आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : राष्ट्रवादी काँग्रेस साेडण्याच्या तयारीत रामराजेंचे युतीच्या दाेन्ही डगरींवर हात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसलेंपाठाेपाठ राष्ट्रवादीचे आणखी दिग्गज नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरही पक्षाला साेडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा असली तरी राजकीय साेयीसाठी ते शिवसेनेचाही मार्ग पत्करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

शरद पवारांचे निकटवर्तीय असलेलेे रामराजे १९९१ पासून राजकारणात आहेत. नगराध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री, सभापती अशी पदे त्यांनी भूषवली. १९९९ मध्ये अजित पवार साताऱ्याचे पालकमंत्री झाले. त्यामुळे रामराजेंचा प्रभाव फलटण- खंडाळ्यापुरता मर्यादित राहिला. २००४ मध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले, तरीही त्यांना साताऱ्याचे पालकत्व मिळाले नाही. ९१ व्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाच्या संख्येवर मर्यादा आली. २००३ मध्ये ती लागू झाली. त्या वेळी मंत्रिमंडळात ६९ सदस्य हाेते, नव्या नियमानुसार लाला दिवा गमवावा लागणाऱ्या २७ जणांत रामराजेही हाेते. मंत्रिपदावरून पत्ता कट हाेण्यामागे काही कारणे हाेती. २००२ मध्ये सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीप्रणीत पॅनलचा प्रस्ताव रामराजेंसह काही नेत्यांनी झुगारला हाेता. पुढे रामराजे पुन्हा मंत्री व पालकमंत्रीही झाले. पण त्यांना फ्री हँड कधीच मिळाला नाही. २००९ मध्ये त्यांचा मतदारसंघ राखीव झाल्याने काही दिवस आमदारकीशिवाय राहीले. पुन्हा विधान परिषदेवर संधी मिळाली, मंत्रीही झाले. मात्र पुन्हा त्यांच्या जागी शशिकांत शिंदेंची मंत्रिपदी वर्णी लागली.  २०१४ मध्ये राष्ट्रवादीने रामराजेंना विधान परिषदेचे सभापती केले. मात्र उदयनराजे भाेसले व रामराजेंचे एकाच पक्षात असूनही कधीच पटले नाही. शिरवळ-खंडाळ्याची एमआयडीसी, सातारचे टोलनाके हे त्यांच्या मतभेदांचे विषय हाेते. जाहीरपणे ते एकमेकांविराेधात बाेलत. पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी करूनही वाद मिटले नाहीत. लाेकसभा निवडणुकीत उदयनराजेंच्या उमेदवारीला रामराजे समर्थक शिवेंद्रसिंहराजेंनी विराेध केला. पुढे रामराजेंचे समर्थक असलेले राष्ट्रवादीतील नेते नरेंद्र पाटील शिवसेनेत गेलेे. त्यांनी लाेकसभेला उदयनराजेंविराेधात लढतही दिली. निवडणुकीदरम्यान शरद पवारांनी साताऱ्यातील दुफळी शमवण्याचा प्रयत्न केला, मात्र रामराजेंनी गैरहजर राहणे पसंत केले. विधानसभेसाठी अजित पवारांनी साताऱ्यात राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, तिथेही रामराजेंनी शेवटी हजेरी लावली. शिवेंद्रराजेंनीही दांडी मारली, नंतर त्यांनी पक्षही साेडला.  

फलटणची जागा शिवसेनेकडे जाणार
सध्या विधान परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे बहुमत राहिलेले नाही, त्यामुळे सभापतिपद राखणे रामराजेंना जमणार नाही. पुन्हा आमदारकीची संधी मिळणेही कठीणच आहे. त्यामुळे ते पक्ष साेडण्याच्या मन:स्थितीत आहेत. काँग्रेसमधून गेलेले रणजितसिंह यांनी भाजपची खासदारकी मिळवून जिल्ह्याच्या राजकारणात आधीच वजन वाढवून घेतले आहे. त्यातच रामराजेंचा फलटण मतदारसंघ शिवसेनेला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजे भाजपत जातील की शिवसेनेत, याविषयी संभ्रम आहे.

बातम्या आणखी आहेत...