आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : महत्त्वाचे नेते भाजपसोबत, लढायचं कोणासोबत हाच प्रश्न : मुख्यमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार/दोंडाईचा/धुळे - राज्यातील महत्त्वाचे नेते भाजपसोबत येत आहेत. त्यामुळे लढायचे कोणासोबत हा प्रश्न मला पडला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात गुरुवारी दुपारी धुळे येथील रोड शोने झाली. त्यानंतर त्यांची शिंदखेडा तालुक्यातील दाेंडाईचा आणि नंदुरबार येथे सभा झाली या वेळी ते बोलत होते. शरद पवार आणि अशोक चव्हाण यांनी आमच्या मेगा भरतीची चिंता करू नये, त्याऐवजी त्यांनी त्यांच्या महागळतीची काळजी करावी. तुमच्याकडे थांबायला कोणीही तयार नाही त्याचीच काळजी करा, असा खोचक सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला. १५ वर्षांत अाघाडी सरकारला जे जमले नाही ते पाच वर्षांत आम्ही करून दाखवले आहे, असा दावा करत जलयुक्त शिवार योजनेद्वारे महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही विरोधी पक्षात असताना संघर्ष यात्रा काढली होती. आता सत्तेत आल्यावर पाच वर्षांत केलेली कामे जनतेसमोर मांडण्यासाठी संवाद यात्रा काढली आहे. ५ वर्षांत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे,असेही ते म्हणाले. 
भरत गावित यांचा प्रवेश : या वेळी सातपूडा सहकारी कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, भरत गावित, किरसिंग वसावे, विजय पराडके, रामचंद्र पाटील आदींनी भाजपत प्रवेश केला. पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हिना गावित, आमदार विजयकुमार गावित, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. 
 

सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगले आणि डॉ. गावित आल्या तर वाईट ?
सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगले आणि डॉ. हिना गावित निवडून आल्या तर ईव्हीएम वाईट. भाजपने माणसांच्या मनामध्ये घर केले. म्हणून भाजप सत्तेत आला. विरोधकांनी नेहमीच मुजोरी केली. जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. भाजपची सत्ता आल्यानंतर सर्व समस्या सोडवल्या, असा दावा मी कधीच केला नाही. परंतु अनेक समस्या सोडवल्या. जे काम काँग्रेेस व राष्ट्रवादीने पंधरा वर्षांत केले त्यापेक्षाही दुप्पट  कामे पाच वर्षांत झाली. 

बातम्या आणखी आहेत...