आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ क्लिप नसतानाही मंत्री जानकर यांना मागितली 50 कोटींची खंडणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे  - पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि शेळी-मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतोले यांची आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत ५० कोटींची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना १५ कोटी रुपयांची रक्कम घेताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बारामतीतून नऊ मे रोजी अटक केल्याने खळबळ उडाली होती. मात्र, पोलिस तपासादरम्यान आरोपींकडे कोणतीही वादग्रस्त व्हिडिओ क्लिप नसल्याचे निष्पन्न झाले असून क्लिप नसतानाही थेट एखाद्या मंत्र्यालाच खंडणी मागण्याचे धाडस आरोपी कसे काय करतात, याची चर्चा पोलिस दलात रंगत आहे.


या प्रकरणी डॉ. इंद्रकुमार भिसे (रा. शिरूर, पुणे), सचिन पडळकर (रा. माळशिरस, सोलापूर), दत्ता करे, तात्या कारंडे, विकास अलदर (सर्व रा. दौंड, पुणे) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात फिर्यादी बाळासाहेब रुपनवर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे अटक केलेले सर्व आरोपी याआधी राष्ट्रीय समाज पक्षाचेच (रासप) कार्यकर्ते होते व सध्या वेगवेगळ्या पक्षांत कार्यरत आहेत. ब्लॅकमेलिंग नेमके कशामुळे केले जात होते याबाबत प्रश्नचिन्ह आहे. पण रक्कम देण्यास तयार आहोत, असे सांगून पोलिसांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. 


आरोपी सचिन पडळकर याने जानकरांना फोन करून एक कोटी रुपये मागितले. शिवाय सोशल मीडियावर “तुमचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हयरल करीन’ अशी धमकीही दिली. आम्ही एवढे पैसे देऊ शकत नाही, असे जानकरांनी स्पष्ट केले. जानकरांनंतर दोडतोले यांनाही आरोपींकडून फोनवरून त्रास सुरू करण्यात आला. आरोपींनी दोडतोले यांच्याकडे मागणी केली की, तुमच्या महामंडळासाठी एक हजार कोटी रुपये आले आहेत. त्यातून १०० कोटी रुपये द्या. मग तक्रारदार रुपनवर यांना फोन आला आणि बारामतीला बैठकीसाठी बोलावले. तुमचा निरोप जानकर साहेब आणि दोडतोले यांना कळवतो, असे त्या बैठकीत सांगितले. 
 

हार्ड डिस्क, लॅपटॉप जप्त
पुणे ग्रामीण एलसीबीचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट म्हणाले, आरोपींच्या ताब्यातून दोन हार्ड डिस्क, लॅपटॉप व स्मार्ट मोबाइल फोन असा इलेक्ट्रॉनिक ऐवज जप्त करण्यात आला. त्यांची तपासणी केली असता कुठेही वादग्रस्त व्हिडिओ क्लिप आढळून आली नाही. 


आरोपींना पैसे मोजताना अटक
आरोपींनी ५० कोटींची मागणी केली होती. काही दिवसांनंतर पुन्हा फोनवरून त्रास सुरू झाला आणि पुण्यात बैठकीला बोलावले. ५० ऐवजी ३० कोटी रुपये द्या, अशी मागणी केली आणि त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली गेली.  पहिला हप्ता १५ कोटी रुपये देण्याचे ठरले होते. पोलिसांकडून सापळा रचण्यासाठी साडेचार कोटी रुपये जमा केले आणि खाली कागदी बंडल होते. पैसे देण्यासाठी बारामतीतील हॉटेल कृष्ण सागरमध्ये भेट ठरली. पण सगळे पैसे मोजेपर्यंत जाऊ नका, असे आरोपींनी सांगितले. तेवढ्यात पोलिसांनी सर्वांना अटक केली.

बातम्या आणखी आहेत...