आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुखरुख काळजात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐन हिवाळ्याच्या तोंडावर कडक उन्हाळ्यात असावी अशी स्थिती. निष्पर्ण झाडं, माना टाकलेली शेवटच्या घटका मोजणारी कापसाची रोपं, मागच्या उन्हाळ्यापासून पाण्याच्या थेंबासाठी आसुसलेल्या ऐन हिवाळ्यात कोरड्या पडलेल्या विहिरी, संपूर्ण पावसाळ्यात एकदाही पूर न आलेले नदीनाले.

 

रात्र वाढत होती, थंडी हळुहळू जोर धरू लागली होती. बसमधील सर्व प्रवासी निद्रेच्या अधीन होत होते. मला मात्र काही केल्या डोळा लागत नव्हता. राहून-राहून नजरेसमोर येत होती दिव्याच्या अंधुक उजेडातही झाकोळलेली, आवाजहीन व फक्त धूर निघणाऱ्या फुसक्या फटाक्यासारखी गावाकडची  दिवाळी.
तसाही आमचा मराठवाडा म्हणजे शापित प्रदेश. दर दोन वर्षांनंतर तिसरं वर्ष दुष्काळाचं हे ठरलेलंच. इथल्या माणसांनी याची सवय करून घेतलेली. तरीही दोन वर्षं पाऊस पडतो या आनंदातच तिसरं वर्ष ढकलायचं. हे अंगवळणी पडलेलं.
यंदाचं वर्ष काही वेगळंच आहे याची जाणीव पेपरातल्या बतम्यांवरून व फोनवरील माहितीवरून झाली होती व या वर्षीची दिवाळी काही वेगळीच असणार याचा अंदाज आला होता.
प्रत्यक्ष गावात पोहचल्यावर जी विदारक परिस्थिती पहिली त्याने काळजाचा ठोकच चुकला. ऐन हिवाळ्याच्या तोंडावर कडक उन्हाळ्यात असावी अशी स्थिती. निष्पर्ण झाडं, माना टाकलेली शेवटच्या घटका मोजणारी कापसाची रोपं, मागच्या उन्हाळ्यापासून पाण्याच्या थेंबासाठी आसुसलेल्या ऐन हिवाळ्यात कोरड्या पडलेल्या विहिरी, संपूर्ण पावसाळ्यात एकदाही पूर न आलेले नदीनाले. ओसाड माळरानं, त्यावर अनाथ कुपोषित लेकरांसारखी भटकत हिंडणारी गुरंढोरं. कर्तीधर्ती सगळी माणसं ऊस तोडण्यासाठी देशोदेशी गेलेली. शिल्लक राहिलेली म्हातारी माणसं व लहान मुलं, त्यांना आसरा देणारं ओस पडलेलं व विस्कटलेलं गाव. 
सारा देश दिवाळीचा आनंद साजरा करत असताना गावात मात्र दिवाळीच्या प्रकाशाचा लवलेशही नव्हता. इथल्या माणसांच्या चेहऱ्यावर भविष्याची चिंता दिसत होती. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता पिण्याच्या पाण्याचा. कोठून मिळेल उन्हाळ्यात पाणी? अशा वातावरणात कशी साजरी होणार दिवाळी? सरकार अन्नपाण्याची गरज भरूनही काढेल.  यंदाच्या दुष्काळामुळं लोकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे, मानसिक खच्चीकरण होत आहे. नवं काही करण्याची उमेद नष्ट होत आहे. माणसं कामानिमित्त दूर-दूर गेल्यामुळे भावनिक ओलावा कमी होत आहे. हे एक वर्ष माणसांना किती तरी वर्षं मागे घेऊन जाईल. १९७२पेक्षाही भयंकर स्थिती असल्याचं तो काळ भोगलेल्या व आयुष्याची संध्याकाळ अनुभवणाऱ्या, कठीण स्थितीत जगत असलेल्या वृद्धांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. परिस्थितीच इतकी कठीण आहे की, याला शासनही काही करू शकत नाही. सगळा दोष नशिबाला. हे झालं माणसांचं. ती जगतीलही कशी तरी, सावरतीलही पुन्हा.
जीवसृष्टीतील असंख्य प्राणी, पक्षी, झाडं, वेली, गवत यांचं काय? कसे जगातील हे सगळे? ऐन बहारात आलेलं गवत करपून गेलं त्यामुळे गवताचं बीज जमिनीत पडलंच नाही. पुन्हा ते कसे रुजेल? गवताच्या शेकडो प्रजाती नष्ट होतील. असंख्य झाडं वळून जातील. किती तरी प्राणीपक्षी पाण्याविना तडफडून मरतील, नष्ट होतील, नामशेषही होतील.दुष्काळामुळं होऊ घातलेली हानी अपरीमित असेल, ती कधीही भरून येणं अश्यक्य आहे. 
आता तांबडं फुटलं होतं, उजाडायला लागलं होतं. खिडकीच्या काचेतून अंधुक दिसायला लागलं होतं. मला मात्र झोप लागली नव्हती. या भयावह दुष्काळामुळं गावाचा झालेला धुराळा व खिन्न झालेले माणसांचे चेहरे आठवून काळजात रुखरुख वाटत होती. जून महिना उजाडला होता, काळे निळे ढग आभाळात जमले होते, जोरजोरात गडगडाट झाला, सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सारी धरणी पावसात न्हाली, नदीनाले एक झाले. सगळीकडे पाणीच पाणी... गाडी थांबली. कंडक्टरच्या आवाजाने स्वप्नातून बाहेर आलो. किती गोड स्वप्न होतं ना? पुढच्या वर्षी नक्की खरं होवो, हीच ईश्वराकडे प्रार्थना.

(लेखक पांढरकवडा येथे बालविकास 
प्रकल्प अधिकारी आहेत.) 

 

बातम्या आणखी आहेत...