MahaElection / MahaElection : काँग्रेसने सोडला ‘वंचित’चा नाद; आता बसपशी बाेलणी

अंतिम निर्णय सर्वस्वी मायावती यांच्याच हाती

अशोक अडसूळ

Sep 03,2019 07:26:00 AM IST

मुंबई - अॅड. प्रकाश आंबेडकर- खासदार ओवेसी यांची वंचित बहुजन आघाडी काही आपल्याबरोबर येणार नाही याची खात्री पटल्यावर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी आता ‘वंचित’चा नाद साेडला आहे. उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात अवतरलेल्या बहुजन समाज पक्षाशी (बसप) हातमिळवणी करण्याचे डावपेच आता काँग्रेसने सुरू केले आहेत.


कोरेगाव भीमा (जि. पुणे) हिंसाचारानंतर राज्यात दलित मतांचे जोरदार ध्रुवीकरण झाले. भारिपचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाला वलय प्राप्त झाले. त्यातून उभ्या राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपासून दलित मतांना तोडण्याची किमया केली. त्यामुळे दलित मतांच्या शोधात असलेल्या काँग्रेसला नवा भिडू हवा आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीसाठी काँग्रेसला ३१ आॅगस्टची डेडलाइन दिला होती. ती उलटून गेली आहे. त्यामुळे काँग्रेस-वंचित आघाडी एकत्र येण्याची आशा आता मावळली आहे.


काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे बसपशी बोलणी करत आहेत. मात्र आघाडीचा निर्णय सर्वस्वी पक्षाध्यक्ष मायावती यांच्या हाती आहे. त्यामुळे चर्चा पुढे जात नसल्याचे ठाकरे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.


बसपाचा ओढा वंचितकडे​​​​​​
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही समाजवादी पक्षाशी महाराष्ट्रात आघाडी केली होती. आता विधानसभेला आम्ही वंचित किंवा काँग्रेसपैकी एकाशी आघाडी करू इच्छितो, असे बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे म्हणाले.


बसपचा मतदार हा अनुसूचित जात वर्गातील आहे. त्यातही विदर्भात हा पक्ष मजबूत आहे. वंचितचा मतदार नवबौद्ध, धनगर जात गटातील असून पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात त्यांना जनाधार वाढत आहे. त्यामुळे विधानसभेला बसप - काँग्रेस एकत्र आल्यास दोघांनाही लाभ होऊ शकतो.

X
COMMENT