आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड - ‘या दळभद्री सरकारच्या कार्यकाळात आतापर्यंत माझ्या १६ हजार शेतकरी भगिनी विधवा झाल्या आहेत. आपले संसार उभे करणारे हे नव्हे, तर ते उद्ध्वस्त करणारे हे सरकार आहे, हे जनतेने लक्षात घ्यावे. त्यामुळे आपल्या विचाराचे सरकार आणायला सहकार्य करा,’ असे आवाहन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त किनवट तालुक्यात आयाेजित सभेत ते बाेलत हाेते. विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमाेल काेल्हे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
धनंजय मुंडे म्हणालेे, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले होते, माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावता कामा नये. तसे राज्य आपल्याला हवे आहे म्हणून ही शिवस्वराज्य यात्रा आम्ही काढली आहे. शेतकऱ्यांचे सरकार म्हणता, मग शेतकऱ्यांची का फसवणूक करत आहात? शेतकऱ्यांची जात समूळ नष्ट करण्याचे काम सरकार करत आहे,’ असा आराेपही त्यांनी केला. शिवस्वराज्य यात्रा काढल्याशिवाय महाराष्ट्रातील जनतेच्या मनात परिवर्तन होणार नाही म्हणून ही यात्रा आहे, असेही ते म्हणाले. सभेत आमदार प्रदीप नाईक, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी यांनी आपले विचार मांडले.
कर्जमाफीचे आश्वासन
नांदेड जिल्ह्यातून ही यात्रा यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली. पुसद येथेही अजित पवारांसह इतर नेत्यांची जाहीर सभा झाली. ‘आमचं सरकार आल्यावर तत्काळ कर्जमाफी देवून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही,’ आश्वासन अजित पवारांनी या सभेत दिले. वसंतराव नाईक सुधाकर नाईक, शरद पवार यांनी राज्याला दिशा दिली परंतु यांनी आताच्या सत्ताधाऱ्यांनी राज्य कंगाल करुन टाकले आहे या सरकारने पाच वर्षांत किती शेतकऱ्यांचे सातबारा कोरा केला ते जाहीर करावे असे आव्हान अजित पवारांनी दिले.
राज्यात अस्वस्थता आहे. चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. राज ठाकरे यांची चौकशी होत आहे. पी. चिदंबरम यांचीही चौकशी केली जात आहे. करा चौकशी परंतु ज्यापध्दतीचे राजकारण केले जात आहे हे योग्य नाही असेही अजितदादा पवार म्हणाले.
खासदार काेल्हे म्हणाले, ‘शेतकऱ्यांची क्रुर थट्टा भाजप सरकारने केली आहे. जनतेशी त्यांची काय बांधिलकी आहे हे पुरग्रस्त जनतेला केलेल्या कामावरूनच लक्षात येते.’
माहूरगडावर दर्शन
माहूरगडावरील रेणुकादेवीचे दर्शन घेऊन शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात करण्यात आली. सारखणी - किनवट येथील सभेच्या ठिकाणी जाताना भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. काम केले तर सांगण्याची गरज भासत नाही. काम केले नाही तर ऊर बडवून सांगावे लागते, अशा शब्दांत डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर निशाणा साधला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.