आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र बाहुबलीचा रथ कोण रोखणार?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय आवटे, संपादक
मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वात मोदी आणि अमित शहा यांचे ‘कॉम्बिनेशन’ आहे. मोदींप्रमाणेच ते एकचालकानुवर्ती ‘राज्य’ चालवतात. आणि, अमित शहा यांच्याप्रमाणे ‘इलेक्शन मोड’वर असतात.

हे उत्स्फूर्त असेल, तर ते लोकविलक्षण आहे. असं ‘केडर’ खरंच उभं राहिलेलं असेल, तर अव्वल दर्जाचं आहे. हे सारं इव्हेंट म्हणून ‘मॅनेज’ केलेलं असेल, तर हे व्यवस्थापन कमाल आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दुसऱ्या टप्प्यात आहे. अवघा महाराष्ट्र मुख्यमंत्री पिंजून काढत आहेत. ही यात्रा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काढलेली नाही, तर भाजपच्या प्रचाराची यात्रा आहे. अर्थात, ही यात्रा काढताना ‘मुख्यमंत्री’ म्हणून जे काही त्यांनी केलं, ते थेटपणे लोकांपर्यंत पोहोचवलं जातं आहे. या यात्रेला मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे. निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं अशा प्रकारे जनतेचा कौल मागणं अभूतपूर्व आहे. एखाद्या दाक्षिणात्य भव्यपटाची आठवण यावी, अशी नेपथ्यरचना या यात्रेची आहे. 

महापुरानंतरच्या आपत्ती व्यवस्थापनात सरकारला आलेले अपयश, विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांवर होणारा लाठीमार, मंदीमुळं बाजारात दिसणारी हताशा, शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेलं दैन्य असे सगळे मुद्दे एकवटलेले असतानाही या असंतोषाचा नायक होण्यात विरोधकांना यश येत नाही. अशा वेळी, असंतुष्ट वर्गानेही त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडेच पाहावे, अशी व्यूहरचना करण्यात देवेंद्रांना यश येत आहे. प्रश्न अनेक आहेत, पण सरकार गप्प बसलेले नाही. सतत प्रयत्न सुरू आहेत. आणि नवा महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने पावले पडत आहेत, असे पर्सेप्शन त्यांनी तयार केले आहे. आज जे प्रश्न आहेत, ते मागच्या सरकारने निर्माण केले आहेत आणि त्यावर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न मी करू पाहतो आहे, असे सांगत मुख्यमंत्री जनतेचा विश्वास मिळवू पाहत आहेत. 
मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे ‘कॉम्बिनेशन’ आहे. मोदींप्रमाणेच ते एकचालकानुवर्ती ‘राज्य’ चालवतात. आणि, अमित शहा यांच्याप्रमाणे ‘इलेक्शन मोड’वर असतात. 

शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विश्वास बाळगून असतात. सर्वसमावेशक, सुसंस्कृत अशी प्रतिमाही जपून असतात. 
सोमवारचा मुख्यमंत्र्यांचा दौरा नगर आणि बीड जिल्ह्यात होता. भल्या सकाळी मुंबईतून हेलिकॉप्टरने नगरला राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या घरी ते गेले. विखेंच्या आईंचे नुकतेच निधन झाले. त्यांचे सांत्वन करून, डॉ. सुजय विखेंना चॉपरमध्ये सोबत घेऊन मुख्यमंत्री दुपारी साडेबाराच्या सुमारास पाथर्डीत आले. पाथर्डी, आष्टी, जामखेड, बीड अशा चार सभा त्यांनी केल्या. सभेपेक्षाही महत्त्वाची आहे ती त्यांची रथयात्रा. मुख्यमंत्र्यांच्या या यात्रेसाठी खास रथ आहे. त्या रथात बसून प्रवास करताना, ठिकठिकाणी लोक त्यांचे स्वागत करत असतात. बाहेर खूप गर्दी असेल तर रथातील लिफ्टने वर येऊन खुल्या हवेत हात उंचावून मुख्यमंत्री लोकांना अभिवादन करताना दिसतात. एखादी सभाही त्या रथावर उभे राहून घेतात. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक मतदारसंघांचे आमदार, खासदार त्यांच्या सोबत असतात. सोमवारी पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, प्रा. राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार सुरेश धस असे रथी-महारथी त्या रथामध्ये होते. अशा प्रकारचे एकूण तीन रथ आहेत. मुख्यमंत्री सध्या जो रथ वापरताहेत, तो मध्य प्रदेशात डॉ. शिवराजसिंह चौहानांनी वापरलेला रथ आहे, असे केशव उपाध्ये सांगत होते. दिल्ली निवडणुकीत अमित शहांनी वापरलेला, उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांनी वापरलेला असे अन्य दोन रथ पर्यायी व्यवस्था म्हणून ठेवलेले आहेत. 

दोन सभांच्या मध्ये होणारा ‘रोड शो’ हे या यात्रेचे खरे वैशिष्ट्य. दरम्यान पत्रकारांनाही वेळ दिलेली असते. त्यांच्या मुलाखती सुरू असतात. इतर नेते, आमदार, खासदारांकडून त्यांना अपडेट्स मिळत असतात. भल्या सकाळी सुरू झालेला मुख्यमंत्र्यांचा दिवस रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. रथातील सर्वांसाठी चहापाण्यापासून जेवणापर्यंत सारी तयारी जय्यत असते. सोमवारी आमदार मोनिका राजळे यांच्याकडून आलेली भाकरी, थालीपीठ, मेथीची भाजी असा जेवणाचा बेत होता. मुख्यमंत्र्यांपासून ते बाकी सारेच त्याचा आस्वाद घेत होते. प्रत्येक सभेपूर्वी आणि सभेनंतर ब्लॅक कॉफी घेत मुख्यमंत्री घशाला शेक देत होते आणि पुढच्या सभेसाठी सज्ज होत होते. 
‘विठुरायाच्या दर्शनासाठी यात्रा निघते किंवा तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविक जातात, तशी ही यात्रा आहे. मी वारकरी आहे आणि माझं दैवत आहे, इथली सर्वसामान्य जनता....’ प्रत्येक भाषणाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री हे सांगतात, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होतो. समारोपाला ते कौल मागतात. ‘तुमचा आशीर्वाद मला आहे की नाही? मग त्या त्या मतदारसंघांतील आमदारांना, नेत्यांना तुमचा आशीर्वाद आहे की नाही?’ असा कौल ते मागतात. लोक दोन्ही हात उंचावून त्यांना पाठिंबा जाहीर करतात. सभा संपते आणि रथात बसलेले मुख्यमंत्री ठिकठिकाणचं अभिवादन स्वीकारत रोड शो सुरू करतात. महाजनादेश यात्रेचे सूत्रधार आहेत आमदार सुजितसिंह ठाकूर. सुमारे अडीचशे लोकांची टीम या इव्हेंटवर बारकाईने काम करतेय. ठाकुरांनी गोपीनाथ मुंडेंच्या संघर्ष यात्रेत काम केले आहे. शिवाय पंकजा मुंडेंच्या यात्रेची सूत्रे त्यांच्याकडे होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही ‘एक यात्रा मुझे दे दे ठाकूर’ अशी गळ त्यांना घातली, असे एक कार्यकर्ता गमतीने सांगत होता!

विरोधकांना ठोकून काढत, त्यांची रेवडी उडवत मुख्यमंत्री भाषण ठोकतात. मतदारसंघनिहाय काही बदल वगळले, तर बाकी भाषण ठरलेले असते. गेल्या सरकारची तुलना करत, आपल्या सरकारने कसे चांगले काम केले, याची यादी ते वाचून दाखवतात. ईव्हीएममुळे हरलो, असे म्हणणाऱ्यांना पेनमुळे पेपर चांगला गेला नाही, असा बहाणा देणाऱ्या नापास विद्यार्थ्याची उपमा देतात. भाषणाची सुरुवातच ‘भारतमाता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी करणाऱ्या मुखमंत्र्यांना खात्री असते की, ३७० आणि काश्मीरमुळे सध्याचा काळ आणखी अनुकूल आहे. त्यामुळे विरोधकांची खिल्ली, अच्छे दिनची ग्वाही आणि राष्ट्रवादाचा उन्माद अशा मिश्रणातून मुख्यमंत्री राणा भीमदेवी थाटात मांडणी करत असतात. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लोकांनी पर्यायही मानू नये, अशा प्रकारे त्यांना नेस्तनाबूत करण्याची खेळी खेळताना, आमच्यानंतर सर्वाधिक प्रतिसाद ‘वंचित बहुजन आघाडी’ला मिळतोय, हे मुलाखतीत सांगायला विसरत नाहीत. लोक आमच्याच सोबत आहेत. पण, ज्यांची आमच्याविषयी नाराजी आहे, ते आम्हाला नाही तर वंचितला मत देतील. पण, काँग्रेस अथवा राष्ट्रवादीकडे ढुंकूनही बघणार नाहीत, असे ते सांगत असतात. 

रथ जामखेडला पोहोचतो, तेव्हा दुपारचे चार वाजलेले असतात. डॉ. सुजय विखे रथामध्ये असतात. जामखेडची निवडणूक कमालीची चुरशीची. प्रा. राम शिंदेंसारखा तरुण मंत्री असला, तरी त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे ते रोहित पवारांनी. मराठा विरुद्ध ओबीसी अशी ही लढत होणार, अशी चर्चा सुरू आहे. जामखेडच्या सभेत मराठा संघटनांकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कार अगदी ऐनवेळी केला जातो. डॉ. सुजय विखे सांगतात, ‘जामखेडची लढत आहे घासूनच. पण, पवारांना आम्ही नगरमध्ये एंट्री कशी देऊ?’ डॉ. सुजय विखे, वैभव पिचड, निरंजन डावखरे ही तरुणाई भाजपमध्ये रमू लागलीय. मुख्यमंत्र्यांसाेबत त्यांचे सूर जुळताहेत. आणि, जे आधी भाजपमध्ये गेले, ते स्वतःला द्रष्टे वगैरेही मानताहेत. 

रात्री जेवणासाठी जामखेडच्याच एका छोट्या हॉटेलात गेलो. वेटरला म्हटलं, ‘काय विशेष आज?’ तो खुश होता. म्हणाला, ‘आज एक हजार रुपये मिळाले. शिवाय जेवण आणि बाकी सोयही...’ कारण विचारल्यावर सांगू लागला. ‘आज दोन सभा होत्या गावात. एक मुख्यमंत्र्यांची आणि दुसरी अमोल कोल्हेंची. दोघांकडून पाच-पाचशे रुपये घेतले. आणि, दोन्ही सभांमध्ये जाऊन घोषणा देऊन आलो.’.. ‘पण मग जिंकणार कोण?’ असे विचारल्यावर तो म्हणाला, ‘पैसे फेकेल तो जिंकेल!’
एकूण, बरे दिवस आलेत तर!

बातम्या आणखी आहेत...