आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MahaElection: National Samajwadi Party Demand For 14 Seats In The Assembly Elections

MahaElection : राष्ट्रीय समाज पक्षाचे मुंबईत शक्तिप्रदर्शन; विधानसभा निवडणुकीत १४ जागांची मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धनगर व इतर मागासवर्गीय समाजाच्या वाट्याला वंचना आली होती. युती सरकारने मात्र धनगर समाजाला २२ योजना देत हजार कोटींची तरतूद केली. समाजाचे ६० टक्के प्रश्न मार्गी लागले असून मोदी-फडणवीस धनगरांचे प्रश्न सोडवू शकतात, असे सांगत आपलं भलं महायुतीतच आहे, अशी साद राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर घातली.

दादरमधील शिवाजी पार्कवर रासपचा रविवारी मेळावा पार पडला. त्याला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे मुख्य अतिथी म्हणून हजर होत्या. मेळाव्याच्या निमित्ताने जानकर यांनी शक्तिप्रदर्शन घडवले. जानकर म्हणाले की, २०१४ मध्ये युतीने आम्हाला ६ जागा दिल्या होत्या. त्या वेळी रासपच्या जि. प.च्या अवघ्या दोन जागा होत्या. आता ९८ जागा आहेत. पक्षाची ताकद वाढली असून या वेळी आम्हाला १४ जागा हव्या आहेत. पक्ष स्थापनेपासून म्हणजे १६ वर्षे २४ तास झटतो आहे. पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवायची आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आम्ही कमळावर लढवणार नाही. पक्षाला मिळेल त्या चिन्हावर लढू, असे त्यांनी जाहीर केले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. आता धनगर समाजालाही मिळेल, असा दावा जानकर यांनी केला. मुख्यमंत्री रासपच्या मेळाव्याला येणार होते, मात्र अरुण जेटली यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी ते दिल्लीला गेले. त्यामुळे मुख्यमंत्र्याविना मेळावा पार पडला.  व्यासपीठावर राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भाजप आमदार प्रवीण दरेकर, रासपचे आमदार राहुल कुल, शेळी-मेंढी महामंडळ अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. एल. अक्कीसागर, श्रद्धा भातंब्रेकर, चित्रपट निर्माता अजय अरोरा आणि अभिनेत्री सपना बेदी यांची उपस्थिती होती.
 
सन्मानाची भाजपची ग्वाही
महादेव जानकर यांची औकात आता चौकापुरती नसून ती शिवाजी पार्कापर्यंत पोहोचली आहे. रासप आता वटवृक्ष होण्याच्या मार्गावर असून जानकर यांना विधानसभेला योग्य त्या जागा देऊन सन्मान केला जाईल, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
 
पक्षमान्यतेसाठी १४ जागा
आगामी विधानसभेसाठी आपली ५७ जागांची मागणी कायम आहे. पण पक्षाला मान्यता मिळण्यासाठी १२ आमदार किंवा ६ टक्के मते लागतात. म्हणून किमान १४ जागा आपण मागितल्या आहेत, असा खुलासा जानकर यांनी केला. जानकर यांच्या ९१ वर्षांच्या मातोश्री सगुणाबाई जानकर उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...