आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mahaelectioin : धोंडे-आजबेंत लढत रंगण्याची चिन्हे, धसांमुळे भाजपला बळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी - धस, धोंडे, दरेकर या ‘थ्री डी’ भोवतीच आष्टीचे राजकारण फिरत असून पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे तीनही दिग्गज भाजपच्या तंबूत असल्याने बळ वाढलेले आहे. आमदार भीमराव धोंडे यांनी आपली उमेदवारी अंतिम समजून  तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबे, जि.प.सदस्य पती सतीश शिंदे हे प्रामुख्याने स्पर्धेत आहेत. लोकसभेत भाजपने ‘थ्रीडी’च्या बळावर मिळवलेले ७० हजारांचे मताधिक्य हे राष्ट्रवादीला चिंतेत टाकणारे आहेत.

आमदार धोंडे यांनी आष्टीचे चारदा तर तर विधान परिषद सदस्य सुरेश धस यांनी तीनदा प्रतिनिधित्व केले आहे. २०१४ मध्ये भाजपचे भीमराव धोंडेंनी राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांचा पराभव केला. बदलत्या परिस्थितीत सुरेश धस यांनी राजकीय डावपेच खेळत भाजप प्रवेश मिळवला व लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बाजी मारली. आष्टी, पाटोदा व शिरुर या नगर पंचायती व पंचायत समित्या धस यांच्या ताब्यात असून त्यांचे पुत्र जयदत्त रणनीती आखताहेत. राष्ट्रवादीच्या आजबेंनीही भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत. जि.प.सदस्य निता शिंदे यांचे पती सतीश शिंदे हे आता राष्ट्रवादीत असून उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. 
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आष्टीकडे विशेष लक्ष असून ते यंदा कोणाला संधी देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. युती व आघाडी न झाल्यास काँग्रेस व सेनेकडूनही तसेच वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळवण्यासाठी दिग्गज ताकद पणाला लावू शकतात. दरेकर व धस कुटुंबातील नव्या नात्यामुळे राजकीय कंगोरे बदलले असून जयदत्त धस यांच्या उमेदवारासाठी मोर्चेबांधणी होत असल्याची चर्चा तालुक्यात आहे.
 
हे असू शकतात संभाव्य उमेदवार 
आष्टी मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांचे नाव निश्चित मानले जातेय. मात्र, विधान परिषद सदस्य सुरेश धस यांचे पुत्र जयदत्त धसही उमेदवारीसाठी आग्रही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब आजबे, सतीश शिंदे, माजी झेडपी अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत, अण्णासाहेब चौधरी, माजी झेडपी सभापती महेंद्र गर्जे इच्छुक आहेत. शिवसेना आणि काँग्रेसकडून उमेदवारांची नावे पुढे आलेली नाहीत. 
 
२०१४ मधील विधानसभेची स्थिती
भीमराव धोंडे    भाजप     १,२०,९१५
सुरेश धस      राष्ट्रवादी    १,१४,९३३
मीनाश्री पांडुळे    काँग्रेस     ३,३५६
अशोक दहिफळे     शिवसेना      २,७९८
 
या आहेत मतदारसंघातील समस्या
कुठलाही मोठा उद्योग नसल्याने आष्टी मतदारसंघात रोजगाराच्या साधनांची कमतरता आहे. यामुळे तरुणांच्या हाताला काम नाही.  आष्टी येथील कारखाना अनेक वर्षे बंद आहे. सिंचनाच्या दृष्टीने अनेक गावांत स्वतंत्र जलप्रकल्प नसल्याने सतत टंचाई पाणी भासते. अनेक आरोग्य केंद्रांत कर्मचारी उपलब्ध नाहीत. पशुवैद्यकीय रुग्णालयांची अशीच अवस्था आहे. बाजार समित्या, एमआयडीसी नावालाच उरल्या आहेत.