आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : सत्ता बदलली; लातूरची तहान कायम, लातूरचे आमदार अमित देशमुखांवर कार्यकर्त्यांचाच राेष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर एमआयडीसीमध्ये उद्याेगांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागते. - Divya Marathi
लातूर एमआयडीसीमध्ये उद्याेगांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागते.

लातूर - २०१४ विधानसभा निवडणुकीत लातूरमधून ४९ हजार मताधिक्याने विजयी झालेले अमित देशमुख यांच्यासमाेर यंदा भाजपने तगडे आव्हान निर्माण केले आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हयात असेपर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचे एकहाती वर्चस्व हाेते, मात्र त्यांच्या पश्चात पक्षाला उतरती कळा लागली. विलासराव सुमारे ९ वर्षे मुख्यमंत्री हाेते, तरीही लातूरकरांच्या पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजाही पूर्ण हाेऊ शकलेल्या नाहीत. गेल्या पाच वर्षांत लातूर जिल्ह्यातील अनेक संस्थांवर भाजपने वर्चस्व निर्माण केले. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात भाजपने लातूर मनपात प्रथमच सत्ता मिळवली. मात्र जनतेचे प्रश्न मात्र कायम आहेत. भरपावसाळ्यात लातूरकर तहानलेले आहेत. पाऊस पडला नाही तर पुन्हा वाॅटर ट्रेनसाठी साकडे घालावे लागेल. उजनीचे पाणी आणण्याचे भाजपचे आश्वासन हवेतच राहिले. शहराजवळ दाेन एमआयडीसी आहेत, मात्र एकही माेठा उद्याेग नसल्याने तरुणांच्या हाताला काम नाही. जे छाेटे उद्याेग हाेते ते पाण्याअभावी बंद पडले. रेल्वे डब्याचा कारखान्याचे सत्ताधाऱ्यांनी भूमिपूजन केले, भाजप प्रचारातही त्याचा डंका पिटत आहे. मात्र अजून कारखाना उभारलेलाच नाही. 
 

जागा शिवसेनेची, आता भाजपचा दावा
लातूर विधानसभेची जागा युतीत आजवर शिवसेनेकडे हाेती, मात्र आता भाजपचे वर्चस्व वाढल्याने ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी पालकमंत्री निलंगेकर प्रयत्नशील आहेत. अमित देशमुख यांची काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित मानली जाते. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या पत्नी प्रतिभाताईंनीही काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे, तर भाजपकडून शहराध्यक्ष शैलेश लाहाेटी, अजित पाटील कव्हेकर, प्रेरणा होनराव यांची नावे आहेत. शैक्षणिक संस्था व सामाजिक कामामुळे लाहोटींचा दांडगा जनसंपर्क आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक राजा मणियार हे वंचित आघाडीकडून इच्छुक आहेत.
 

लातूरचे आमदार अमित देशमुखांवर कार्यकर्त्यांचाच राेष
काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांचा विलासरावांप्रमाणे जनसंपर्क नसल्याचे स्थानिक लाेक व कार्यकर्त्यांची तक्रार आहे. लातूरपेक्षा जास्त काळ ते मुंबईतच असतात, असेही सांगितले जाते. त्याचा परिणाम काँग्रेसची लाेकप्रियता घटण्यात झाली. शहरी मतदारांनी महापालिका भाजपच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. हा विश्वास परत मिळवण्याचे देशमुखांपुढे आव्हानच असेल. 
 

कारखाने, बँकांवर देशमुखांचे वर्चस्व
मांजरा, विकास व रेणा या साखर कारखान्यांवर देशमुखांचे वर्चस्व आहे. शिवाय पंचायत समिती, जिल्हा बँक, कृउबाही ताब्यात आहे. विलासरावांना मानणारा निष्ठावंत वर्ग ही देशमुखांसाठी जमेची बाजू आहे. देशमुखांना आमदारकीची हॅट््ट्रिक साधण्याची संधी असली तरी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. वंचित आघाडी डाेकेदुखी ठरू शकते.

मतदारसंघातील जातीय समीकरणे 
लातूर शहर मतदारसंघात मराठा, लिंगायत, दलित व मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. यातील दलित व मुस्लिम हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. मात्र हा मतदार आता काही प्रमाणात वंचित आघाडीकडे झुकला आहे. त्याचा काँग्रेसला फटका बसू शकतो. देशात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने यंदा लातूरचा निकाल बदलेल, असा दावा भाजपकडून केला जात आहे.