आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MahaElection : राष्ट्रवादीच्या साेळंकेंचा प्रचार सुरू; भाजपत तिकिटाची स्पर्धा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव - वडवणी, धारूर व माजलगाव या तालुक्यांचा समावेश असलेल्या माजलगाव मतदारसंघावर सलग १५ वर्षे पकड ठेवणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंकेंचा गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आर. टी. देशमुख यांनी तब्बल ३७ हजार मतांनी पराभव केला. मात्र, गेली पाच वर्षे पुन्हा जाेर लावत सोळंकेंनी जिल्हा परिषद, पंचायत समितीत यश मिळवले. आता विधानसभेसाठी पुन्हा राष्ट्रवादीकडून साेळंकेच उमेदवार असतील. त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. भाजपकडून मात्र आमदार आर. टी. देशमुख यांना बाजीराव जगताप यांचे पुत्र मोहन जगताप, माजी आमदार बाबूराव आडसकर यांचे पुत्र रमेश आडसकर यांच्याशी स्पर्धा करावी लागत आहे. 

प्रकाश सोळंके दाेन टर्म भाजपकडून, तर २००९ मध्ये राष्ट्रवादीचे आमदार हाेते. आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही मिळाले. मात्र गेल्या वेळी भाजपच्या लाटेत पराभूत झाले. पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या मदतीने देशमुख यांनी ५ वर्षात माेठ्या प्रमाणावर निधी आणला. वडवणी नगरपंचायत, धारूर व माजलगाव पालिका भाजपच्या ताब्यात आहे. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत देशमुखांचे  चिरंजीव रोहित यांच्यासह इतर समर्थकांचा साेळंके गटाकडून पराभव झाला. दरम्यान, मोहन जगताप यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासह रमेश आडसकरांना विधानसभेचे तिकीट हवे आहे. माजी आमदार केशव आंधळे, मुख्यमंत्री साहाय्यता कक्ष निधी प्रमुख ओमप्रकाश शेटे, बाबरी मुंडे हेही चर्चेत आहेत. त्यामुळे उमेदवारी काेणाला द्यावी, असा पेच पंकजा मुंडेंसमाेर आहे. १९९५ मध्ये माजलगाव मतदारसंघ शिवसेनेकडे हाेता. ताे पुन्हा मिळावा यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक प्रयत्नशील आहेत.
 

हे असू शकतात संभाव्य उमेदवार 
राष्ट्रवादीकडून प्रकाश सोळंके यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. भाजपकडून आर. टी. देशमुख, मोहन जगताप, रमेश आडसकर, केशवराव आंधळे यांच्यात स्पर्धा आहे. युती न झाल्यास शिवसेनेकडून सचिन मुळूक, सतीश साेळंके यांचे नाव पुढे आहे. काँग्रेसकडून नारायण होके, वंचित बहुजन आघाडीकडून धम्मानंद साळवे, डॉ.भगवान सरोदे, श्रीराम खळगे इच्छुक आहेत. 
 

या आहेत मतदारसंघातील समस्या
शहर व परिसरात पाणीटंचाईची माेठी समस्या आहे.  माजलगाव येथे एमआयडीसी अद्याप सुरू नाही. पाणी उपलब्ध होत असताना औद्योगिक विकास नसल्याने रोजगाराचा प्रश्न आहे. यासह अनेक ठिकाणी आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला. उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता असतानाही जागेअभावी काम रखडले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार भाव काही कारखान्यांवर मिळत नाही. ग्रामीण भागातले ३० टक्के रस्त्यांचे कामे रखडलेले आहे.
 

२०१४ मधील विधानसभेची स्थिती
आर. टी. देशमुख :   भाजप     १,१२,४९७
प्रकाश सोळंके  :   राष्ट्रवादी    ७५,२५२
नारायण होकेे  :  काँग्रेस    ४,८५८ 
सतीश सोळंके   :     शिवसेना      ३,९४९
 

बातम्या आणखी आहेत...