आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मी भाजपचा चमचा नाही; रासपच्या चिन्हावरच जागा लढवणार : महादेव जानकर

एका वर्षापूर्वीलेखक: सुनील चौधरी
  • कॉपी लिंक

मंगेश फल्ले/सचिन कापसे 
‘विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने भाजपकडे ५७ जागा मागितल्या आहेत. किमान १२ जागा तरी हव्यात, अन्यथा भविष्यात आम्ही याेग्य ताे निर्णय घेऊ. भाजपच्या चिन्हावर आम्ही का लढायचे? मी त्यांचा चमचा नाही... आमचे उमेदवार स्वाभिमानाने आमच्याच पक्षाच्याच चिन्हावर लढतील,’ असे स्पष्टीकरण रासपचे संस्थापक, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी ‘ दैनिक दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत दिले.

प्रश्न : निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आलीय..?
जानकर : भाजप, शिवसेना व मित्रपक्षांशी तीन वेळा बाेलणी झालीय. अद्याप जागावाटप अंतिम झालेले नाही. रासपचे २ आमदार, ९८ जि. प. सदस्य, ३ नगराध्यक्ष, २ पं. स. सभापती आहेत. ९० हजारपैकी ३२ हजार ७२० बुथपर्यंतची रचना आम्ही पूर्ण केलेली आहे. मुख्यमंत्री शब्द पाळतात. त्यामुळे मंत्रिपदासह रासपच्या ७५० कार्यकर्त्यांना त्यांनी विविध सरकारी पदांवर सदस्यत्व दिलेले आहे. 

प्रश्न : तुम्ही स्वत: निवडणूक लढवणार का? 
जानकर : मी ही निवडणूक लढवणार नाही. २०२४ ची लाेकसभा बारामतीतून लढवेन. भाजपने उमेदवारी दिली आताही मीच खासदार असतो. 

प्रश्न : रासपला काेणकाेणत्या जागा हव्यात?
जानकर : दाैंड, पंढरपूर, इंदापूर, माण-खटाव, भूम-परांडा, कळंबाेली, अहमदपूर, सावनेर, गंगाखेड, कन्नड, जिंतूर, सिल्लाेड, देगलूर, बाळापूर, चिखली, लाेहा, कंधार, तुळजापूर, काेरेगाव, फलटण, माळशिरस, मुळशी, वाई, राधानगरी, चंदगड, शिराेळ, कागल, ब्रह्मपुरींवर दावा आहे.

प्रश्न : संजय दत्त तुमच्या पक्षात येणार हाेता? 
जानकर : ताे मला भावाप्रमाणे आहे. रासपच्या सभांत ताे येईल. ताे आताच पक्षप्रवेश करणार नाही. याबाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला. 

प्रश्न : युतीत छाेटे मित्रपक्ष दुर्लक्षित राहत आहेत?
जानकर : आघाडीने टाॅयलेट पेपरसारखा आमचा वापर केला. परंतु माेदी-फडणवीसांची नियत साफ आहे. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी ते प्रयत्नशील आहेत. एका आमदारावर मला कॅबिनेट मंत्रिपद दिले. महायुतीत आम्ही दुर्लक्षित नाहीत, प्रत्येक बैठकीत आमच्या मतांचा आदर होतो.

प्रश्न : धनगर आरक्षणाचे काय झाले?
जानकर : ही मागणी कायम आहे. आर्थिक क्रांतीविना समाजाची प्रगती हाेणार नाही. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लागता या समाजाला टिकाऊ आरक्षण मिळावे यासाठी सरकार काम करत आहे. मात्र ३-४ वर्षांत हा निर्णय हाेऊ शकत नाही. मागच्या सरकारने समाजाला अर्धा टक्कापण फायदा दिला नाही. या सरकारने ६०% मागण्या मान्य केल्यात. धनगर समाजाला १ हजार काेटी रुपये दिले. आदिवासी समाजाला मिळणाऱ्या सुविधा दिल्या. आमचा समाज वंचित आघाडीकडे जात नाहीये. 

प्रश्न : श्रीरामपूरमध्ये एका प्रश्नावर पवार भडकले, तुम्हीही माढ्यात भडकलात... असे का?
जानकर : शरद पवार हुशार नेते आहेत. मात्र आज त्यांच्या पक्षातील पडझड ही ‘जशी करणी तशी भरणी’चा प्रकार आहे. माढ्यातील पत्रकार परिषदेत मी भडकलाे नव्हताे. ‘भाजपच्या चिन्हावर तुम्ही लढणार का?’ असा प्रश्न एक पत्रकार सातत्याने विचारत हाेता. मी ‘नाही’ म्हणून उत्तर दिले तरी ताे एेकत नव्हता. त्याला नम्रपणे बाहेर जाण्यास सांगितले तरीही ताे गेला नाही आणि मी भडकल्याच्या बातम्या झाल्या.

प्रश्न : तुमच्या भगिनी पंकजा मुंडेंचे भाजपत खच्चीकरण हाेतेय का?
जानकर : मला तरी असे काही वाटत नाही. वाघाची मुलगी ही वाघीणच असते. गाेपीनाथ मुंडे हे फडणवीस यांचे गुरू हाेते. फडणवीस व पंकजा यांच्यात वाद नाहीत. माध्यमांतून विपरित चित्र उभे केले जाते. फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत, असे पंकजांनाही वाटते.