Politics / राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन अकोलेचे आमदार वैभव पिचड भाजपमध्ये दाखल

मी राष्ट्रवादी काँग्रेस कदापि सोडणार नाही, गद्दारी करणार नाही, असे पत्रकार परिषद घेऊन छातीठोक सांगणारे वैभव पिचड आता भाजपवासी

प्रतिनिधी

Jul 27,2019 08:48:00 AM IST

अकोले - राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी आपली भाजप प्रवेशाची भूमिका शुक्रवारी स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याचा शब्द दिल्याने तालुक्याच्या हिताचा विचार करून मी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन भाजपत जाण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पिचड साेमवारी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात आले.


जि. प. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व वडील मधुकर पिचड यांच्या अनुपस्थितीत आमदार पिचड यांनी प्रमुख ५० कार्यकर्त्यांची बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, भाजपचे जि. प. गटनेते जालिंदर वाकचौरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


मी राष्ट्रवादी काँग्रेस कदापि सोडणार नाही, गद्दारी करणार नाही, असे पत्रकार परिषद घेऊन छातीठोक सांगणारे वैभव पिचड आता भाजपवासी होणार हे निश्चित झाले होते. काँग्रेसमधून भाजपवासी झालेले गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदार पिचड यांना गळाला लावण्यात यश मिळवले.


चित्रा वाघ, गोरे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत?
मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चित्रा वाघ यांच्यासह जयकुमार गोरे हेदेखील भाजपमध्ये जाण्याच्या तयारी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कालिदास काेळंबकर, सुनील केदार यांचाही भाजप प्रवेश लवकरच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

X
COMMENT