आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection: ८७% मुस्लिम काँग्रेसमागे; आघाडी तुटल्याचा ‘एमआयएम’ला फटका?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - २०१९ लोकसभा निवडणुकीत राज्यातील बहुसंख्य मुस्लिमांनी काँग्रेसला मतदान केले होते. बौद्धांनी मोठ्या संख्येने वंचित आघाडीची पाठराखण केली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयएम आघाडीतून बाहेर पडल्याने वंचितचे मोठे नुकसान नाही, असे विश्लेषक मानतात. मात्र एमआयएमला दलित मतांना मुकावे लागू शकते. गेले १५ दिवस प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात जागावाटपावरुन तणाव होता. एमआयएमला ७४ जागा हव्या होत्या. एमआयएमने मुस्लिम जनाधार गमावलेला आहे. त्यामुळे इतक्या जागा देण्यास आंबेडकर राजी नव्हते. शुक्रवारी एमआयएमने विधानसभा स्वबळावर लढणार असे जाहीर केले. 

२०१४ च्या काही महिने अगोदर एमआयएमने तेलंगणातून महाराष्ट्रात चंचुप्रवेश केला. मुस्लिम समाजाला एमआयएम आपल्या मतांचे ध्रुवीकरण करत आहे, हे इंगित लवकरच उमगले. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मुस्लिम समाज एमआयएमपासून दुरावल्याचे निवडणुकांची आकडेवारी स्पष्ट करते. 
राज्यात एमआयएमचे १५० नगरसेवक असून त्यात  गैरमुस्लिमांची संख्या जास्त आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाने एमआयएमची साथ सोडली असल्याचे विश्लेषक मानतात. वंचित आघाडीचा आधार मुस्लिम, धनगर आणि बौद्ध असा होता. धनगर व बौद्ध यांच्या मतांच्या जोरावर विधानसभा निवडणुकीत वंचित करिष्मा दाखवू शकते. या दोन जातगटांच्या मतांचा लाभ एमआयएम उमेदवारांना झाला असतो, पण स्बळावर लढल्याने आता तो होणार नाही. यापूर्वी मुस्लिम- दलित ऐक्याचा प्रयोग हाजी मस्तान व प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला होता. तो जेमतेम दोन वर्ष टिकला. आता आंबेडकर-ओवेसी यांची आघाडी वर्षभर टिकली.
 

दोघांच्या भांडणात भाजपला लाभ मिळण्याची शक्यता
> एमआयएम बाहेर पडल्याच्या पार्श्वभूमीवर दलित व मुस्लिम मतांत विभागणी होऊ शकते. वंचितला ज्या जागा विजय शक्य दिसत होता, तेथे आता फटका बसू शकतो. त्याचा थेट लाभ भाजप अन् काही प्रमाणात शिवसेनेच्या उमेदवारांना होऊ शकतो.
> लोकसभा निवडणुकीला वंचित आघाडीने काँग्रेसबरोबर युती करू नये यासाठी भाजपने पडद्यामागून हालचाली केल्या. तशाच हालचाली आगामी विधानसभा निवडणुकीला एमआयएमने वंचितबरोबर जाऊ नये यासाठी केल्याचे सूत्र सांगतात.
 

2014 : विधानसभा
२०१४ च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत एमआयएमने स्वबळावर २४ जागा लढवल्या होत्या. त्यात औरंगाबाद मध्यमधून इम्तियाज जलील आणि भायखळ्यातून वारीस पठाण हे आमदार झाले होते. एमआयएमच्या मतांचा टक्का होता ००.९३ टक्के. मात्र १४ मतदारसंघांत एमआयएमच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.
 

तरीही फटका काँग्रेसलाच
आदिवासी, मुस्लिम व दलित जाती काँग्रेसच्या मतदार आहेत. बौद्ध मतदार गैरकाँग्रेस, गैरभाजप पक्षांच्या मागे आहे. एमआयएम स्वबळावर लढल्यास मुस्लिम मताच्या ध्रुवीकरणाच प्रयत्न करेल. त्याला यश आल्यास त्याचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला बसू शकतो.
 

2019 : लोकसभेत कुणाला कौल
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीनुसार मुस्लिम धर्मीयांचा पाठिंबा वंचित आघाडीला नव्हे तर काँग्रेसला असल्याचे दिसते. बाैद्ध धर्मीयांचा मात्र वंचितला एकमुखी पाठिंबा असल्याचे दिसते. (२०१९ लोकसभेनंतर लोकनिती-सीएसडीएस  संस्थेेचे सर्व्हेक्षण) 
 

राज्यातील मुस्लिम मते 
12% मते युती, 01% इतर पक्ष, 87% मते काँग्रेस 
 

राज्यातील बौद्ध मते
12% काँग्रेसला, 07% युतीला, 81%वंचित आघाडी

बातम्या आणखी आहेत...