आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MahaElection: Constituency To BJP For Five Terms. Sharad Pawar's Grandson Rohit Now Faces A Bitter Challenge To Minister Ram Shinde

MahaElection : भाजपच्या किल्ल्याला पवारांचा वेढा; पाच टर्मपासून भाजपकडे मतदारसंघ, मंत्री राम शिंदे यांना आता शरद पवारांचे नातू रोहित यांच्याकडून कडवे आव्हान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड (जि. नगर) - एकासाठी मोठ्या साहेबांनी मतदारांचा आशीर्वाद मागितला तर दुसऱ्यासाठी थेट मुख्यमंत्री साहेब जनादेश मागत आहेत. एका बाजूला आमदार निधी, स्थानिक विकास निधीतून रस्त्याच्या बांधकामांचा आणि उद्घाटनांचा धडाका सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकार काही करत नाही म्हणून खासगी उद्योग समूहाच्या माध्यमातून मोफत पाणी वाटपाचे टँकर्स. हे चित्र आहे, राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे विरुद्ध पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे रोहित पवार यांच्यातील लढतीमुळे लक्षवेधी होणाऱ्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे.

दुष्काळ, कोरडवाहू शेती, ऊसतोडीसाठी २५% स्थलांतर, भटक्या जमातींचे सर्वाधिक वास्तव्य व ओबीसी विरुद्ध मराठा या जातीय समीकरणावर खेळली जाणारी लढाई हे येथील प्रत्येक निवडणुकीचे वैशिष्ट्य यावेळीही कायम आहे. भर पावसाळ्यात टँकरच्या प्रतीक्षेत रस्त्यांच्या कडेला असलेले निळे ड्रम येथील टंचाईची विदारकता सांगतात. कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा कर्जत - जामखेड मतदारसंघातील गावांत सध्या १२९ सरकारी टँकर सुरू आहेत. इथले आमदार कॅबिनेट मंत्री राम शिंदे रात्री उशिरापर्यंत कुकडी धरणाच्या चाऱ्या, अमृतलिंग पाणीपुरवठा योजना, बुछवडा जोड तलाव या पाणीपुरवठा योजनांची भूमिपूजने व उद्घाटने करत आहेत. प्रत्येक गल्लीत बारामती अॅग्रोच्या फलकावर पाणी पुरवठा करणाऱ्या रोहित पवारांच्या फोटोंचे टँकर फिरत आहेत. दीड-दोन वर्षांपासून रोहित पवारांची मोर्चेबांधणी सुरू आहे. महिलांसाठी पैठणी स्पर्धा, तरुणांसाठी कुस्ती स्पर्धा व शहरात मोफत पाणी वाटप सुरू आहे. शरद पवारांनी आतापर्यंत दोन वेळा येथे हजेरी लावून रोहित यांच्या प्रचाराचा अप्रत्यक्ष नारळ फोडला आहे. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीसांनी राम शिंदेंसाठी प्रचाराचा शुभारंभही केला आहे. 
 

तुल्यबळ लढत : ओबीसी, मराठा मतांवर दाेन्ही नेत्यांची मदार
दोन्ही वेळी ओबीसी, दलित, मुस्लिम व भटक्यांनी आपली मते राम शिंदेंच्या पारड्यात घातली होती. मात्र, यावेळी पवार आडनाव, मराठा समाज व बारामती अॅग्रो कंपनीची यंत्रणा आदी फौजफाट्यासह रोहित पवारांचे त्यांच्यासमोर तगडे आव्हान आहे. अन्य सर्व समाजांत  व सामाजिक चळवळींमध्ये अग्रणी जामखेडचे माजी सरपंच अॅड. अरुण जाधव हे वंचित आघाडीतर्फे प्रचार करीत आहेत.
 

राजकीय परिस्थिती : ‘माधव’ फाॅर्म्युला भाजपचे बलस्थान
गेल्या दोन निवडणुकांत माधव (माळी-धनगर-वंजारी) समीकरणावर शिंदेंनी मुसंडी मारली होती. गेल्या २५ वर्षांपासून येथून भाजपचाच आमदार आहे. ‘टीम फडणवीस’चा घटक असल्याने मतदारसंघातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या, जिल्हा बँका, कर्जत आणि जामखेड नगरपालिका भाजपच्या ताब्यात घेण्यात शिंदेंना यश आले आहे. 
 

असे आहेत प्रलंबित प्रश्न
रोजगार, पाणी आणि कोरडवाहू शेती हे येथील कळीचे प्रश्न.
कृषी महाविद्यालयाचे भूमिपूजन झाले, पण काम अद्याप बाकीच.
25% स्थलांतर ऊसतोडीसाठी, एकही मोठा उद्योग नाही
कुकडी योजनेतून पाणी कर्जतला आले, पण जामखेड शहर मात्र अद्याप तहानलेलेच अाहे.
शासकीय योजना व दाखल्यांपासून भटके विमुक्त समाज वंचित आहेत.
 
 

बातम्या आणखी आहेत...