आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Maha Janadesh Vs Maha Pardafash Yatra! In Pathardi, The Chief Minister's Opponents Are Defeated, While The Congress Is Attack On Bjp In Amravati

महाजनादेश vs महापर्दाफाश यात्रा‌! मुजोर विरोधकांवरही आता ‘यात्रा’ काढण्याची वेळ आली : फडणवीस, वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी महापर्दाफाश : प्रदेशाध्यक्ष थोरात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - महाजनादेश यात्रेचा धसका विरोधकांनी घेतला आहे. ते स्वतःला राजे समजत. आमचे राजे जनता जनार्दन असल्याने पुढील २५ वर्षे देशात व राज्यात युतीचीच सत्ता असेल. विरोधकांना विरोधी पक्षात राहण्याचा सराव व्हायला हवा, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर शरसंधान केले. माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर खंडित झालेली महाजनादेश यात्रा सोमवारी पुढे सुरू झाली. नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील बाजार समितीच्या मैदानावर आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या पाच वर्षांत राज्यापुढील सर्व समस्या संपल्या, असा आमचा दावा नाही. पण त्यापूर्वीच्या १५ वर्षांपेक्षा गेल्या पाच वर्षांत आम्ही प्रामाणिकपणे जास्त काम केले. सत्ता नसताना संघर्ष यात्रा, तर सत्तेत असताना संवाद यात्रा काढून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. गेल्या १५ वर्षांत विरोधकांची मुजोरी आणि माजोरी एवढी वाढली आहे की, त्यांच्यावरही आता यात्रा काढण्याची वेळ आली, असे सांगत राज्यात विरोधकांचे अस्तित्व कोठेही शिल्लक राहिलेले नाही, अशी टीका फडणवीस यांनी सोमवारी केली. दरम्यान, रात्री जामखेड येथेही मुख्यमंत्र्यांची सभा झाली.
 

दुसऱ्या टप्प्यातील समारोपासाठी अमित शहांना निमंत्रण
सोलापूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुसऱ्या टप्प्यात सुरू असलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप सोलापुरात एक सप्टेंबर रोजी होेणार आहे. त्यासाठी भाजपकडून तयारी सुरू आहे. यात्रेच्या समारोपासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, त्यांचा दौरा अद्याप निश्चित झालेला नाही, अशी माहिती यात्राप्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.
 

वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी महापर्दाफाश : प्रदेशाध्यक्ष थोरात
अमरावती - मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसह राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. पाच वर्षांत युती सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले. कर्जमाफी, पीक विमा देण्यात फसवणूक झाली. परंतु, भाषणातून ते विकासाचा असा काही बेमालूम अाव आणतात की, सर्वसामान्यांना त्यांची दिशाभूल झाल्याचे कळतही नाही. वस्तुस्थिती आणि वास्तव जनतेपुढे आणण्यासाठीच आम्ही आजपासून (दि.२६) महापर्दाफाश यात्रा सुरू केली असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. यात्रेच्या सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

महाजनादेश यात्रा सुरू करताना मुख्यमंत्र्यांनी संतभूमी गुरुकुंज मोझरी येथे काँग्रेसला जी आव्हाने दिली त्यात काहीच दम नव्हता हेच दाखवून देण्याचे काम आम्ही राज्यभरात करणार आहोत. यापुढे काँग्रेस नेते भाजप-सेनेच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करणार अाहेत, असेही थोरात यांनी ठासून सांगितले. ईव्हीएममध्ये दोष असल्याची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवरच निवडणूक व्हावी, असा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण शक्ती लावणार आहोत. बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यास खरी परिस्थिती राज्यातील जनतेपुढे येईल, असे ते म्हणाले. 

पक्षातील नेते काँग्रेसकडे पाठ फिरवून भाजपच्या गोटात गेले यावर जुने गेल्याने तरुण नेत्यांना संधी मिळणार असल्याचे ते म्हणाले.
 

एसटीचे ६७ लाख रुपये दररोज मातोश्रीवर : पटोले
शिवसेनेने एसटी महामंडळाच्या तिकिटातून अपघात विम्याच्या नावावर १ रु. कापण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. राज्यभरात दिवसाला ६७ लाख लोक एसटीने प्रवास करतात. ही ६७ लाखांची रक्कम कोणत्याही हिशेबाशिवाय मातोश्रीवर पोहोचते. त्यातूनच त्यांचा कारभार सुरू असल्याचा आरोप राज्यातील काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत केला.
 
 

बातम्या आणखी आहेत...