आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mahaelection : काँग्रेस, वंचित आघाडीकडून उमेदवारांचा शोध सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व वंचित आघाडीने सक्षम उमेदवारांचा शोध चालवला आहे. दोन्ही पक्षांत इच्छुकांची भाऊ गर्दी मोठी असली तरी उमेदवार निवडताना दोन्ही पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे. सर्वार्थाने सक्षम व स्पर्धेत तग धरणारा उमेदवार शोधावा लागणार आहे.  


विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. अवघा तीन महिन्यांचा कालावधी राहिला असल्याने राजकीय पक्षाने चाचपणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील चार पैकी दोन विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस तर प्रत्येकी एका मतदारसंघावर शिवसेना व भाजपचे वर्चस्व आहे. त्यादृष्टीने या प्रस्थापित आमदारांसह पक्षातील अन्य इच्छुकांची संख्याही मोठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने चारही मतदारसंघासाठी मुलाखतीची प्रक्रिया एकवेळ मुंबईत तर दुसऱ्या वेळी परभणीत राबवली. काँग्रेस आघाडीत राष्ट्रवादीकडे जिंतूर व गंगाखेड राहण्याची शक्यता आहे. तरी देखील परभणी व पाथरीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. 


शिवसेना व भाजपने मात्र अद्याप या निवडणुकीच्या मुलाखतीबाबत फारशा हालचाली केलेल्या नाहीत. पक्षीय पातळीवर उमेदवार निश्‍चितीच्या दृष्टीने निश्‍चितच हालचाली होत आहेत. मात्र मुलाखतीचा सार्वजनिक सोपस्कार सेना-भाजपने अद्याप पार पाडलेला नाही. 


या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसनेही इच्छुकांचे अर्ज मागवले होते. हे अर्ज पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडे सोपवण्यात आले आहेत. त्यानंतर आता काँग्रेसकडून मुलाखतीचे सोपस्कार दि.२९ ते ३१ जुलै दरम्यान जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत. यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीकडे दाखल झालेल्या इच्छुकांच्या मुलाखती येथील शनिवार बाजार येथील काँग्रेसच्या राजीव भवनात होणार आहेत. यासाठी प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात यांनी मुलाखतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे निरीक्षक तीन दिवस काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती घेतील. परभणी मतदारसंघातून काँग्रेसच्या तब्बल १४ जणांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. पाथरीतून माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर यांचा एकमेव अर्ज आहे. 
 

वंचित बहुजनच्या उद्या मुलाखती
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मोठे मताधिक्य मिळवल्याने या आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी चारही मतदारसंघात इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. प्रस्थापित अनेक नेतेमंडळी त्यादृष्टीने आघाडीच्या संपर्कातही आहेत. अन्य पक्षातील हे बंडखोर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. आघाडीने त्यादृष्टीने जय्यत तयारी चालवली आहे. पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील, अशोक सोनवणे, रेखा ठाकूर, प्रा.किशन चव्हाण यांच्या उपस्थितीत शुक्रवारी(दि.२६) हॉटेल निरज इंटरनॅशनलच्या सभागृहात सकाळी दहा वाजता इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दादाराव पंडित यांच्याकडे क्रियाशील सभासद नोंदणी करून इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेऊन ते दाखल करावेत, असे आवाहन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.