आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र रथ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेने अर्धा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. कुठे रोड शो, तर कुठे सभा, असे जोरदार शक्तिप्रदर्शन पाहायला मिळत आहे. खान्देश आणि त्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, मराठवाड्यात त्यांची यात्रा पोहोचली. या भागातील त्यांच्या दौऱ्यात काही सभा ऐकल्या. सर्वच ठिकाणी ते जनतेशी संवाद साधताना गत पाच वर्षांत सरकारने काय कामे केली? यावरच अधिक भर देत आहेत. तसेच त्यांच्या भाषणाआधी स्थानिक आमदार, मंत्र्यांना बोलायला संधी दिली जाते. हे स्थानिक लोकप्रतिनिधी जे प्रश्न प्रलंबित आहेत किंवा लोकांनी मागणी करूनही सुटलेले नाहीत, असे प्रश्न मांडतात आणि मुख्यमंत्री हे प्रश्न सोडवण्याचे आश्वासित करतात. त्यानंतर उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट होतो. उत्स्फूर्त प्रतिसादानंतर रथ पुढच्या गावाकडे झेपावतो. मध्ये, मध्ये ते रथात बसून प्रसार माध्यमांना मनमोकळेपणे मुलाखती देत आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी त्यांनी मुद्दाम पत्रकार परिषदा घेतल्या. तेथून येणारे प्रश्नही त्यांना ठाऊक असतात. त्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी चपखल उत्तरे दिली आहेत. शिवसेनेशी आमची युती कायम आहे, असे मुख्यमंत्री पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगत असले तरी त्यांच्या बोलण्यात तेवढा आत्मविश्वास दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट मान्य केली आणि ती म्हणजे जेथे आमची ताकद नाही, तेथे आम्ही नेत्यांना पारखून प्रवेश देत आहोत. प्रतिस्पर्धी नेत्यांच्या प्रभावामुळे भाजपची ताकद कमी पडत आहे. त्यात कोकण आणि खान्देशचा समावेश आहे. त्यामुळे खान्देशातील आमदार अमरीशभाई पटेल आणि कोकणातून नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. हे दोन नेते जर भाजपत आले तर कमीत कमी पाच ते सहा आमदारांनी भाजपचे संख्याबळ वाढणार आहे. मुख्यमंत्री खान्देशात असताना त्यांनी धुळे, भुसावळ येथे मुक्काम करून पत्रकार परिषदा घेतल्या. दोन्ही ठिकाणी त्यांना अपेक्षित प्रश्न विचारले गेले. एक म्हणजे नवीन प्रवेश कुणाचे होणार आणि खडसेंचे पुढे काय? त्यांनी दोन्ही ठिकाणी सूचक वक्तव्य केले. पण मुक्कामादरम्यान त्यांनी माहिती घेऊन जवळच्या लोकांशी चर्चा करून लवकरच खान्देश आणि कोकणात काही पक्ष प्रवेश होऊ शकतात हे त्यांच्या बोलण्यातून अधोरेखित झाले. याचाच अर्थ आतापर्यंत अनेक नेत्यांनी यात्रा काढल्या, पण व्यवस्थापन जे फडणवीसांचे आहे, ते कुणालाच जमले नाही. अख्खा महाराष्ट्र ते पिंजून काढणार आहेत. कारण पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री व्हायचे आहे. सरकार युतीचे असले तरी. महाजनादेश यात्रा ही फडणवीस यांची आहे. महाराष्ट्रातील यापूर्वीचे सरकार कसे कुचकामी ठरले आणि महाराष्ट्रात आम्ही कसा बदल घडवून आणला, हे सांगताना त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार किमान १० वर्षे सत्तेवर येणार नाही, याची व्यवस्था करताना कोणताही नामोल्लेख न करता सेनेलाही मागे सोडले आहे.  जसे देशात नरेंद्र मोदींचा विजयी रथ कुणी रोखू शकले नाही, तेच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना घडवायचे आहे. देशात भाजपचे प्रादेशिक पक्षांशी गठबंधन असले तरी त्यांची मदत फक्त एखादे ३७० कलम रद्दचे बिल पास करण्यापुरतीच घेतली जाते. सरकार चालवण्यासाठी नाही. महाराष्ट्रातही तेच होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला फोडून आधीच अशक्त केले आहे. तथापि शिवसेना विरोधात नको म्हणून भाजपला त्यांची सोबत हवी आहे. सरकार मात्र भाजपलाच चालवायचे आहे. कारण फडणवीसांचा महाजनादेश यात्रेचा उद्देश एक असला तरी कारणे मात्र अनेक आहेत. हे आता लपून राहिलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...