आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखंड लिहीत जावे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक आहे मनी. रोजच्या जगण्यातले इतरांच्या दृष्टीने छोटे पण त्यांना महत्त्वाचे वाटणारे, ती तिच्या जिवलग मैत्रिणीला, अव्वाला, पत्रातून सांगणार आहे. आणि त्यावर अव्वा तिला उत्तर लिहिणार आहेत. त्या दोघींच्या पत्रांचा संग्रह म्हणजे हे नवीन सदर. 

 

प्रिय अव्वा 
रागावली होती ना मी तुझ्यावर, त्यामुळे बोलणार नव्हते चकार शब्दही! पण मी मूर्ख असल्या कारणाने लग्गे तुला लिहायला घेतलं. काल तू फोन करते म्हटलेली पण फोन काय करायला नाही म्हटल्यावर मलाच आता हे पाऊल उचलावं लागलं. त्यासाठी खरं तर चार ओळी खरडायला घेतल्या आहेत. पण त्याला पाऊल गिऊल उचलावं लागलं म्हटलं की वजन प्राप्त होतं, असं मी कधीकाळी अभ्यास करताना वाचलं होतं. मोठ मोठे निर्णय घेतात तेव्हा निर्णय घेतला असं न म्हणता पाऊल उचललं असं म्हणतात ते यासाठीच. 

 

अव्वा, तूच सांग, आपलं काही बोलणं होतं का? आता लग्गे असं म्हणून नकोस की, ‘सक्काळ डोळे उघडल्यापासून जो गुड मॉर्निंग घातला की दिवसभर पट्टा सुरूच असतोय ते थेट रात्री गुड नाईट होतपर्यंत!’ फोनवर मेसेज पाठवणं म्हणजे काय बोलणं असतं का? त्यापरीस भेट घेतली की कित्ती बोलता येतं ना? म्हणजे तू माझ्याकडे किंवा मी तुझ्याकडे येऊन बसायचं आणि बोलत राहायचं याचा आनंद फोनवर कसा येईल? आपण मजेत कॉफी प्यायलोय, पाय पसरून गप्पा केल्यायात किंवा दिवसभर भटकत राहिलोय आणि त्या भटकंतीत अखंड बोललोय हे घडून किती युगं लोटलीत अव्वा? सांग बरं.

 

म्हणून अव्वा मी ठरवलं आहे की आजपासून तुला पत्र लिहिणार. पत्रातून छान बोलता येतं, सगळं सांगता येतं. टुकटुक बटणं दाबून मेसेज लिहा आणि तासभर उत्तराची वाट बघा. मग typing… अशी हिरवी अक्षरं ब्लिंकत राहाणार, त्यातून चारदोन वाक्यांचा प्रसाद आपल्याला मिळणार हे किती बोअरिंग आहे अव्वा! त्यापेक्षा पत्राचं बघ, कसं मस्त असतं. म्हणजे, अक्षरांवरून, खोडलेल्या, वापरलेल्या शब्दांवरून, सोडलेल्या, न सोडलेल्या सामासावरून आणि हो, वापरलेल्या शाइवरूनही आपल्याला लिहिणाऱ्या व्यक्तीचं मन समजतं. त्याने वापरलेला कागद आपल्या हातात घेऊन पाहता येतो. अक्षरातून मनाची थरथर कळते. पत्र लिहितानाच आपल्याला ते वाचणाऱ्या व्यक्तीचा अधीर चेहरा दिसत असतो.  म्हणून हे पत्र. हां, आता मी तुझं काम वाढवतेय. पण तू माझ्या पत्रांना उत्तरं द्यायची आहेस हे लक्षात ठेव. किंवा धमकी समज! (इथे तू मला; भवाने धमकी देतेस होय गं... असं म्हटलं आहेस ते मी आत्ताच ऐकलं.) तर फॉर युवर काईंड इन्फोर्मेशन, मी तुला विचारत नाहीचे, मी सरळ म्हणतेय की, चुपचाप मेरे खत का जवाब दो, वरना अंजाम बुरा होगा! कळलं का? आव्वे, तुझी लई आठवण येती मला. मी तुझ्याबद्दल माझ्या एका मैत्रिणीला बोललेली तर ती मला विचारू लागली, ‘अव्वा कोणे?’त्यांच्या कानडीत अव्वा म्हणजे आई असते. मी म्हटलं की, माझी अव्वा ही निस्ती साधी सरळ मैत्रीण अव्वा आहे. बस! तर ती म्हटली की ‘असंय का? बरं बरं.’ तर मला म्हणायचं हे आहे की काही लोकांना उगाचच कोण कोणाची कोण आहे याची चौकशी करायला फार आवडत असतं तर आपणही त्यांना अशीच उत्तरं द्यायची. प्रत्यक्षात तू माझी कोणेस? हे मी कोणाला कशाला सांगू? तूच सांग, तुला तरी आवडेल का ते? म्हणून मी ठरवलं आहे की या प्रश्नाचं जेव्हा जे सुचेल ते उत्तर द्यायचं. अव्वा कोण? म्हटलं की; अव्वा ही अव्वा असून तिच्यात अव्वाचे सगळे गुणधर्म सामावले आहेत. अव्वा, परवा काय झालं, ऐक ना. वर्गात गेले तर काही मुलं घोळका करून गप्पा करत होती, काही मुली खिडकीतून बाहेर काय की बघत होत्या आणि उरलेल्या मुली ओढणीत खूप फुलं घेऊन गजरे गुंफत होत्या. त्यांचं ते विश्व पाहून मला इतकं छान वाटलं गं. असं वाटलं आपली चाहूल लागू नये यांना. उगाच सावरून बसतील बिचारी. तरीही नाईलाजाने वर्गात गेले तर अपेक्षितपणे सगळं घडलंच. मग माझे नेहमीचे बोलायचे विषय सुरू झाले. लोकगीतं आणि लोककथा शिकताना मुलांना त्यांच्या भागातली काही लोकगीतं विचारली तर ती चक्क हसूच लागली. मुलींनादेखील हल्ली म्हणावी तितकी गाणी आठवत नाहीत. मग पुढल्या तासाला एखादं मस्त लोकगीत सांगीन या वचनावर वर्ग सोडला. बाहेर आले तोच चारपाच मुली पाठी आल्या. त्यापैकी एकीने ओचाभर बोरं मला दिली. मी पण ती पदरात बांधून घेतली. अगदी बिनधास्त. त्यात काय गं लाजायचं? एके काळी झिपऱ्या सोडून, इथं तिथं उंडारत नाही तर चक्क तळ्याच्या पाण्यात पाय सोडून बोरं खात नाहीय का बसलेले? बोरं घेऊन स्टाफरूमला आले, सहकारी मैत्रिणींना काही वाटली. आणि पदरातली बोरं डोळाभर पाहून घेतली. कोवळ्या उन्हात पिकल्यासारखी, गोड आणि खूप गर भरलेली ती पिवळसर, पिकली बोरं. फळ इतकं पिकावं! नाही का गं? नातंही इतकंच पिकलं की गोड वाटतं नं? तुला काय वाटतं? आता तू म्हणशील मी कुठून कुठे आले. पण अगं, तुला तर सवय आहेच माझ्या अशा भरकटत जाण्याची. बाकी आता थांबते. तुझ्या उत्तराची वाट बघतेय. तुझ्या सर्व व्यग्रतेतून निवांत आणि वेळ काढून मला उत्तर देशील याची खात्री आहे. 

तुझी 
मनी!
ता.क. – आत्ता पत्र पुन्हा वाचताना उद्या वर्गात सांगायचं गाणं आठवलं – 

जीविचं गुज सांगू,जीवीच्या गडनीला 
सये गं तुझ्यापास, गाभा हुरुदीचा उकलीला!

 

(लेखिका मराठीची प्राध्यापक आहे, कविता हा तिच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. पण तिला तिची ओळख ‘लांब जंगलात राहणारी एक वेडी जी, बोरकूट, दूध पावडर आणि लोणच्याच्या फोडी लपून खाते,’ अशी करून द्यावीशी वाटते.)