आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार थांबलेल्या हॉटेलांवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार थांबलेल्या हॉटेल परिसरात चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठल्याही आमदाराला बाहेरच्या पक्षाने फूस लावू नये याची खास काळजी घेतली जात आहे असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. भाजपचे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या आमदारांची फसवणूक करून ही सत्ता स्थापित करण्यात आली असून ती टिकणार नाही असे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने म्हटले आहे. तसेच आप-आपल्या सर्व आमदारांना तीन वेग-वेगळ्या हॉटेलांमध्ये ठेवले आहे.

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सर्वच चर्चा संपवून सरकार स्थापनेवर एकमत नोंदवले. दुसऱ्या दिवशी याची घोषणा होणे अपेक्षित होते. परंतु, ऐनवेळी सर्वांच्या नजरेपासून दूर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. यानंतर शपथविधीपूर्वीच राज्यपालांनी राष्ट्रपती शासन हटवल्याचे देखील समोर आले. या नाटकीय घडामोडींची कल्पना शिवसेना आणि काँग्रेस तर सोडाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही नव्हती. शरद पवारांनी आपले आमदार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये अजित पवारांनी आधीच सह्या करून ठेवलेल्या आमदारांचे पत्र राज्यपालांना दिले. याची कल्पना शपथविधी होईपर्यंत राजभवनात गेलेल्या आमदारांना देखील नव्हती असा दावा करण्यात आला. तेव्हापासूनच तिन्ही पक्षांनी आप-आपले आमदार सुरक्षित ठेवले आहेत.

आमदारांचा घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेसने आपले आमदार जुहू जे. डब्लू. मॅरिएटमध्ये ठेवले आहेत. राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना ठेवण्याची व्यवस्था पवई येथील रिनासॉ हॉटेलात केली आहे. तर शिवसेनेचे सर्वच आमदार एकत्रितरित्या मुंबईतल्याच ललित हॉटेलात थांबवण्यात आले आहेत. या आमदारांच्या सुरक्षेसाठी शहर आणि पवई पोलिसांसह राखीव पोलिस दलांच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत.  या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे अशी माहिती पवईचे पोलिस उपायुक्त मंजुनाथ सिंघे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...