MahaElection / MahaElection : एमआयएमला मुस्लिम मते मिळत नसल्याचा आंबेडकरांचा आक्षेप

एमआयएम-वंचित बहुजन आघाडीच्या गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत चर्चा

Sep 07,2019 09:56:07 AM IST

पुणे - लाेकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ मतदारसंघांत उमेदवार उभे करून ४१ लाख मते प्राप्त करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची ताकद स्पष्ट झाली हाेती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम मिळून करिष्मा दाखवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात हाेती. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या माध्यमातूनच मुस्लिमांची मते मिळत आहेत, मात्र, एमआयएमला महाराष्ट्रातील मुस्लिम पुरेशी मते देत नसल्याचा आक्षेप घेतला. आंबेडकरांनी विधानसभा निवडणुकीत एमआयएमला केवळ आठ जागा देण्याची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर एमआयएमचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात पुण्यात गुरुवारी रात्री बैठक हाेऊन सविस्तर चर्चा झाली. परंतु एमआयएमला मुस्लिमांची मते मिळत नसल्याचा आक्षेप घेत आंबेडकरांनी जागा वाढवून देण्यास नकार दिल्याने वंचित आणि एमआयएमची आघाडी संपुष्टात आल्याची माहिती एमआयएमच्या एका माजी काेअर कमिटी सदस्याने दिली आहे. सूत्रांनी माहिती दिली की, वंचित बहुजन आघाडीच्या जागेवरच मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली जात असल्याने एमआयएमला स्वतंत्ररीत्या जागा देण्यास आंबेडकरांनी विराेध दर्शवला. आंबेडकर यांनी एमआयएमला दिलेला आठ जागांचा प्रस्ताव मान्य नव्हता. तसेच अनुसूचित जाती (एससी)च्या जागेवर एमआयएमने दावा करू नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली हाेती. आैरंगाबाद मध्यवर्ती भागातील जलील हे मागील वेळी निवडून आलेली जागा देण्यासही त्यांनी विराेध दर्शवला. अमरावती, साेलापूर या ठिकाणी मागील निवडणुकीत एमआयएमला ज्या जागांवर चांगली मते मिळाली त्या जागांवरही त्यांनी हक्क सांगितला. २०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत भारिप २६ जागांवर लढली हाेती तर विधानसभेच्या १७० जागांवर ते लढले.

विधानसभेत भारिपला चार लाख ६० हजार मते मिळाली हाेती आणि बहुतेक उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले हाेते. परंतु एमआयएम केवळ २४ जागांवर लढून त्यांना चार लाख ९९ हजार मते मिळालेली हाेती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दाेघांची ताकद समान असताना यंदा केवळ आठ जागा देऊन अन्याय केला जात असल्याची भावना एमआयएम कार्यकर्त्यात आहे. मागील निवडणुकीत राज्यात एमआयएमचे दाेन आमदार निवडून आले तर नऊ जागांवर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली हाेती. त्यामुळे मुस्लिम एमआयएमला मते देत नाहीत हा आराेप दिशाभूल करणारा आहे. लाेकसभा निवडणुकीत नांदेड येथे अशाेक चव्हाण यांच्याविराेधात एमआयएमच्या यशपाल भिंगे या नवीन कार्यकर्त्यालाही एक लाख २० हजार मते मिळाली. नांदेडच्या माैलानांनी फतवा काढून मुस्लिमांनी चव्हाण यांना मतदान करावे, असे सांगितले तरी एमआयएमने ताकद सिद्ध केली. तर, अकाेल्यात काँग्रेस उमेदवार हिदायत पटेल यांना आंबेडकर यांच्याविराेधात उभे राहण्यास एमआयएमनेच विराेध केला.


दाेघांची आघाडी फिस्कटल्याने नवीन पिढी पुन्हा दुरावणार
एमआयएम व वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यातील शाेषित, अल्पसंख्याक, दलित समाजातील तरुण राजकारणात पुढे येऊ पाहत हाेते. परंतु आघाडी फिस्कटल्याने मुस्लिम नेतृत्व पुढे येत हाेते. त्याला धक्का बसला. अल्पसंख्याक तरुण पुन्हा राजकारणापासून दुरावला जाणार, अशी चर्चा सुरू आहे. आंबेडकर काेणाला पदाधिकारी नेमणूक व महत्त्वपूर्ण निर्णयात विश्वासात घेत नाहीr, अशी टीका करत लक्ष्मण माने प्रथम वंचित आघाडीतून बाहेर पडले हाेते.

X