आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युतीचे जागावाटप तीन-चार दिवसांतच, शिवसेनेला 110 ते 115 जागा देण्याबाबत चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजप आणि शिवसेना नेत्यांची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत मित्रपक्षांना दिल्या जाणाऱ्या १८ जागांवर सविस्तर चर्चा झाली. शिवसेना आणि भाजपच्या वाट्याला येणाऱ्या जागांची चर्चा यापूर्वीच पूर्ण झाली आहे. काही जागांच्या अदलाबदलीसह जागावाटप तीन-चार दिवसांत घोषित केले जाईल, अशी माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी 'दिव्य मराठी'ला दिली. युतीत चर्चेच्या आतापर्यंत चार फेऱ्या झाल्या असून शिवसेना आणि भाजपला किती जागा द्यायच्या यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. सोमवारी भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि शिवसेनेकडून सुभाष देसाई यांनी चर्चा केली. काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेल्या आमदार आणि नेत्यांच्या नावांबाबतही या बैठकीत चर्चा झाली. यापैकी कोण निवडून येऊ शकतो याचा आढावाही घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेला कमी जागा देण्याच्या बातम्यांबाबत भाजपमधील सूत्रांनी सांगितले की, कमी आणि जास्त जागांचा संबंध नसून महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. जागा कमी-जास्त असल्या तरी मुख्यमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपद समान वाटून दिले जाईल. युतीत जागांच्या संख्येवरून कसलीही समस्या उद्भवणार नाही. प्रभारी यादव-मुख्यमंत्र्यात चर्चा : बैठकीनंतर चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सर्व माहिती दिली, तर देसाई यांनीही उद्धव ठाकरे यांना बैठकीची माहिती दिली. त्यापूर्वी भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचीही तासभर बैठक झाली. यादव यांनी मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेबाबत सविस्तर माहिती घेऊन त्यांना देण्यात येणाऱ्या जागांबाबत चर्चा केल्याचे समजते. आता लवकरच मुख्यमंत्री जागावाटपाबाबत भाजप नेत्यांशी चर्चा करतील. त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार आहेत. दरम्यान, महायुतीचे जागावाटप अंतिम झाल्यानंतरच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होईल आणि त्यानंतर युतीच्या जागावाटपाची घोषणा केली जाईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली. शिवसेनेला ११० ते ११५ जागा देण्याबाबत चर्चा भाजपची राज्यात ताकद वाढली असल्याने आणि मोदी यांनी कलम ३७० रद्द केल्याने मतदारांमध्ये भाजपप्रति आकर्षण वाढल्याने भाजप जास्त जागा मागून घेईल आणि शिवसेनेला ११० किंवा ११५ जागा दिल्या जाऊ शकतील. त्यानुसार शिवसेना कमी जागा घेऊन जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करेल. ११५ जागांपैकी शिवसेना १०० आमदारांचा आकडा गाठू शकेल, तर भाजपही मित्रपक्षांसह १२० ते १२५ आमदारांचा आकडा गाठू शकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...