आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MahaElection: MLA Amit Deshmukh Promises To Reach BJP! Amit Deshmukh Neither Denies Nor Agrees

MahaElection : आमदार अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या! अमित देशमुखांकडून इन्कारही नाही अन् होकारही नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - राज्यात सध्या सेना-भाजपत मेगा भरती सुरू असून त्यामध्ये दररोज एक-दोन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नावांची भर पडत आहे. त्याच शृंखलेत लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्याही नावाची भर पडली असून त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सध्या लातूरमध्ये सुरू आहे. काँग्रेस कार्यकर्तेही एकमेकांना खासगीत याबाबत विचारून आपली उत्सुकता शमवून घेत आहेत. मात्र या अफवांमध्ये खरेच काही तथ्य आहे की महायुतीच्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक वावड्या उठवून काही नेत्यांबद्दल संशय निर्माण केला जात आहे, याबाबत साशंकता आहे.

लोकसभा निवडणुकीत देशात सत्तांतर होईल. भाजप सत्तेबाहेर जाईल. त्यानंतर विधानसभेतही त्याचीच पुनरावृत्ती होऊन आपण सत्तेवर येऊ अशी आशा राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना होती. परंतु लोकसभेत धक्कादायक निकाल लागल्यानंतर आपल्याला सत्तेत रहायचे असेल तर भाजप-सेना जवळ केल्याशिवाय पर्याय नाही हे कळून चुकलेले अनेक चतुर राजकारणी भाजप-सेनेत सामील झाले. मुख्यमंत्र्यांनी तर याला मेगा भरती असे म्हणत अनेकांसाठी प्रवेशाची दारे खुली केली. काही जण आत्ता आले आहेत तर काही जण वेटिंगवर आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेकांबद्दल संशय निर्माण केला. त्यातलेच एक नाव म्हणजे लातूरचे आमदार अमित देशमुख यांचे होय. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव असलेले अमित लातूरमधून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते शेवटचे तीन महिने राज्यमंत्रीही राहिले आहेत. अगदी त्यांच्या जन्मापासून सत्ता पाहिलेल्या अमित देशमुखांना मागील पाच वर्षात सत्तेविना राहण्याचे दुष्परिणाम काय असतात याचा अनुभव आला आहे. राज्य आणि देशातील बदललेले वातावरण पाहता त्यांनी भाजपत जावे, असा सल्ला त्यांना अनेकांनी दिला आहे. मात्र संयमी अमित देशमुखांनी याबाबतचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. मागील आठवड्यात त्यांच्या साखर कारखान्यांच्या, जिल्हा बँकेच्या आणि एका खासगी बँकेची सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये भाषण करताना अमित देशमुख, त्यांचे काका माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी भाजप-सेनेवर जोरदार टीका केली. सर्वच कार्यक्रमांच्या बॅनरवर काँग्रेसी नेत्यांची छायाचित्रे झळकत होती. तर दुसरीकडे या कार्यक्रमांना आलेल्या देशमुख समर्थकांमध्ये मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्यांविषयीची कुजबूज सुरू होती. दबक्या आवाजात होणाऱ्या या चर्चा देशमुख कुटुंबीयांपर्यंत पोहाेचल्या नाहीत असे नव्हे. परंतु त्यावर मौन बाळगण्याचे राजकीय चातुर्य त्यांच्यात नक्कीच आहे.
 

अमित देशमुखांचे मौन
भाजपा प्रवेशाच्या वावड्यांबाबत आमदार अमित देशमुख यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी तातडीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, त्यांनी आपल्या संभाव्य भाजप प्रवेशाचा इन्कारही केला नाही की होकारही दिलेला नाही. त्यामुळे त्यांचे या विषयावरचे मौन सूचक आहे की त्यात आणखी काही अर्थ दडला आहे, हे स्पष्ट झाले नाही.
 

काँग्रेसमध्ये संधी मिळत नसल्याची भावना; नूतन कार्यकारिणीतही डावलले 
> अमित  देशमुखांमध्ये क्षमता असूनही काँग्रेस नेतृत्वाकडून त्यांना संधी मिळत नसल्याची त्यांच्या समर्थकांची भावना आहे. विलासरावांना मानणारा काँग्रेसमधील गट अमित देशमुखांच्या पाठीशी होता. 
 
> अमित यांना प्रारंभी मंत्रिमंडळात सामील करून घेतले नाही. मुदत संपायला तीन महिने उरल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी राज्यमंत्रिपद दिले. 
 
> मागील पाच वर्षांत पक्षाकडून विधिमंडळातही बोलण्याची संधी ज्येष्ठ मंडळी द्यायची नाही. प्रदेश पातळीवर नुकतेच बदल झाले. त्यामध्येही अमित यांना डावलण्यात आले. 
 
> उलट लातूर जिल्ह्यातल्या औशाचे आमदार असलेल्या बसवराज पाटलांना कार्याध्यक्षपदी नेमण्यात आलेे. या डावलण्याच्या राजकारणामुळेही अमित देशमुखांच्या समर्थकांत अस्वस्थता आहे.
 

विलासराव म्हणायचे.. आमच्या रक्तातली काँग्रेस कशी काढणार ?  
दिवंगत विलासराव देशमुखांनी आपली राजकीय कारकीर्द काँग्रेसमधून सुरू केली होती. प्रारंभी बाभळगावचे सरपंच, पंचायत समितीचे उपसभापती, सभापती, आमदार, विविध खात्यांचे मंत्री, दोन वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशा पदांवर काम केलेल्या विलासरावांचा १९९५ साली पराभव झाला होता. त्यावेळी त्यांनी राजकीय सल्लागारांचे ऐकून शिवसेनेच्या मदतीने विधान परिषदेची निवडणूक लढली होती. त्या काळात त्यांना काँग्रेसमधून काढूनही टाकण्यात आले होते. त्यावर विलासरावांनी आम्हाला काँग्रेसमधून काढता येईल, पण आमच्या रक्तातील काँग्रेस कशी काढणार असा सवाल विचारला होता. त्याची त्यावेळी मोठी चर्चाही झाली होती.  
 

लातूर भाजपच्या टार्गेटवर
दरम्यान, लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन भाजपकडे आणि तीन काँग्रेसकडे आहेत. त्यातील लातूर मतदारसंघ मिळवायचाच असा चंग भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी बांधला आहे. लातूर मतदारसंघात भाजपकडे देशमुखांचा पराभव करेल असा उमेदवार आजघडीला तरी नाही. त्यामुळे त्यांनाच भाजपत आणता येईल का, याची चाचपणी झाल्याचे कळते. पण त्याला देशमुखांनी कसा प्रतिसाद दिला हे समोर आलेले नाही. 
 
 

बातम्या आणखी आहेत...