मंत्रिमंडळ विस्तार / फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ

 • पित्याच्या मंत्रिमंडळात आदित्य कॅबिनेट झाल्याने महाराष्ट्र थक्क
 • चार मुस्लिम मंत्री, पण ठाकरे मंत्रिमंडळाचा चेहरा पुरुषीच  

Dec 31,2019 07:35:24 AM IST

मुंबई - सत्ता स्थापनेनंतर तब्बल महिनाभराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार साेमवारी झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या २५ कॅबिनेट व १० राज्यमंत्र्यांनी पद व गाेपनीयतेची शपथ घेतली. आता ठाकरेंसह त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांची संख्या ४३ झाली आहेत. पहिल्याच विस्तारात मंत्रिपदाच्या सर्व जागा पूर्ण भरण्याचा ‘विक्रम’ही या निमित्ताने ठाकरे सरकारने घडवून आणला. नव्या मंत्र्यांचे खातेवाटप बुधवारपर्यंत हाेईल. आदित्य ठाकरे यांच्या रूपाने प्रथमच वडिलांच्या मंत्रिमंडळात मुलाची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. विधिमंडळाच्या प्रांगणात सोमवारी दुपारी मंत्रिमंडळ विस्ताराचा साेहळा पार पडला. भाजपने मात्र बहिष्कार घातला होता.


ठाकरेंच्या ४३ सदस्यीय मंत्रिमंडळात तब्बल २३ मंत्री मराठा समाजाचे, मुस्लिम व आेबीसी समाजाचे प्रत्येकी चार, वंजारी- बंजारी ३, धनगर १, अनुसुचित जातीचे ३, जमातीचे १, सीकेपी दाेन, तर सारस्वत व जैन समाजाच्या एका मंत्र्याला संधी मिळाली. शिवसेनेने आपल्या काेट्यातून एकाही महिलेला संधी दिली नाही. काँग्रेसने दाेन व राष्ट्रवादीने मात्र एका महिलेला संधी दिली. विस्तारानंतर राष्ट्रवादीच्या वाट्याला एकूण सर्वाधिक १६, शिवसेनेकडे १५, तर काँग्रेसकडे १२ मंत्रिपदे आली. शिवसेनेने आधीच्या मंत्रिमंडळातील दिवाकर रावते, दीपक केसरकर, रामदास कदम या दिग्गज नेत्यांना डच्चू दिला.

या नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपद

 • शिवसेना : संजय राठोड, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदिपान भुमरे, अनिल परब, उदय सामंत, शंकर राव गडाक (शिवसेना समर्थक), आदित्य ठाकरे

 • राष्ट्रवादी : अजित पवार, दिलीप वळसे पाटिल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील

 • काँग्रेस : अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, वर्षा गायकवाड, सुनील केदार, अमित विलासराव देशमुख, यशोमती ठाकुर, केसी पाडवी, असलम शेख

यांना राज्य मंत्रिपद

 • अब्दुल सत्तार
 • सतेज ऊर्फ बंटी पाटील
 • शंभुराजे देसाई
 • बच्चू कडू
 • विश्वजित कदम
 • दत्तात्रय भरणे
 • आदिती तटकरे
 • संजय बनसोडे
 • प्राजक्त तनपुरे
 • राजेंद्र पाटील यड्रावकर

घटक पक्षांना मंत्रिमंडळातून डावलले


मंत्रिमंडळ विस्तारात महाविकास आघाडीतील घटक पक्षांना डावलण्यात आले आहे. यामुळे घटकपक्ष नाराज असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, समाजवादी पार्टी, सीपीएम, बहुजन विकास अघाडी हे सामील होते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेतही घटक पक्षांना बोलवले नव्हते.


28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंसह 6 मंत्र्यांनी शपथ घेतली होती


उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरेंनी तिन्ही पक्षातील दोन-दोन मंत्र्यांसोबत मिळून 28 नोव्हेंबरला शपथ घेतली होती. यात राष्ट्रवादीकडून जयंत पाटिल, छगन भुजबळ, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, काँग्रेसकडून बालासाहेब थोरात आणि नितिन राउत यांनी शपथ घेतली होती.

X