आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - राज्यसभेच्या सातव्या जागेची रणनीती ठरवण्यासाठी सोमवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तर दुसरीकडे काँग्रेसनेही ही जागा मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केल्याने महाविकास आघाडीत ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला येणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
राऊत म्हणाले, महाविकास आघाडी ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी राज्यसभेच्या दोन जागा लढणार आहे. राज्यसभेत शिवसेना आणि राष्ट्रवादीची अधिक मते आहेत. त्याखालोखाल काँग्रेसची मते आहेत. त्यामुळे सातवी जागा आम्ही जिंकू शकतो. सातव्या जागेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झालेली आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली असून राष्ट्रवादीने माजी मंत्री फौजिया खान यांच्या नावाची घोषणा सुद्धा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
राऊत यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर भाष्य करणे टाळले. मनसे हा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. काय करावे आणि काय नाही हे त्या पक्षाने ठरवावे. त्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाला सल्ला देणे योग्य नाही. मनसेला १४ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असे राऊत म्हणाले. काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, राजीव सातव, मुकूल वासनिक, रजनी सातव यांची नावे चर्चेत आहेत. सोनिया या बुधवारी यासंदर्भातला निर्णय देणार असल्याचे समजते. १७ जागांची २ एप्रिल रोजी मुदत संपते आहे. त्यातील ७ जागा महाराष्ट्रातील आहेत. या जागांसाठी १३ मार्च रोजी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असून २६ मार्च रोजी मतदान आहे.
या खासदारांची संपत आहे मुदत
हुसेन दलवाई (काँग्रेस), अमर साबळे (भाजप), राजकुमार धूत (शिवसेना), शरद पवार (राष्ट्रवादी), माजिद मेमन (राष्ट्रवादी), रामदास आठवले (भाजप), संजय काकडे (भाजप) या राज्यसभा सदस्यांची मुदत एप्रिलमध्ये संपुष्टात येत आहे.
चंद्रकांत खैरेंचे नाव आघाडीवर
शिवसेनेच्या वाट्यास जी एक जागा आली आहे, त्यात शिवाजीराव आढळराव, प्रियंका चतुर्वेदी, चंद्रकांत खैरे इच्छुक आहेत. खैरे यांचे राज्यसभेवर पुनर्वसन केले जाऊ शकते, असा शिवसेनेतील सूत्रांचा अंदाज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.