आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारायगड - रायगडमधील श्रीवर्धन मतदारसंघ राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंचा बालेकिल्ला. मात्र २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार व सुनील तटकरेंचे पुतणे अवधूत तटकरे फक्त ७७ मतांनी विजयी झाले होते. आता अवधूत यांनी शिवबंधन बांधले आहे. यामुळे श्रीवर्धनमधून सुनील तटकरे यांच्या कन्या व रायगड जि. प. अध्यक्षा अदिती तटकरे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू शकतात. भावा-बहिणीतील ही लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
लोकसभेला याच मतदारसंघाने सुनील तटकरेंना ३४,८७१ मतांची भरघोस आघाडी दिली. विशेष म्हणजे मागच्या विधानसभेला अवधूत यांच्या प्रचाराला सुनील तटकरे यांची कन्या व मुलगा बाहेर पडले नाहीत. यातच काका-पुतणे यांचा वाद नव्याने उफाळून आला. राष्ट्रवादीचे आमदार असूनही अवधूत पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर राहू लागले. २०१६ ला अवधूत यांच्या छोट्या भावाने शिवसेनेत प्रवेश केला होता. सध्या रायगडमध्ये राष्ट्रवादीला शेकापची साथ आहे. श्रीवर्धन हा अंतुले यांचा पारंपरिक मतदारसंघ. येथील मुस्लिम नेहमीच काँग्रेसेसोबत राहिले. तटकरेंना त्याचा फायदा झाला. तटकरे यांनी मंत्रिपदाच्या काळात माेठा निधी श्रीवर्धनमध्ये आणला. ४५० कोटींची कामे केली. याशिवाय आमदार पुत्र अनिकेत, कन्या अदिती तटकरे यांचाही दांडगा जनसंपर्क आहे.
तटकरेंच्या घरात सर्वच आमदार, तरीही महत्त्वाकांक्षेमुळे फूट
राजकीय महत्त्वाकांक्षेतून तटकरे कुटुंबीयांत अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. ते शमवण्यासाठी राष्ट्रवादीला अनेक कसरती कराव्या लागल्या. एकाच घरातील िकती जणांना आमदारकी द्यावी यावरून संभ्रम होता. कार्यकर्ते तुटतील अशी भीती असतानाही तटकरेंसह भाऊ अनिल व पुतण्या अवधूत यांना आमदारकीची संधी दिली. आता सुनील यांच्या कन्या अदिती जिल्हा परिषद अध्यक्षा, तर पुत्र अनिकेत विधान परिषद आमदार झाले आहेत. तरीही अतिमहत्त्वकांक्षेमुळे या घराण्याला फुटीचे ग्रहण लागले.
महिलाच ठरवणार कोण असेल आमदार ?
श्रीवर्धन, तळा, म्हसळा, रोहा, माणगाव तालुक्यांमधील काही भाग मिळून हा मतदारसंघ आहे. मतदारसंघात एकूण २ लाख ४०,३१५ मतदार आहेत. यात १ लाख १७,७७६ पुरुष तर १ लाख २२,६३९ महिला मतदारांचा समावेश आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाण अधिक असणारा हा रायगड जिल्ह्यातील हा एकमेव मतदारसंघ आहे.
अवधूत यांचा फारसा लोकसंपर्क नाही, परंतु शिवसेनेकडे पर्यायही नाही
आमदार अवधूत तटकरे हे शिवसेनेतून लढण्याची तयारी करत असले तरी या भागात त्यांचा सुनील यांच्या तुलनेत फारसा संपर्क नाही. अाजवर जी कामे झाली ती सुनील यांच्यामुळेच अशी लाेकांमध्ये भावना अाहे. शिवसेनेतील काही जुने कार्यकर्ते उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक आहेत. त्यांची समजूत काढण्याचे मोठे काम अवधूत यांना करावे लागेल. विरोधात बहिण अदिती उमेदवार असल्या तरी अवधूत यांची खरी लढत सुनील यांच्याशी आहे. हे लक्षात घेता शिवसेनेला अवधूत तटकरे यांच्या पाठीशी भक्कम ताकद उभी करावी लागेलच.
जातीय समीकरणे काय सांगतात
या मतदारसंघात जातीय समीकरणांना कधीच महत्त्व नव्हते. माजी मुख्यमंत्री अंतुले ४ वेळा काँग्रेसचे आमदार झाले. त्यानंतर ३ वेळा शिवसेनेचे श्याम सावंत. त्यानंतर हा मतदारसंघ तटकरे घराण्याकडे राहिला. तटकरे हे पूर्णतः अल्पसंख्याक असलेल्या गवळी समाजातून येतात. मात्र, तटकरेंचा सर्वत्र लोकसंपर्क आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.