आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : ही युती तुटायची नाय; भाजप-सेना दोघांनाही एकमेकांची गरज, अन्यथा नुकसानच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राजकीय वर्तुळात शिवसेना व भाजप यांची युती २०१४ च्या निवडणुकीप्रमाणे ऐनवेळी तुटेल व दोघे वेगळे लढतील, अशी चर्चा भाजपत सुरू असलेल्या मेगा भरतीच्या पार्श्वभूमीवर जोरात सुरू आहे. परंतु यंदा मागच्यासारखी गत होणार नाही. भाजप-शिवसेना युतीतच लढतील. आम्ही २ वर्षांपासून भाजप कमजोर असलेल्या जागांवर लक्ष केंद्रित केले असून त्यानुसार काम सुरू आहे, अशी माहिती भाजपतील वरिष्ठ सूत्रांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

भाजपमधील मेगाभरतीबाबत या नेत्याने सांगितले, २०१४ मध्ये काही कारणांमुळे शिवसेना आणि भाजप वेगळे लढले. भाजपने २६० जागा आणि मित्रपक्षाला २८ जागा दिल्या.  त्यात भाजपने १२२ जागांवर विजय मिळवला होता, तर शिवसेनेने २८८ जागा लढवल्या आणि त्यांना ६३ जागा मिळाल्या. परंतु १२२ जागांवर आमचा विजय झाला असला तरी आणखी जवळजवळ ५५ जागांवर आम्ही दुसऱ्या क्रमांकावर होतो. शिवसेनाही ५० ते ५५ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे तसे पाहिले तर १७७ जागांवर आम्ही पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहोत. भाजपची ताकद नसलेल्या ठिकाणी ती कशी वाढवता येईल याची चाचपणी आम्ही दोन वर्षांपूर्वीच सुरू केली. काँग्रेस-राष्ट्रवादीचा कोणता स्थानिक नेता भाजपत येऊ शकेल याची माहिती घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्या प्रयत्नांना आता फळ येताना दिसत आहे. आम्ही कोणालाही भाजपत प्रवेश देत नसून ज्या जागांवर कमजोर आहोत त्याच जागांवर आम्ही लक्ष केंद्रित करत पक्ष प्रवेश देत आहोत. शिवसेनेनेही कमजोर जागांवर लक्ष देऊन तेथे काम सुरू केले आहे. १२२ आमदारांपैकी अनेक आमदारांना घरी बसवले जाणार असून पक्ष प्रवेश केलेल्या काही नेत्यांना तिकीट देण्याबरोबरच भाजपचेही काही चेहरे आम्ही बदलणार आहोत. 

स्वबळावर लढायचे असते तर “महाजनादेश’ यात्रा राज्यभरात असती : मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा संपूर्ण राज्यात नसून फक्त १५२ मतदारसंघांमध्येच आहे. आम्हाला स्वबळावर लढायचे असते तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असता, असेही या नेत्याने म्हटले. दरम्यान, सध्या राज्यात कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर सत्ता मिळवणे कठीण आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे तर नावही घेऊ नका. शिवसेना आणि भाजपमध्येच सत्ता मिळवण्याची ताकद आहे, परंतु तीसुद्धा युती केल्यानेच. मागील वेळेप्रमाणे आम्ही दोघेही वेगळे लढलो तर स्वबळावर सत्ता येणार नाही. पुन्हा एकत्र यावे लागेल. काँग्रेस-राष्ट्रवादीचे पूर्ण पानिपत होईल. त्यामुळे आम्ही २२० पारचा नारा देत असलो तरी २५० जागांची तयारी करीत आहोत,  असेही या नेत्याने सांगितले.
 
 

यंदाही २००९ निवडणूक वेळचाच जागावाटप फॉर्म्युला
जागावाटपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे. २००९ मध्ये आमची युती होती तेव्हा शिवसेनेने १६० जागा लढवल्या होत्या आणि ४४ जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपने ११९ जागा लढवल्या होत्या आणि ४४ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे या वेळीही २००९ चा जागावाटपाचा फॉर्म्युला असेल. मागील जागावाटपातील जागा यंदाही दोन्ही पक्षांकडे कायम असतील. मात्र, काही जागांची अदलाबदल केली जाणार आहे, असेही या नेत्याने स्पष्ट केले.
 

२०१४ वेळच्या जागा संबंधित पक्षाकडे कायम, काही जागांची अदलाबदली होण्याची शक्यता

२०१४ मधील बलाबल

विभाग        शिवसेना    भाजप
उ. महाराष्ट्र      ७    १६ 
विदर्भ              ४    ४३
मराठवाडा       ११    १५
मुंबई             २१    २४
कोकण           ७    ०
प. महाराष्ट्र    १३    २४