आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MahaElection: In The Next Five Years, The Marathwada District Will Be Free From Drought; Chief Minister Fadnavis' Testimony

MahaElection : पुढील पाच वर्षांत जिल्ह्यासह मराठवाडा दुष्काळमुक्त करू; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी/कडा  - पुढील पाच वर्षांत बीड जिल्ह्यासह मराठवाडा दुष्काळमुक्त करू. कृष्णेचे पाणी बीड जिल्ह्यात आणू, तर कोकणातून समुद्राला वाहून जाणारे पाणी  गोदावरी खोऱ्यात आणून मराठवाड्यात वॉटरग्रीडच्या माध्यमातून दुष्काळ हटवू, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी आष्टी तालुक्यातील कडा येथे महाजनादेश यात्रेत सभेप्रसंगी बोलताना सांगितले. 

नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा ताफा आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे पोहोचला तेव्हा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी या महाजनादेश यात्रेचे स्वागत केले. कडा येथील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठवाड्याला आता आम्ही दुष्काळमुक्त करणार असून बीड जिल्ह्याला कृष्णा खोऱ्याचे पाणी मिळणारच आहे.  येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. कोकणातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचे कामदेखील येणाऱ्या काळात होणार आहे.आम्हाला फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या जाहीर सभेस पालकमंत्री  पंकजा मुंडे,जलसंधारणमंत्री राम शिंदे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, नगरचे खासदार सुजय विखे, आमदार संगीता ठोंबरे, लक्ष्मण पवार, शिवाजी कर्डिले, निरंजन डावखरे, सुजितसिंह ठाकूर, मोनिका राजळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये, माजी आमदार साहेबराव दरेकर आदी उपस्थित होते.  

समृद्ध महाराष्ट्र करण्यासाठी ही यात्रा :
पाच वर्षांत शेतकऱ्यांना आत्तापर्यंत ३० हजार कोटींची मदत केली. विरोधक केवळ २०  हजार कोटींची मदत करत होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत पाच वर्षात ३० हजार किलोमीटर रस्त्यांचे काम केले. पैकी २२ हजार  किलोमीटरचे काम पूर्ण झाले. ७ लाख घरे बांधून देण्याचे काम केले. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जिल्ह्यात  रेल्वेचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. समृद्ध महाराष्ट्र करण्यासाठी महाजनादेश यात्रा असून जनतेचा आशीर्वाद हा जनादेश आहे. 
 

आमची सत्ता आली की घोटाळा कसा वाटतो ? 
 आमचे दैवत म्हणजे ही जनता असून म्हणूनच महाजनादेश ही यात्रा  आहे. विरोधात असलो की संघर्ष यात्रा आणि सत्तेत असलो की संवाद यात्राच  असते. राष्ट्रवादीने काढलेल्या संघर्ष यात्रेला  प्रतिसादच मिळाला नाही. मग हल्लाबोल यात्रा काढली. त्यालाही कुणीच प्रतिसाद दिला नाही. ईव्हीएमने हरलो म्हणणारांना २००४  पासून सत्ता होती त्या वेळेस ईव्हीएम चांगले वाटले  आणि आमची सत्ता आली की घोटाळा कसा वाटत आहे?  त्यामुळे येणारी २५ वर्षे आता आमची सत्ता आहे. सुप्रियाताई निवडून आल्या की गप्प आणि प्रीतमतार्इ निवडून आल्या की ईव्हीएम घोटाळा म्हणायचं. मुळात जनताच राष्ट्रवादीला वैतागलेली आहे हे लक्षात घ्या, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडा येथील भाषणात सांगितले. 
 
 
 

बातम्या आणखी आहेत...