरण रक्षण या सर्वच महत्त्वाच्या मुद्द्यांचा संगम साधणाऱ्या कलेची ओळख उद्याच्या पर्यावरण दिनानिमित्त...  


बिहारमधे २०१२ ला महामार्ग रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात आलं होतं. या रुंदीकरणासाठी अनेक झाडांची कत्तल सुरू होती. मात्र, मधुबनी जिल्ह्यातल्या महिलांनी झाडांची कत्तल रोखण्यासाठी मधुबनी चित्रकलेचा आधार घेतला. कलेच्या माध्यमातून त्यांनी यंत्रणेविरुद्ध उठाव केला. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या १००० पेक्षा जास्त झाडांवर त्यांनी रेखीव मधुबनी चित्रे साकारून वृक्षतोड थांबवण्याचा संदेश दिला. कत्तल रोखण्यासाठी मुद्दामच देव-देवतांची चित्रे साकारली. त्यांच्या या सामूहिक प्रयत्नांमुळे वृक्षांना जीवदान मिळालं. 


१६ व्या शतकातली मधुबनी लोककला मुख्यत्वे महिलांनी जोपासली. नावारूपास आणली. लग्नसमारंभ, सणवारानिमित्त मधुबनी जिल्ह्यातल्या महिला घराच्या भिंती, जमिनीवर ही चित्रे रेखाटत असत. यास ‘अरिपन ’ संबोधले जात. फळं-फुले-झाडांची पाने,साले अशा नैसर्गिक घटकातूनच रंगांची निर्मिती करून ही चित्रे रंगवली जात. आता मात्र कागद, कॅन्व्हास, कापड यावर ही कला बहरतेय. दिवाणखान्याच्या भिंतींवर वॉलहँगिंग, लाकडी फर्निचर, साड्या, कुशन कव्हर्स, बेडशीट्सवर मधुबनी चित्रांची किमया दिसते. मधुबनी चित्रकला आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेली असली तरी कलेचा आत्मा महिला आणि निसर्ग हाच आहे. 

 

निसर्ग, महिला केंद्रस्थानीे

पूर्वी महिलांना आर्थिक,सामाजिक स्वातंत्र्य नव्हते. चूल आणि मूल हेच त्यांचे विश्व होते. मात्र, या परिस्थितीतही बिहारसारख्या अविकसित राज्यातील मधुबनीतल्या महिलांनी ही कला आत्मसात केली. त्यांच्या चित्रांमध्ये उखळीमध्ये धान्य कांडणारी, फुले वेचणारी, डोक्यावर पाण्याचे हांडे वाहणारी, तर कधी चुलीवर स्वयंपाक करणारी महिला, बाजारात मासे विकायला निघालेली म्हणजेच सतत कामात व्यग्र असलेली महिला दिसते. या महिलांनी त्यांचे भावविश्व, त्यांची स्वप्ने सांगण्यासाठी या चित्रांचा आधार घेतला. रामायण, महाभारतातील प्रसंग असो अथवा देव-देवतांची चित्रे, विषय, प्रसंग, व्यक्तिरेखा कोणताही असो निसर्ग त्यात आहेच.
 

 

पर्यावरण संवर्धन संदेश

पाना-फुलांनी बहरलेलं झाड, झाडांवर बसलेले पक्षी, पाण्यात विहार करणारे मासे, फळांनी लगडलेल्या झाडांवर बसलेले मोर, पोपट, जंगलात फिरणारे डौलदार हत्ती, शेतात काम करणारे बैल, ऊर्जेची देवता असलेला सूर्य असे आनंदाने नांदत असलेला निसर्ग या चित्रांमध्ये दिसतो. मधुबनीमधलं हे चित्रण पाहून, सेवा मिथिला या स्थानिक कलाकारांच्या सामाजिक संस्थेनं या कलेतून निसर्ग संवर्धनाच्या संदेशाचा जोमाने प्रसार करण्यासाठी पुढाकार घेतलाय. लहान गावांमधील विधवा महिला, आर्थिक पाठबळ नसलेल्या महिला यांना हाताशी धरून याच कलेतून महिलांच्या आरोग्य, शिक्षण, हक्क यासंदर्भातील प्रश्नांना चित्रांमधून वाचा फोडण्याचे, जनजागृतीचे कामही सुरू आहे. 
 

 

आर्थिक स्वयंपूर्णतेचा मार्ग

सीता देवी, गंगा देवी, महासुंदरी देवी, जगदंबा देवी, भारती दयाल, पुष्पा कुमारी, महालक्ष्मी, दुलारी देवी, शशिकला देवी, यमुना, चंद्रकला देवी, शांती देवी, अंबिका गोदावरी दत्ता, मनीषा झा, मालविका राज, विदुषनी प्रसाद यासाऱ्याजणी मधुबनी पेटिंग हे स्थानिक महिलांसाठी स्वावलंबनाचा मार्ग व्हावा म्हणून  प्रचंड मेहनत घेत आहेत. हजारो महिला आज मधुबनी चित्रकलेमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. दरभंगा या अशाच एका लहानशा गावातील ४५ महिलांनी बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेस रेल्वे गाडीचे २० डबे मधुबनी चित्रांनी सजवले. यातही निसर्गाची रंगपंचमी साकारली गेली आहे. युनायटेड नेशन्सनेही या महिलांच्या या प्रयत्नांना कौतुकाची थाप  दिली आहे. 
 

 

निसर्ग नाही, जीवन नाही

निसर्गाशिवाय नुसते चित्रच नाही, तर जीवनाचीही हे कलाकार कल्पना करू शकत नाही. त्यांना निसर्गाचे अवतीभोवती असणे, त्याचे बहरणे याचे महत्त्व केव्हाच कळले आहे. मधुबनी चित्रांमध्ये दिसणारा निसर्ग आपल्या सर्वसामान्यांनाही साद घालतोय. मधुबनी चित्रांमधील हा निसर्ग एक कलाकार म्हणून आपण कागद, कपडे, कॅन्व्हासवर साकारूच, परंतु प्रत्यक्षात आपल्या अवतीभोवती तो असा हसता-खेळता राहिला तर खऱ्या अर्थाने या कलेचे चीज होईल. ती जबाबदारी फक्त मधुबनी महिला कलाकारांचीच नाही, तर आपल्या साऱ्यांचीच आहे.

 

बातम्या आणखी आहेत...