आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : युतीत जागावाटपाचे त्रांगडे सुटणार कसे? भाजपने २०१४ मध्ये सेनेच्या पूर्वीच्या ३९ जागा जिंकल्या, शिवसेनेचाही भाजपच्या ५ जागी झेंडा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठी विशेष - २००९ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत युतीनेच निवडणुका लढवणाऱ्या शिवसेना-भाजपतील मैत्रीत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दुरावा निर्माण झाला. लाेकसभा निवडणुकीत माेदी लाटेमुळे मिळालेल्या भरघाेस यशामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपने सहा महिन्यांतच आलेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला. आजवर छाेट्या भावाच्या भूमिकेत असलेल्या मित्रानेच पाठीत खंजीर खुपसल्याचा आराेप करत मग शिवसेनेनेही हे आव्हान स्वीकारत शड‌्डू ठाेकला. या निवडणुकीत दाेन्ही पक्षांनी स्वबळ आजमावले आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसविराेधी राज्यभर असलेल्या वातावरणाचा दाेघांनाही लाभ झाला. २००९ च्या निवडणुकीत शिवसेना १६० व भाजप ११९ असे युतीतील जागावाटप झाले हाेते. मात्र २०१४ मध्ये छाेट्या मित्रपक्षांना काही जागा साेडत भाजपने २८८ पैकी २६० जागा लढवल्या. २००९ च्या तुलनेत त्या १४१ जास्त हाेत्या. शिवसेनेने २००९ मध्ये युतीत १६० जागा लढवल्या हाेत्या. स्वबळावर लढताना त्यांनी २०१४ मध्ये २८२ मतदारसंघांत उमेदवार उतरवून राज्यभर आपल्या ताकदीची चाचपणी केली हाेती. या लढाईत १२२ मतदारसंघांत भाजपचे आमदार निवडून आले. यात २००९ मध्ये युतीच्या जागा वाटपात शिवसेनेसाठी साेडण्यात आलेल्या तब्बल ३९ जागा भाजपने आपल्याकडे खेचून आणल्या. तर ६३ आमदार निवडून आणणाऱ्या शिवसेनेनेही पूर्वी भाजपसाठी २००९ मध्ये साेडलेल्या ५ जागांवर आपला आमदार निवडून आणला. आता ५ वर्षांनंतर युतीची नाळ पुन्हा जुळली. मात्र आता शिवसेनेपेक्षा जवळपास दुपटीने आमदार असल्याने भाजप थाेरल्या भावाच्या भूमिकेत आला आहे. २०१९ विधानसभा निवडणुकीत फिफ्टी-फिफ्टी जागावाटपाची सेनेची अट आहे. २००९ मध्ये आपल्याकडे असलेल्या जागा परत आपल्याला मिळाव्यात, यासाठी शिवसेना आग्रही आहे. मात्र विद्यमान आमदार असलेल्या जागा भाजप साेडणार नाही. जिंकलेल्या जागा साेडून इतर जागा फिफ्टी-फिफ्टी असा फाॅर्म्युलाही भाजपकडून सांगितला जात आहे. ताे शिवसेनेला मान्य नाही. अशा परिस्थितीत जागावाटपाचे त्रांगडे कसे सुटेल? की पुन्हा स्वबळाचा सूर आळवला जाईल, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे.
 

२०१४ : शिवसेनेचे हे प्रमुख उमेदवार भाजपकडून पराभूत
१) सुभाष देसाई (गाेरेगाव)    विद्या ठाकूर    (विजयी)
२) सुरेश जैन (जळगाव शहर)    सुरेश भाेळे    (विजयी)
३) गाेपीकिशन बाजाेरिया (अकाेला पूर्व)    रणधीर सावरकर    (विजयी)
४) अभिजित आनंदराव अडसूळ (दर्यापूर)    रमेश बुंदेले    (विजयी)
५) संताेष सांबरे (बदनापूर)    नारायण कुचे    (विजयी)
६) अंबादास दानवे (गंगापूर)    प्रशांत बंब    (विजयी)
७) अजय बाेरास्ते (नाशिक मध्य)    देवयानी फरांदे    (विजयी)
८) रवींद्र फाटक (ठाणे)    संजय केळकर    (विजयी)
९) विनाेद घाेसाळकर (दहिसर)    मनीषा चाैधरी    (विजयी)
१०) जयवंत परब (अंधेरी पश्चिम)    अमित साटम    (विजयी)
११) शशिकांत पाटकर (विलेपार्ले)    पराग आळवणी    (विजयी)
१२) महादेव बाबर (हडपसर)    याेगेश टिळेकर    (विजयी)
१३) आशुताेष काळे (काेपरगाव)    स्नेहलता काेल्हे    (विजयी)
१४) गणेश वानकर (दक्षिण साेलापूर)    सुभाष देशमुख    (विजयी)
 

विभागनिहाय शिवसेनेवर भाजपची मात
> उ. महाराष्ट्र    ०६
> विदर्भ    १४
> मराठवाडा    ०३
> मुंबई/ काेकण    ०९
> प. महाराष्ट्र    ०७
 

या ५ मतदारसंघांत सेनेची भाजपवर मात
> भिवंडी ग्रामीण {चेंबूर
> कलिना {पिंपरी
> रत्नागिरी
> भाजपच्या ज्या जागा शिवसेनेच्या उमेदवारांनी पटकावल्या आहेत त्यात मात्र भाजपचा एकही दिग्गज नेता पराभूत झालेला नाही, हे विशेष.
 
 

बातम्या आणखी आहेत...