आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • MahaElection: Aditya Thackeray Will Become Chief Minister With NCP's Support

MahaElection : राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री? शरद पवारांनी दिला शब्द, युती संकटात?

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर - युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ‘अादित्य-संवाद जन यात्रा’ ही शरद पवार यांच्याच ‘आयडिया’ची कल्पना आहे. भाजपबरोबर निवडणूक लढवून १०० हून अधिक जागा मिळाल्यास सत्तेसाठी फरपटत जाण्यापेक्षा आघाडीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचीच सत्ता येऊन आदित्य ठाकरे मुख्यमंत्रीदेखील होऊ शकतात, अशी भन्नाट कल्पना दस्तुरखुद्द शरद पवार यांनी ‘मातोश्री’वर रुजवली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून हाती आली आहे. नीरा देवघर धरणाचे बारामतीकडे जाणारे पाणी माढ्याकडे वळवण्याच्या भाजपच्या निर्णयाने अस्वस्थ झालेल्या पवारांनी हा नवा राजकीय डाव टाकला आहे. शिवसेनेच्या मदतीनेच, राज्यात भाजपचा चौफेर उधळलेला वारू अडवण्याचे राजकीय प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये होऊ लागलेल्या ‘मेगाभरती’मुळे शरद पवार तर अस्वस्थ आहेतच; शिवसेनेलाही मोठी चिंता भेडसावू लागली आहे. भाजपची महाजनादेश यात्रा पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रित असून ती स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने सुरू असलेली चाचपणी मानली जाऊ लागली आहे. या तयारीचा अंदाज आल्यानंतर शिवसेनेनेदेखील हालचाल सुरू केली. आदित्य संवाद यात्रा हे त्या अनुषंगाने उचललेले पहिले पाऊल होते. या यात्रेतून आदित्य यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दाव्याची चर्चा सुरू झाली होती. या यात्रेमागे पवारांचाच हात असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यांनी मध्यंतरी राज्यात एक सर्वेक्षण केले. भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर १६० जागा मिळू शकतात आणि शिवसेनेला ६० जागा मिळू शकतात, असा अहवाल त्यांच्याकडे सादर झाला. युती झाली तर भाजपाच्या जागा १२०च्या आसपासच रेंगाळण्याची शक्यता आहे. युतीमध्ये शिवसेनेला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांचे वलय आणि काश्मीर प्रश्नाचा फायदा होऊन त्यांच्या जागा वाढू शकतात. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा शिवसेनेच्या दबावतंत्राला बळी पडण्याची नामुष्की भाजपवर येऊ शकते. 
 

युतीतील जागा वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांनी आहे त्या जागा, त्या त्या पक्षांकडे राहून उर्वरित जागांचे वाटप करण्यात येईल आणि काही जागा मित्रपक्षांना सोडल्या जातील असे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफरदेखील दिलेली आहे. 

सत्तेचे गणित मांडताना भाजप शिवसेनेकडे नैसर्गिक युती म्हणून पाहतो आहे. परंतु शिवसेनेच्या जागा जर वाढल्या तर मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. सेनेने या आधीच 'अडिचकी'चा फॉर्म्युला मांडलेला आहे. पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तो फेटाळून लावला. या परिस्थितीत शिवसेनेला सत्तास्थानावर पोहोचवण्यासाठी भाजपला वगळून दुसऱ्या पक्षाची मदत घ्यावी लागेल. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून सहकार्य मिळू शकेल, असा शब्द शरद पवार यांनी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शरद पवार यांची ही आयडिया पसंत पडल्यानंतरच आदित्य- संवाद यात्रा भाजपच्या महाजनादेश यात्रेपूर्वी महाराष्ट्रात सुरू झाली. भाजपने नीरा- देवघर धरणातील बारामतीचे पाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणीवरून सोलापुरातील माढा मतदार संघाकडे वळवण्याचा निर्णय घेतल्याने आधीच शरद पवार नाराज आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीतील मातब्बर आमदारांना फोडून पक्षात घेण्याचा सपाटा भाजपने लावल्यामुळे शिवसेनेच्या हातात 'खंजीर' देऊन तो ऐनवेळी भाजपच्या पाठीत खुपसण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत विविध पक्षांच्या महा-आघाडीमुळे धास्तावलेल्या भाजपने अपमान गिळून शिवसेनेशी मिळते जुळते घेण्याचे ठरवले होते. त्यातूनच लोकसभेसाठी दोन्ही पक्षांची युती आकाराला आली. या निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपचा आत्मविश्वास सध्या टिपेला पोहोचला आहे. राज्यातील मराठा आरक्षणाचा मोठा प्रश्न सुटल्यामुळे भाजप मजबूत झाल्याची भावना राज्यात आणि केंद्रात आहे. शासनात सहभागी असूनदेखील शिवसेनेने भाजपवर आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करून मानहानी केल्याचे शल्यं अजूनही भाजप नेत्यांच्या मनात आहे. राजीनामे खिशात घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेला शह देण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि त्यांचे बारा समर्थक आमदार यांच्याशी भाजपने संधान साधून ठेवले होते. परंतु ती वेळ आली नाही. आता राधाकृष्ण विखे यांचा भाजप प्रवेशदेखील झालेला आहे. नगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे आमदारपुत्र वैभव पिचड यांचाही प्रवेश आता भाजपमध्ये झाला आहे. त्यांच्यासोबतच्या अन्य आमदारांचाही प्रवेश लवकरच होऊ शकतो. त्यामुळे शिवसेनेच्या तुलनेत भाजपची ताकद महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातदेखील वाढणार आहे. याची कल्पना पक्ष धुरिणांना आलेली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कुबड्या घेऊन लढायचे कशाला स्वबळावरच लढायला काय हरकत आहे? अशा विचारांपर्यंत भाजपा श्रेष्टी आल्याचे समजते. महाजनादेश यात्रा हे त्याचेच फलित आहे. 
 

अनेक मतदारसंघांत होणार पेच, सोप्पं नाही युतीतील जागावाटप
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातून भाजपमध्ये आयात केलेल्या नेत्यांना त्यांचा मतदारसंघ द्यायचा असेल तर तो जागावाटपात भाजपकडे असण्याची गरज आहे. याच मुद्द्यावरून राज्यात बऱ्याच ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाच्या ठिणग्या पडू शकतात. राधाकृष्ण विखे यांचा शिर्डी, वैभव पिचड यांचा अकोले हे दोन्ही  मतदारसंघ २००९च्या जागावाटपाप्रमाणे शिवसेनेकडे आहेत. ते भाजपकडे घ्यायचे असतील तर त्या बदल्यात भाजपकडील कोणते दोन मतदारसंघ शिवसेनेला देणार, हा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. राज्यात सुमारे २० ठिकाणी असा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती दुभंगण्याच्या स्थितीत आहे. त्याची घोषणा २०१४ प्रमाणेच ऐनवेळी होऊ शकते, असे राजकीय धुरीणांचे म्हणणे आहे.