Home | VidhanSabha 2019 | MahaElection: NCP found in trouble, got The basis of Dr Amol Kolhe

MahaElection : अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला डॉ. अमोल कोल्हेंचा आधार

तुषार खरात, | Update - Aug 08, 2019, 08:22 AM IST

डॉ. काेल्हे यांचा राष्ट्रवादीला निश्चित फायदा -  विकास लवांडे, प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

 • MahaElection: NCP found in trouble, got The basis of Dr Amol Kolhe

  मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका आणि आता राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला भगदाड पडले आहे. अनेक नेते पक्ष सोडून भाजप व शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. पक्ष अडचणीत सापडला असताना नवनिर्वाचित खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची पक्षाला मदत होत आहे. डॉ. कोल्हे यांच्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळत आहे, शिवाय सामान्य जनतेलाही ते आकर्षित करत आहेत. त्यामुळे अडचणीच्या काळात डॉ. कोल्हे पक्षासाठी तारणहार ठरत आहेत.


  जाहीर सभा, लोकसभेचे सभागृह किंवा नुकतीच सुरू झालेली शिवस्वराज्य यात्रा अशा ठिकाणी डॉ. कोल्हे प्रभाव पाडत आहेत. छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांच्या भूमिका त्यांनी साकारल्याने तरुण, महिला व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी कुतूहल आहे. डॉ. कोल्हे यांची ही जमेची बाजू आहे. दुसऱ्या बाजूला ते कसलेल्या राजकीय नेत्याप्रमाणे भाषणेही करत आहेत. उच्च विद्याविभूषित असलेले डॉ. कोल्हे भाषणांमध्ये मुद्देनिहाय मांडणी करत आहेत. त्याला अभ्यासाची व प्रभावी वक्तृत्वाची जोड आहे. त्यांची मांडणी, शब्दफेक व देहबोली यामुळे सभेतील लोकांना आपलेसे करण्यात यशस्वी होत आहे. आपण विरोधी पक्षाचे खासदार आहोत, याचे पुरते डावपेच डॉ. कोल्हे यांना ठाऊक झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच ते आपल्या भाषणांमधून केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका करत आहेत.


  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जयंत पाटील यांच्या भाषणांना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. परंतु हे सगळे चेहरे जनतेला ठाऊक आहेत. लोकांसाठी त्यात काहीही नावीन्य राहिलेले नाही. लोकांनी या नेत्यांची भाषणे वारंवार ऐकलेली आहेत. काही वादग्रस्त विषयही या नेत्यांना चिकटलेले आहेत. त्यामुळे हे सगळे नेते प्रभावी असले तरी पक्षाला ऊर्जितावस्था देताना तेदेखील हतबल झाल्याचे दिसत आहे. दुसऱ्या बाजूला विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, शिवेंद्रराजे भोसले, सचिन अहीर, जयदत्त क्षीरसागर, चित्रा वाघ असे महत्त्वाचे नेते पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह भरण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्यापासून सगळेच प्रमुख नेते करत आहेत. पण डॉ. अमोल कोल्हे हे पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी नवा चेहरा आहेत. त्यांच्याविषयी सगळ्यांमध्येच कुतूहल आहे. अशातच ते प्रभावी भाषणे झोडू लागल्याने पक्षासाठी त्यांचा मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.


  शिवस्वराज्य यात्रेमध्ये कोल्हे यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. राष्ट्रवादीने पक्षाची सनद बनवली आहे. यात्रेत या सनदेची शपथ डॉ. कोल्हे सगळ्यांना देत आहेत. विद्यमान सरकार असंवेदशील आहे. त्यांना जागे करण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. रयतेचे राज्य आणण्यासाठी ही यात्रा आहे. भाजप - शिवसेनेने सत्तेत असूनही काहीच केले नाही, म्हणून त्यांना महाजनादेश यात्रा काढावी लागत आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची जहागिरी दिलेली नाही, असे मुद्दे डॉ. कोल्हे मांडत आहेत अन् या मुद्द्यांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  डॉ. काेल्हे यांचा राष्ट्रवादीला निश्चित फायदा
  डॉ. कोल्हे अभिनेते असल्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविषयी उत्सुकता आहे. ते वैचारिक, सामाजिक व राजकीय विषयांची मांडणीही उत्तम पद्धतीने करत आहेत. शिवस्वराज्य यात्रेतील पुणे - नगरच्या सभांमध्ये त्यांची भाषणे प्रभावी झाली आहेत. विरोधी पक्षाचे काम काय असते हे डॉ. कोल्हे यांना नीट समजले असून त्यानुसार ते सत्ताधारी पक्षावर योग्य पद्धतीने प्रहार करत आहेत. डॉ. कोल्हे यांचा पक्षासाठी निश्चितच फायदा होत आहे.
  विकास लवांडे, प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

Trending