आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : एखादा बुरूज ढासळला म्हणजे किल्ला ढासळत नसतो : डॉ. अमोल कोल्हे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा  - एखादा बुरूज ढासळला म्हणून किल्ला पडत नसतो. जोपर्यंत मावळे पाठीशी आहेत, तोपर्यंत स्वराज्य हाती आहे. १८ वर्षे राजाशिवाय रयत लढली हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता आहे आणि राहील, अशी ग्वाही देत इतिहासामध्ये अनाजीपंत यांनी संभाजीराजे यांच्यावर कुरघोडी केल्याचे षड्यंत्र नमूद केले आहे, हे षड्यंत्र संभाजीराजे यांनी हाणून पाडले. आगामी विधानसभा निवडणुकीत तेच घडणार असल्याचे सांगून येणाऱ्या निवडणुकीत भाकरी फिरवा. पुन्हा एकदा सेना-भाजपचे सरकार सत्तेत आले तर छत्रपती शिवराय आपल्याला कदापि माफ करणार नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे खासदार, डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. दरम्यान, या कार्यक्रमाला खा. उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पाठ फिरवली. 

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचे गुरुवारी साताऱ्यात आगमन झाले. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सरचिटणीस अमोल मिटकरी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण उपस्थित होते.
खा. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, आज महाराष्ट्रामध्ये तीन यात्रा निघाल्या आहेत. भाजपची महाजनादेश यात्रा, शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. भाजपच्या यात्रेबाबत जनतेमध्ये संभ्रम आहे. पाच वर्षे कामे केली असती तर मुख्यमंत्र्यांना यात्रा काढावी लागली नसती. शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, असे सांगितले जात आहे. थोडक्यात महाराष्ट्राला गृहीत धरून या यात्रा सुरू आहेत. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा मात्र महाराष्ट्र कोणाची जहागिरी नाही, येथे येईल ते रयतेचे राज्य येईल, असे सांगणारी यात्रा आहे. राष्ट्रवादीला छत्रपती शिवरायांची कशी आठवण झाली, अशी विचारणा होते. बालेवाडी येथील स्टेडियमचे काम पूर्ण झाल्यानंतर या स्टेडियमला कोणाचे नाव द्यायचे यावर खल सुरू झाला. बहुतांशी नेत्याचे नाव देण्याची मागणी पुढे येऊ लागली. याबाबत शरद पवारांना जेव्हा विचारणा झाली तेव्हा त्यांनी कागदावर शिवछत्रपती क्रीडानगरी हे नाव लिहिले. हा इतिहास खूप जुना आहे. ज्या कर्जमाफीच्या योजनेला शिवरायांचे नाव दिले गेले तीन वर्षे झाली तरी अद्याप कर्जमाफी झाली नाही हा शिवरायांचा अपमान नाही का?  जयंत पाटील म्हणाले, शिव स्वराज्याची कल्पना मांडत ही यात्रा महाराष्ट्रभर फिरत आहे. महाराष्ट्रात ४५ जिल्ह्यांत ही यात्रा गेली. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी होते तेच प्रश्न आम्ही या यात्रेत उपस्थित करत आहोत.  
 
 

उदयनराजे, रामराजे यांची शिवस्वराज्य यात्रेकडे पाठ
सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आली असता या यात्रेला खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर उपस्थित राहणार का? याबाबत सर्वांना उत्सुकता होती. मात्र, या दोघांनीही या यात्रेकडे पाठ फिरवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पक्षाचे हे दोन्ही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...