आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष मुलाखत : भाजप-शिवसेनेनंतर मतदारांचा सर्वाधिक प्रतिसाद ‘वंचित’ला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘राज्यातील मतदारांचा विश्वास भाजप-शिवसेनेवरच आहे. जे थोडेफार आमच्यावर नाराज असतील, ते ‘वंचित बहुजन आघाडी’ला पर्याय मानत आहेत. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदार गांभीर्याने घेताना दिसत नाही,’ असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.  ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या खास आणि दीर्घ मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. ‘वंचित’ ही भाजपची ‘बी टीम’ असल्याच्या आरोपाचे खंडन करताना ते म्हणाले, ‘वंचित बहुजन आघाडीने आमचीही मते मोठ्या प्रमाणात खाल्ली आहेत. पराभवाचे बहाणे शोधणाऱ्यांचा हा शोध आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे मतदार गांभीर्याने का पाहत नाही, याची उत्तरे त्यांनी शोधायला हवीत.’   देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीला जाणार आणि केंद्रात मंत्री होणार, या चर्चेविषयी बोलताना मुख्यमंत्री  म्हणाले, ‘माझ्या विधानाचा तो विपर्यास आहे. एवढ्यातच दिल्लीला माझी गरज भासेल, असे मला वाटत नाही. ज्याला साधे राजकारण समजते, त्यालाही हे समजेल. मी राज्यातच काम करणार हे नक्की!’ अर्थात, हे सांगतानाच पक्ष जी जबाबदारी देईल, ती स्वीकारणारा मी कार्यकर्ता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरू आहे. सोमवारी दिवसभर मुख्यमंत्र्यांनी आपल्या यात्रेच्या खास रथात ‘दिव्य मराठी’शी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

महाराष्ट्रात वातावरण भाजपला अनुकूल, मात्र शिवसेनेशी युती कायमच
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना पुन्हा वेगळे लढणार, असे म्हटले जात आहे, याविषयी विचारता मुख्यमंत्री म्हणाले, ‘प्रत्येक पक्ष ताकद वाढवत असतो. आम्ही आमची ताकद वाढवत आहोत. शिवसेनेतही अनेक नेते प्रवेश करीत आहेत. त्यामुळे, हा माध्यमांना पडलेला प्रश्न आहे. शिवसेनेला काय हवे आहे, हे मी ‘सामना’ वाचून वा अन्य बातम्या पाहून ठरवत नाही. त्यांना काय हवे आहे, ते मला नीट माहीत आहे आणि आमचा उत्तम संवाद आहे. वातावरण भाजपला अनुकूल असले, तरीही आम्ही युती कायम ठेवणार आहोत. मी पुन्हा स्पष्ट करतो, विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजप व सर्व मित्रपक्ष आम्ही सर्व एकत्र मिळूनच लढवणार आहोत. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार नक्की येणार, हे स्पष्ट आहे.’

महापुराच्या आपत्तीनंतर सरकारकडून तत्परतेने मदतकार्य
सांगली, कोल्हापूर येथे आलेल्या पुरात नागरिकांची मदत करण्यात सरकार अपयशी ठरले  का, या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘मुळीच नाही.  दोन दिवसांत ७०० मिमी पाऊस पडेल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. सर्व रस्ते बंद झाल्याने मदत पोहोचणे कठीण झाले होते. माझे हेलिकॉप्टरही उतरू शकत नव्हते. परंतु सरकारने लवकरच या स्थितीवर नियंत्रण मिळवले आणि पूरग्रस्तांना मदत केली. यात एनडीआरएफ आणि अन्य यंत्रणा यांची खूप मदत झाली आणि आपण सगळ्यांनी हे पाहिले आहे.’

आयारामांची भरती अजून किती ?
मुख्यमंत्री म्हणाले, ‘आम्ही ऊठसूट कोणालाही पक्षात प्रवेश देत नाही. काही नव्हे तर अनेक नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत, परंतु ज्या ठिकाणी आम्ही कमजोर आहोत, किंवा ज्या ठिकाणी आमची काहीही ताकद नाही, अशाच ठिकाणी आम्ही तेथे प्रभाव असलेल्या नेत्यालाच भाजपमध्ये घेत आहोत. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत, परंतु नेते मात्र आम्ही पारखून घेत आहोत. तसेच नेत्यांना आम्ही या म्हणत नाही तर, कार्यकर्तेच त्यांना भाजपमध्ये जा असे सांगत आहेत आणि याची अनेक उदाहरणे आपण नुकतीच पाहिलेली आहेत. मोदींसोबत काम करा, असा जनरेटाच तयार झाला अाहे,’ असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आणि दुष्काळाशी सामना
राज्यात प्रचंड दुष्काळ असताना तुम्ही एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था कशी तयार करणार, या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, गेली ५ वर्षे आपण दुष्काळाचा सामना करीत आहोत. परंतु असे असले तरी २०१२-१३ मध्ये १०९ टक्के पाऊस पडला. त्या वेळी जेवढे उत्पादन झाले, तेवढेच उत्पादन आपण गेल्या वर्षी ७० टक्के पाऊस पडला तरी केले. दुष्काळाची आपण राष्ट्रीय स्तरावर तुलना करू शकत नाही. देशातील अनेक भागात ४ वर्षांपासून पावसाची  अाेढ आहे. पाऊस फक्त ६० ते ८५ टक्के पडला. परंतु या स्थितीतही अन्य राज्यांपेक्षा आपली उत्पादनक्षमता खूपच वाढलेली आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतोय. एक ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्यासाठी दुष्काळावरही लक्ष देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागू नये आणि त्यांचे उत्पादन वाढावे यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून पीक विम्याची रक्कम देण्यापर्यंत अनेक योजना आहेत. 

बातम्या आणखी आहेत...