आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : आघाडीचे बुरूज ढासळले, युतीचे किल्ले भक्कम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

निवडणूक विशेष - मुंबई, ठाणे आणि कोकण हा शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला. या तीन जिल्ह्यांमध्ये एकूण ७५ मतदारसंघ आहेत. २००९ चा अपवाद वगळता  आजवर हा भाग शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. शिवसेनेच्या मदतीने भाजपनेही हळूहळू स्थान बळकट केले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र स्वबळ आजमावत भाजपने मुसंडी मारत शिवसेनेलाही मागे टाकले. अर्थात यात आघाडी सरकारबाबतची नाराजी आणि मोदी लाट या मुद्द्यांचाच मोठा हात होता.

गेल्या पाच वर्षांत फडणवीस सरकारची राजकीय घोडदौड आणि राज्यातील जनता अजूनही 
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात असल्याचे सांगत या वेळी पुन्हा शिवसेना-भाजपलाच संधी असल्याचा अंदाज विश्लेषक वर्तवत आहेत.  अर्थात शेवटपर्यंत युती हाेईल की नाही याबाबत दाेन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना शंका आहे. मात्र काहीही झाले तरी मुंबई, काेकण, ठाण्यात शिवसेना व भाजपचेच वर्चस्व राहणार यात शंका नाही.
विधानसभेच्या गेल्या चार निवडणुकांमध्ये या भागातील तीन दिग्गज नेत्यांनी पक्षांतर करत स्वत:चा  नवीन पक्ष स्थापन केला. त्यापैकी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सत्तेपर्यंत मजल मारली, तर राज ठाकरे यांच्या मनसेची ताकद मात्र संपुष्टात आल्याचे दिसत आहे. नारायण राणे यांनीही स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली, मात्र त्यात अपयश आल्याने आता भाजपमध्ये हा पक्ष विलीन हाेत आहे.
 

शिवसेनेचा जनाधार पुन्हा वाढला; भाजपनेही मुसंडी मारत मित्रपक्षाला टाकले मागे

> १९९९ : आघाडीची बाजी, मात्र सेनेचा गड अबाधित
१९९९ मध्ये मुंबई, कोकण, ठाण्यात ६५ मतदारसंघ होते. केंद्रात व राज्यात युतीचे सरकार असल्याने लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका ६ महिने आधीच एकत्र घेण्यात आल्या. मात्र त्यात वाजपेयी सरकारचा इंडिया शायनिंगचा फुगा फुटला. राज्यातही आघाडीची सत्ता आली. मात्र शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले. ६५ जागांपैकी शिवसेनेने २६, भाजप १३, काँग्रेस १३ व राष्ट्रवादीने ५ जागा जिंकल्या. शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना करून स्वबळावर निवडणूक लढवली. युती व काँग्रेसचे अनेक नेते फाेडले. आज त्यापैकीच काही नेते भाजप- सेनेकडे जात आहेत.
 

> २००४ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची मुसंडी
२००४ मध्ये थेट लढत आघाडी आणि युतीमध्येच होती. मतदारसंघांची पुनर्रचना हाेऊन संख्या १० ने वाढली. एकूण ७५ जागा झाल्या. मुंबईत ३६ तर ठाणे (२४) व कोकणात (१५) ३९ मतदारसंघ आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने आपले स्थान काहीसे अबाधित ठेवले असले तरी १९९९ पेक्षा त्यांच्या पाच जागा घटल्या. आमदार संख्या २१ पर्यंत घसरली. भाजपही ४ जागा गमावून ९ जागांवर थांबला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र आपल्या जागांमध्ये चांगलीच वाढ केली. काँग्रेसने १७ तर राष्ट्रवादीने १२ जागांवर विजय मिळवला.
 

> २००९ मनसेची पदार्पणात सेनेला तगडी टक्कर
२००९ मध्ये राज ठाकरेंचा पक्ष मनसेने निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकला. त्यांनी राज्यात १४३ उमेदवार उभे केले. त्याचा फटका या भागात शिवसेनेला बसला.  विधानसभेत मुंबईच्या ३६ जागांपैकी काँग्रेसने १७, राष्ट्रवादी ३ अशा २० जागांवर विजय मिळवला. शिवसेनेने ४ व भाजपने ५ जागा राखल्या. ठाण्यातील २४ जागांपैकी युतीने १०, आघाडी ६, मनसे २, समाजवादी पक्ष, बहुजन आघाडीने २ जागी विजय मिळवला. एकूणच मुंबईसह कोकणातील ७५ पैकी ३३ जागा आघाडी, मनसे ८ आणि शिवसेना-भाजपला फक्त १४ जागा मिळाल्या होत्या.
 

> २०१४ : स्वबळावर लढूनही भाजप-सेना वरचढ
२०१४ मध्ये शिवसेना-भाजपची युती तुटली आणि सर्वच पक्ष वेगळे लढले. खरे तर कोणताही पक्ष सर्व २८८ जागांवर लढण्याची तयारी करीत नव्हता. या निवडणुकीत शिवसेनेने आपले पूर्वीचे स्थान पुन्हा मिळवत २३ जागांवर विजय मिळवला. आघाडी सरकारच्या विरोधातील जनमताचा फायदा घेत भाजपने प्रथमच अभूतपूर्व यश मिळवले. सेनेपेक्षा दोन जागा जास्त मिळवत २५ आमदार निवडून आणले. काँग्रेसला फक्त ५, राष्ट्रवादीला ६ जागांच मिळाल्या. मनसेची जादू आेसरल्याने एकही उमेदवार निवडून आला नाही.
 

नवे गणित काय? : आघाडीचे जहाज बुडू लागल्याने दिग्गज नेते सरकले युतीकडे

> पक्षांतराची लागली स्पर्धा
राज्यात युतीचीच सत्ता कायम राहणार असल्याचे संकेत मिळत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक मोठे नेते आणि आमदारांमध्ये आपापल्या पक्षाला रामराम करून शिवसेना आणि भाजपमध्ये सामील हाेण्याची जणू स्पर्धाच लागली. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
 

> गणेश नाईकांचा धक्का
नारायण राणेंचे समर्थक असलेले  वडाळा येथील दिग्गज नेते आमदार कालिदास कोळंबकर भाजपमध्ये आल्याने या भागात शिवसेना-भाजप युतीची ताकद वाढली आहे.  नवी मुंबईचे बलाढ्य नेते गणेश नाईकही भाजपकडे जाणार असल्याने राष्ट्रवादीला तेथे मोठा फटका बसणार असून त्याचा फायदा युतीलाच हाेईल.
 

> राणेंचा पक्षही विलीन!
कोकणातील नारायण राणे यांनीही आपला स्वाभिमानी पक्ष भाजपत विलीन करण्याची घाेषणा केली. ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व या मतदारसंघातील आमदार गणपत गायकवाड हेही भाजपच्या वाटेवर आहेत. असे झाल्यास कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील डोंबिवली, कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या तीनही विधानसभा मतदारसंघांवर भाजप दावा करू शकतो.
 

मनसे : विश्वासार्हता गमावल्याने लाेकप्रियतेला लागली आेहाेटी

> राज ठाकरे : ‘ईव्हीएम’च्या मुद्द्याआड काढणार पळ
राज ठाकरेंनी ईव्हीएमवरच शंका उपस्थित करून विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे शस्त्र उपसण्याची तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे ते आताही भाजपविराेधात ताेफ डागून काँग्रेस-राष्ट्रवादीचा अप्रत्यक्ष प्रचार करू शकतात.
 

वंचित आघाडी : मतविभाजन युतीच्या पथ्यावर
प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी लाेकसभेप्रमाणे विधानसभेलाही काँग्रेसशी आघाडीच्या मन:स्थितीत दिसत नाही. दलित व मुस्लिम हीच व्हाेट बँक असलेल्या वंचितचा काँग्रेस- राष्ट्रवादीला फटका बसू शकताे. हे मतविभाजन युतीच्या पथ्यावर पडेल.
 

मतटक्क्यांत चढ-उतार
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र आले आणि त्यांचे २०१४ प्रमाणेच १२ खासदार निवडून आले. या निवडणुकीत मुंबई आणि उपनगरातील ३६ विधानसभांपैकी २१ मतदारसंघांमध्ये युतीच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे, तर १४ मतदारसंघांत युतीची मते घटल्याचे दिसते. दोन मतदारसंघांत जवळपास मागच्या इतकीच मते त्यांना मिळाली आहेत.
 

2014 विधानसभा
३६ पैकी भाजप-सेनेचे २९ आमदार निवडून आलेे हाेते. मात्र या लाेकसभा निवडणुकीत यापैकी केवळ २१ जागांवरच मतटक्का वाढल्याचे दिसून आले आहे.
> मुंबादेवी, भायखळा, माहीम, धारावी, चेंबूर, वडाळा, अणुशक्तीनगर, चांदिवली, विलेपार्ले, वांद्रे पूर्व, मुलुंड, विक्रोळी, भांडूप, दिंडोशी, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली, चारकोप, मालाड या २१ मतदारसंघांत युतीचे मतदान वाढले. यापैकी १२ मतदारसंघांत शिवसेनेचे, तर ११ मतदारसंघ भाजपचे आमदार आहेत.
> कुलाबा, मलबार, शिवडी, वरळी, सायन, कुर्ला, कलिना, वांद्रे पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, दहिसर, जोगेश्वरी, गोरेगाव, अंधेरी पूर्व या १४ मतदारसंघांत मतदान घटले. यात भाजपच्या सात व शिवसेनेच्या सात जागांचा समावेश.