• Home
  • Vidhan sabha 2019
  • Vidhansabha
  • MahaElection: BJP in driving seat, inevitability of the Shiv Sena alliance; Analysis of inevitability of Shiv Sena alliance, election analyst Yashwant Deshmukh

MahaElection / MahaElection : भाजपच ड्रायव्हिंग सीटवर; शिवसेनेला युतीची अपरिहार्यता, निवडणूक विश्लेषक यशवंत देशमुख यांचे विश्लेषण

पडझड झाली तरी अजूनही काँग्रेसमध्ये उभारीची क्षमता; राष्ट्रवादीला पुढे नेण्यात पवारांचे वारसदार मात्र अपयशी

दिव्य मराठी

Sep 03,2019 07:19:00 AM IST

मागील पाच वर्षात महाराष्ट्रातील राजकारणाचा कॅनव्हास पूर्णपणे बदललाय. पूर्वीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रभावी राजकारणाला ओहोटी लागली. काँग्रेसची स्थिती फार चांगली नाही. राष्ट्रवादीच्या राजकारणाचे इमले इतक्या लवकर कोसळतील, याची कल्पनाही कुणी केली नसावी. राज्याच्या राजकारणात सध्या भाजपच ड्रायव्हिंग सीटवर आहे. त्याच्या साथीने शिवसेनेलाही बरे दिवस आहेत. प्रभावहीन ठरत असलेल्या विरोधकांचा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजप केंद्रित राजकारणाशी सामना आहे. या पार्श्वभूमीवर ‘सी- व्होटर’चे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक यशवंत देशमुख यांनी महाराष्ट्रातील राजकारणाविषयी ‘दिव्य मराठी’कडे सविस्तर भाष्य केले. नागपूरचे अामचे विशेष प्रतिनिधी रमाकांत दाणी यांच्याशी देशमुख यांनी साधलेला संवाद, त्यांच्याच शब्दात....

नव्वदच्या दशकापूर्वीच्या व आताच्या महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठा बदल झालाय. राज्यात पूर्वी काँग्रेसकेंद्रीत राजकारणाचा बोलबाला होता. या पक्षाकडे प्रभावी नेत्यांची मोठी फळी होती. यशवंतराव, शंकरराव चव्हाणांपासून वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक अशा प्रभावी नेत्यांची परंपराच होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही याच नेत्यांच्या मालिकेतील. आपल्यातील चतुर राजकारण्याचे कसब दाखवत पुलोदच्या राजकारणाचा प्रयोग पवारांनी त्या काळात करून दाखविला होता. नंतरच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे व पवार या नेत्यांशिवाय राजकारणच होऊ शकत नाही, ही परिस्थितीही महाराष्ट्राने बघितली आहे. मात्र, आता या नेत्यांची जागा काहीशा वेगळ्या राजकारणाने घेतली आहे. प्रामुख्याने भाजपकेंद्रीत राजकारणाने. राजकारणाला पूर्वी मुंबई, मराठवाडा, प. महाराष्ट्र, उ. महाराष्ट्र व विदर्भ असे विविध राजकीय संस्कृतींचे कंगोरे होते. त्यावर प्रामुख्याने प्रभाव होता पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईचा. मात्र, आता ती स्थिती नाही. नेतृत्वाच्या बाबतीत फारसा कधीही आघाडीवर न राहिलेला विदर्भ सध्या फोरफ्रंटवर आहे. निवडणुकांचे जुने ठोकताळेही आता लागू होत नाही.

आघाड्यांचे राजकारण
नव्वदच्या दशकापासून महाराष्ट्राने राजकीय कूस बदलली. काँग्रेसला टक्कर देणारी युती उदयास आली. बाळासाहेब ठाकरेंसारख्या नेत्याच्या मार्गदर्शनात युतीने सत्ता मिळवली. शिवसेनेचे बोट धरून भाजपनेही प्रगती साधली. शिवसेनाप्रमुखांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री करून पारंपरिक जातीय समीकरणांना पहिला धक्का दिला. त्यानंतर पवारांच्या वेगळ्या वाटेने काँग्रेसही आघाडीच्या राजकारणात ओढली गेली. भाजपची पावले देखील बेरजेच्या राजकारणाच्या दिशेने पडत गेली. राज्याचे वर्तमान राजकारण पाहिल्यावर पवारांच्या राष्ट्रवादीची मजबूत इमारत इतक्या लवकर उध्वस्त होईल, याची कल्पना देखील त्यावेळी केलेली नसणार, असे मला वाटते.

बाज बदललाय
महाराष्ट्रामध्ये आता भाजप हाच ‘डॉमिनेटेड’ फॅक्टर झाला आहे

लोकसभेच्या निकालांचे विश्लेषण केल्यास महाराष्ट्रातील राजकारणाचा बाज बदलल्याचे दिसते. हरियाणासारख्या राज्यात जाट समाज अत्यंत प्रभावी आहे. ते अनुकूल नसल्याचे लक्षात घेऊन भाजपने गैर जाट समूहांना पुढे आणले. विविध जातींना पक्षात प्रतिनिधीत्व दिले. यूपीतही यादवविहरित राजकारणास चालना दिली. उर्वरित समाजांतील नेतृत्व विकसित केले. महाराष्ट्रातही भाजपने पूर्वी ओबीसी राजकारणावर भर दिला. आता मराठा राजकारणाची भर घातली. लोकसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे महिला व युवा मतदार हे दोन प्रभावी वर्ग पुढे आले. त्यांची जाती वा धर्माच्या नावाने निर्णय घेण्याची तयारी नाही. पूर्वी पवार व ठाकरेंशिवाय राजकारणाचा विचारही होत नव्हता. आता राज्यात भाजप हाच डॉमिनेटेड फॅक्टर झालाय. मोदींचा प्रभाव नसता तरी हीच परिस्थिती राहिली असती, असे मला वाटते.

नेतृत्वाची पोकळी
बाळासाहेबांनंतर शिवसेनेमधील पोकळीचा भाजपला फायदा झाला

बाळासाहेब ठाकरेंंचा राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव होता. भाजपही त्या प्रभावाखाली होताच. बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेला ती पोकळी भरून काढता आलेली नाही. अनेक ओबीसी नेते शिवसेना सोडून गेले. स्वत:च्या पुरुषार्थावर विश्वास असलेले नेते शिवसेनेत थांबलेले नाहीत. याचा फायदा भाजपला झाला. मुंबई मनपात सेनेला बाहेरून पाठिंबा देण्याचा भाजपचा निर्णय हा मास्टरस्ट्रोक होता, असेच मी म्हणेन. नेत्यांच्या प्रभावाने वाढलेल्या राष्ट्रवादीपुढेही आता मोठे प्रश्न आहेत. पूर्वी पवारांची ‘क्राफ्टमनशीप’ करामत दाखवायची. आता वयामुळे शरद पवार हे फारशी सक्रिय भूमिका बजावू शकत नाहीत. त्यांची दुसरी पिढी आपला फार काही प्रभाव पाडू शकलेली नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊनच राष्ट्रवादीतील नेते दुसऱ्या पक्षांमध्ये भवितव्य शोधत आहेत.

बायाेपाेलर राजकारण
काँग्रेस आत्मघाती ‘मोड’ वर, तरीही भविष्यात ‘अच्छे दिन’ची अाशा

महाराष्ट्राच्या राजकारणात आज किमान चार प्रमुख पक्ष दिसत असले तरी या राजकारणाची वाटचाल हळूहळू बायपोलर राजकारणाच्या दिशेने होत असल्याचे लक्षात येईल. एक दोन अपवाद सोडले तर सोडले भाजपमध्ये फारशी घराणेशाही नाही. गडकरी आणि फडणवीस हे नेते स्वकर्तृत्वाने पुढे आले आहेत. भाजपने पक्षबांधणीकडे प्रामुख्याने लक्ष दिले. सर्वच स्तरावर नेतृत्वाची मालिका उभारली. त्यामुळेच भाजपचे भवितव्य उज्वल आहे. काँग्रेसमध्येही अलीकडे पडझड झाली असली तरी या पक्षाकडे आजही त्यांच्याकडे उत्तमोत्तम नेत्यांची फळी कायम आहे. सध्या काँग्रेस आत्मघाती निर्णयांच्या ‘मोड’ वर असली तरी भाजपसह या पक्षालाही राज्यात उज्वल भवितव्य आहे, असे मला वाटते. काँग्रेसने राज्यातील नेतृत्व अधिक ग्रुम करण्याची गरज आहे.

शिवसेनेचे युतीतच भले
राज्यात भाजपने सेनेपेक्षा अधिक जागा लढवणे हे युतीच्या फायद्याचे

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आहेच. लोकसभेनंतर भाजप व शिवसेना विधानसभेसाठी पुन्हा एकत्र येतील काय, हा प्रश्न अनेकांना आहे. लोकसभेपूर्वी भाजपला आत्मविश्वास वाटत नसल्याने थेट पंतप्रधानांनाही लक्ष्य करणाऱ्या सेनेची मनधरणी करून समझोता केला. मात्र लोकसभेतील अभूतपूर्व यशानंतर भाजप आत्मविश्वासाने भारलेला आहे. आता युतीची गरज शिवसेनेला आहे. वास्तवाकडे कानाडोळा करून मुख्यमंत्रिपदाचा दावा करणारे शिवसेनेचे नेते आता या विषयावर बोलायचेही टाळत आहेत. राज्यात लहान भावाची भूमिका स्वीकारणे सेनेसाठी अपरिहार्य झाले आहे. स्वबळावर लढ्यास शिवसेनेचे नुकसान अटळ आहे. तुलनेने भाजपला अतिशय कमी नुकसान सोसावे लागेल. युतीत लढताना भाजपने अधिक जागा लढविणे हे युतीच्याच फायद्याचे आहे.

विश्वासार्हता कमावली
लोकांना सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नात मोठी प्रामाणिकता दिसते आहे

महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या, शेतीचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. उद्योगधंद्यांची स्थिती बिकट आहे. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुराच्या आपत्तीचा फटका स्थानिक सत्ताधाऱ्यांना बसूही शकतो. या परिस्थितीचा विरोधी पक्षांना लाभ उठविता येईल का? या प्रश्नाचेे उत्तर सध्या तरी नाही, असेच दिसते. नियमित सर्वेक्षणाचा डेटाही नेमके तेच सांगतो. या समस्या पूर्वीही होत्या. त्यावर मात करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नात लोकांना प्रामाणिकता दिसते आहे. मोदींच्या २०१९ च्या यशात त्यांनी केलेली कामे हे प्रमुख कारण नव्हते, तर त्या दिशेने त्यांची प्रामाणिकताच लोकांना भावली. हीच परिस्थिती महाराष्ट्रात फडणवीस यांनाही लागू पडते. त्यामुळे भाजपची विश्वसनीयता टिकून आहे. विरोधी पक्षांकडे ती नाही वा त्यांना ती मागील पाच वर्षातही मिळवता आलेली नाही.

तिसऱ्या शक्तीचे प्रयत्न
आघाडी आणि युतीशिवाय राज्यात तिसरी शक्ती म्हणून पुढे येण्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रयत्न आहेत. राज्यातील कोणत्याही विभागातील परिस्थिती लक्षात घेतली तरी वंचित आघाडीला फार काही साध्य करता येईल, अशी स्थिती नाही. मात्र ही आघाडी लोकसभा निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अधिक ‘डॅमेज’ करेल, हे स्पष्टच आहे. वंचित बहुजन आघाडीचा भाजपशी छुपा समझोता असल्याचे आरोपही झाले आहेत. तो असूही शकतो. राजकारणात हे सारे शक्य आहे. आजवर ते चालतच आले आहे.

मुख्यमंत्री म्हणून देशात फडणवीसच पुढे

‘सी- व्होटर’ संस्थेच्या पाहणीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले. पण, त्यांची ‘निगेटिव्ह’ प्रतिमा देखील आहेच. याेगींच्या तुलनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लाेकप्रियता काहीशी कमी असली तरी त्यांची कुठेही खलनायकी प्रतिमा नाही. त्यांच्याबाबतीत नकारात्मक अशी कुठलीच बाब आढळत नाही. ‘नेट पॉप्युलॅरिटी रेटिंग’ मध्ये फडणवीस आघाडीवर आहेत. त्यांची हीच लोकप्रियता भाजपच्या यशाला मोठा हातभार लावत आहे.

विधानसभेत काय चित्र असेल ?

लोकसभेत आघाडी व युतीमध्ये १५ टक्के मतांचा फरक होता. तेच चित्र आताही कायम आहे, असे सर्वेक्षणाचे आकडे सांगतात. त्यात फार काही फरक पडण्याची शक्यता आज तरी दिसत नाही. चार प्रमुख पक्षांमध्ये भाजप ड्रायव्हिंग सीटवर आहे.

X