आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : मागील मतांच्या आधारावर परभणी विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेपेक्षा जास्त मते मिळाली. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला परभणी विधानसभेतून मोठे मताधिक्य मिळाल्याच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेसने हा मतदारसंघ आघाडीतून राष्ट्रवादीला सोडावा, अशी मागणी  महापालिकेचे माजी गटनेते जलालोद्दीन काझी यांनी रविवारी (दि.आठ) पत्रकार परिषदत केली.  आपण या जागेच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी  सांगितले. त्यामुळे काँग्रेस आघाडीत या जागेवरून बेबनाव निर्माण होण्याची शक्यता आहे.   

जिल्ह्यातील चारपैकी गंगाखेड व जिंतूर हे दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचे आ.डाॅ.मधुसूदन केंद्रे व आ. विजय भांबळे हे दोघे विधानसभेत प्रतिनिधित्व करीत असल्याने या दोन्ही जागा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणे स्पष्टच आहे. परभणी हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच २००४ पासून काँग्रेसकडे राहिलेला आहे. १९९९ मध्ये दोन्ही काँग्रेस स्वतंत्र्यरीत्या लढली होती. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस रिंगणात उतरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप देशमुख यांना  १२ हजार मते मिळाली होती तर काँग्रेसचे इरफानूर रहेमान खान यांना केवळ साडेसात हजार मते मिळाली होती. त्यावेळी दोन्ही काॅंग्रेसचे डिपाॅझिटही जप्त झाले होते. तरीही दोन्ही काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी सरस ठरली होती. याच आधारावर पारंपारिकरीत्या काँग्रेसकडे असलेल्या या मतदारसंघावर काही दिवसांपूर्वीच माजी महापौर प्रताप देशमुख यांनी २०१४ मध्ये मिळालेली मते व लोकसभेत राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांना मिळालेले ३० हजारावर मतांचे अधिक्य, या आधारे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. 
 

तीनच नगरसेवकांची उपस्थिती
जलालोद्दीन काझी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या गटाचे समर्थक आहेत. मनपाच्या स्वीकृत सदस्यपदाच्या निवडीत  बाबाजानी यांनी निश्चित केलेल्या नावाला विजय जामकर व १३ नगरसेवकांनी विरोध करीत शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार यांच्या पुढाकाराने जोरदार विरोध दर्शवला होता.  त्यानंतरही आ.बाबाजानी यांनी निश्चित केलेले नाव स्वीकृत सदस्यपदी निश्चित झाल्याने पक्षातील गटबाजी प्रकर्षाने समोर आलेली आहे.  काझींच्या पत्रकार परिषदेस आ.बाबाजानी समर्थक तीन नगरसेवक उपस्थित होते.