MahaElection / MahaElection : उत्तर महाराष्ट्र भाजप-सेना युतीच्या प्रभावाखाली

उत्तर महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय चित्र : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची पीछेहाट

जयप्रकाश पवार

Sep 07,2019 08:32:00 AM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी सुरू झाल्या आहेत. काँग्रेस वा राष्ट्रवादीची पिढ्यान‌्पिढ्या पाठराखण करणारी अनेक घराणी भाजप वा शिवसेनेच्या प्रभाव छत्राखाली मुकाटपणे दाखल झालीत वा होताहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीपर्यंत विरोधी पक्षात कोणी शिल्लक राहतो की नाही अशी शोचनीय स्थिती आहे. थोडक्यात काय तर, लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीतील मोदी लाटेचा सर्वदूर झालेला परिणाम आजही दिसत असून त्याचीच पुनरावृत्ती तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणुकीत होऊन विद्यमान सरकारची दशकपूर्तीच्या दिशेने वाटचाल व्हावी या दृष्टीने आमदारांच्या संख्येचे बळ या पाचही जिल्ह्यांतून मिळू शकेल असे एकूण चित्र आहे.


अलीकडच्या काळात उत्तर महाराष्ट्रातील राजकीय चित्र पूर्णत: बदलले आहे. लोकसभा अन् पाठोपाठ विधानसभेच्या सलग दोन निवडणुकांमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या रीतीने राजकीय ध्रुवीकरण झाले वा जाणीवपूर्वक घडविले गेले त्याचे दृश्य परिणाम येत्या काळात दिसू लागतील. याचे प्रमुख कारण असे की, सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीने राज्यभरात शक्य होईल त्या त्या मतदारसंघातील काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारंपरिक घराण्यांना असो, की त्या त्या ठिकाणच्या मुखंडांच्या हातात पक्षाचा झेंडा वा शिवबंधन बांधल्यामुळे वातावरण एकतर्फी करण्याचा डाव साधला आहे. याची सुरुवात सर्वप्रथम अहमदनगर जिल्ह्यातून झाली. काँग्रेसचे सर्वाधिक प्रभावशाली नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मुलगा डॉ. सुजय यांच्या पक्षप्रवेशानंतर अवघ्या उत्तर महाराष्ट्रातच पक्षातरांची घाईगर्दी सुरू झाली. त्याचे लोण नाशिक, धुळे, नंदुरबार इथपर्यंत पोहाेचले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात मंडळी इकडून तिकडे धावू लागली. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असतानाही भाजपने त्या कुटुंबाला पावन करून घेण्याची भूमिका घेतल्यानंतर कुंपणावर बसलेल्या मंडळींमध्ये दिलासादायक चित्र निर्माण झाले. आदिवासीबहुल नंदुरबार हा काँग्रेसचा अभेद्य गड. त्याच जिल्ह्याचे रहिवासी माणिकराव गावित अन् काँग्रेस असे चार दशकांहून अधिक काळ नंदुरबारचे समीकरण होते. कारण, माणिकराव तब्बल नऊ वेळा काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून जात होते. पण झाले काय, राजकीय हवामानाची दिशा बदलली तसे गावित कुटुंबातील मुलगा भाजपत अन् आमदार असलेली मुलगी निर्मलाताईंनी शिवबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सध्या तरी माजी मंत्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक यांचा अपवाद वगळता सर्वच बुरुज ढासळल्यागत चित्र आहे. नाशिक जिल्हा हा एकेकाळी शरद पवारांना आंदण दिल्यागत होता. कारण या जिल्ह्याने एकहाती म्हणजे त्या काळी सर्वच्या सर्व जागा साहेबांच्या पारड्यात टाकल्या होत्या. काळ बदलला. डॉ. दौलतराव आहेर यांच्या रूपाने भाजपला नाशिक जिल्ह्यात दमदार नेता मिळाला. नाशिक विधानसभेची जागा ४ वेळा पक्षाकडे ठेवण्याचे दायित्व त्यांनी पार पाडले. अन्य मतदारसंघांत काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप, सेना आळीपाळीने ताबा घेत राहिले; परंतु नाशिकची जागा भाजपच्याच वाट्याला आली. त्याचे कारण ‘सेवाव्रतीं’चं मोठं जाळं या भागात राहिले आहे. लोकसभेला शिवसेना अन् विधानसभेला भाजप असे समीकरण रुजले आहे. मध्येच महाराष्ट्र मनसेने नाशिकमधील विधानसभेच्या तीन जागा व महापालिकेची सत्ता काबीज करून भाजपच्या गडावर हल्लाबोल केला. पण तो औटघटकेचा ठरला. तथापि, नाशिक तीर्थक्षेत्री कधीच एका पक्षाचा वरचष्मा राहू शकलेला नाही. सद्य:स्थितीतही भाजप ४, शिवसेना ४, राष्ट्रवादी ४, काँग्रेस २ अन् माकप १ असे समसमान वाटप होईल याची दक्षता स्थानिक मतदारांनी घेतली आहे. परंतु, हे चित्र येत्या काळात बदलेल असे संकेत आता मिळताहेत.

उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख प्रश्न...
महाराष्ट्रातून गुजरातला जाणारे पाणी गोदावरी, मोसम, गिरणा नद्यांच्या खोऱ्यात वळविण्यासंबंधीचा विषय बहुचर्चित आहे. त्यावर अद्याप तरी तोडगा निघू शकलेला नाही. नाशिक जिल्ह्यातील मांजरपाडा धरणातील पाण्याचा विषयही प्रचंड गाजला होता. भुजबळांनी या प्रश्नासाठी पाठपुरावा केला. निवडणुकीच्या तोंडावर तो सोडविण्यात सरकारला यश आले आहे. कांद्याच्या भावासह नाशिक-पुणे महामार्गाचा प्रश्नही प्रलंबित आहे.

> काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक घराणी भाजप-शिवसेना युतीच्या वळचणीला; निवडणुकीपर्यंत विरोधी पक्षांची आणखी शोचनीय स्थिती

> पक्षांतराच्या तडाख्यात विरोधी पक्षांच्या शिडातील हवाच होत आहे गुल

अहमदनगर : राजकीय घराण्यांचा मतदारसंघ

येथे विधानसभेचे १२ मतदारसंघ आहेत. लोकसभेपासून येथील राजकारण भगवेमय झाल्यागत आहे. हा जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. विखे, काळे, कोल्हे, थोरात, गडाख, तनपुरे, पिचड अशा घराण्यांची परंपरा आहे. कालौघात त्यातील काही घराणी हळूहळू प्रवाहाच्या बाहेर गेलीत, काही टिकून आहेत. विखे व थोरात ही त्यापैकीच प्रमुख घराणी. थोरात घराणे काँग्रेसनिष्ठ तर विखेंनी काँग्रेस सोडली आहे. येत्या निवडणुकीत कुणाचा पाडाव होते, याकडे लक्ष लागले आहे. या अगोदर राष्ट्रवादी अन् नंतरच्या काळात भाजप-सेनेच्या दावणीला कुठले ना कुठले घराणे बांधले गेले आहे. मतितार्थ काय, संगमनेरचा अपवाद वगळता हा जिल्हा काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त होण्याच्या मार्गावर दिसत आहे. आजघडीला कोपरगाव, राहुरी, कर्जत-जामखेड, पाथर्डी-शेवगाव, नेवासा हे भाजपकडे आहेत. जिल्ह्यातील दोन्ही खासदार याच पक्षाचे आहेत. पारनेर हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. आदिवासीबहुल अकोले, नगर तालुका व श्रीगोंदा यावर राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे. पण, राष्ट्रवादीच्या वरच्या फळीतील नेते पुत्रासह भाजपत दाखल झाल्याने आजच्या घडीला हा मतदारसंघही हातचा गेल्यागत स्थिती आहे. राहिला प्रश्न काँग्रेसचा. संगमनेर, शिर्डी व श्रीरामपूर यावर सध्यातरी काँग्रेसचा ताबा आहे. विधानसभा निवडणुकीच्या घटकेपर्यंत आज दिसते तसे चित्र उद्या अबाधित राहीलच याची शाश्वती देणे अवघड आहे.

नाशिक : राजकीय वैविध्याचा मतदारसंघ
एकूण १५ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील नाशिक, नाशिक मध्य व पूर्व अन् चांदवड-देवळा हे भाजपकडे आहेत. नाशिकरोड-देवळाली, सिन्नर, निफाड, मालेगाव बाह्य हे सेनेच्या ताब्यात आहेत. नाशिकरोड व मालेगाव बाह्यमधून शिवसेना उमेदवारांची हॅटट्रिक झाली आहे. निफाड त्या मार्गावर आहे. आदिवासीबहुल कळवण-सुरगाण्याचा पट्टा माकपकडे आहे. माकपनेदेखील साडेतीन दशकांपासून या मतदारसंघात ठाण मांडले आहे. म्हणजे एकेकाळी गमतीने म्हणायचे, पश्चिम बंगालपाठोपाठ केवळ सुरगाण्यातच माकपची सत्ता तीन दशकांहून अधिक काळ टिकली आहे. साहेबांच्या प्रेमाखातर राष्ट्रवादीनेही बराच काळ टिकाव धरला आहे. येवला, नांदगाव, दिंडोरी व बागलाण हे राष्ट्रवादीकडे आहेत. काँग्रेसची स्थिती अधिकच शाेचनीय झाली आहे. कारण, इगतपुरी व मुस्लिमबहुल मालेगाव मध्य या दोन्ही मतदारसंघातून काँग्रेस विजयी झाली होती. साथी निहालभाईंच्या जाण्याआधीच ही जागा काँग्रेसकडे गेली होती. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत येथून काँग्रेसच्या उमेदवाराची पाठराखण प्रचंड मताधिक्क्याने होत असते. त्यामुळे एका अर्थाने काँग्रेसच्या दृष्टीने हा मतदारसंघ सुरक्षित असला तरी तिकडे इगतपुरीमध्ये काँग्रेसच्या विद्यमान आमदारांनी हाताची साथ सोडत शिवबंधन बांधण्याची भूमिका घेतली आहे. आज इगतपुरी निवडणुकीआधीच काँग्रेसमुक्त झाल्याची स्थिती आहे.

जळगाव, धुळे आणि नंदुरबार : भाजपची मुसंडी

११ मतदारसंघ आहेत. पारोळा, अमळनेर वगळता सर्वत्र युतीचे वर्चस्व आहे. जिल्ह्याचे राजकारण खडसे, महाजन, जैन, चौधरींभोवती केंद्रित राहिले आहे. जळगावसह धुळे ५, नंदुरबार ४ अशा दोन्ही जिल्ह्यांत २० मतदारसंघ आहेत. २० पैकी १० जागी भाजप, ३ जागा सेनेच्या ताब्यात आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्यामुळे खान्देशची भूमी अधिकच चर्चेत आहे. परंतु, याच पक्षाचे ज्येष्ठ नेते नाथाभाऊ हेदेखील मुक्ताईनगरातून पक्ष संघटना वा शिस्त याबाबत अधूनमधून ‘मुक्त संवाद’ करीत असतात. पण, धरले की चावते अन् सोडले की पळते अशी स्थिती नेतृत्वाची असल्याने लोकसभा निवडणुकीतही त्यांच्याच घरात उमेदवारी देण्याची वेळ पक्षावर आली होती. भाजपकडे जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर व चाळीसगाव तसेच शिवसेनेकडे चोपडा, पाचोरा व जळगाव ग्रामीण हे मतदारसंघ आहेत. पारोळ्यात राष्ट्रवादी तर अमळनेरमधून अपक्ष उमेदवार जिंकला होता. धुळ्यातील वातावरण भाजपचेच बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्यामुळे राज्यभर गाजले. या जिल्ह्यातील पाचपैकी धुळे ग्रामीण, शिरपूर व साक्री या मतदारसंघांवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. धुळे व शिंदखेडा या जागा भाजपकडे गेल्या होत्या. नंदुरबार जिल्ह्यात भ्रष्टाचाराचे आरोप असलेले माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रवेशानंतर राजकारण काँग्रेसऐवजी भाजपभोवती केंद्रित झाले आहे. त्यांचे एकेकाळचे विरोधक काँग्रेसचे माणिकराव गावित यांच्या कुटुंबातीलच घटक भाजप-सेनेत विभागले गेले आहेत. नंदुरबारदेखील काँग्रेसपासून मुक्त होण्याच्या मार्गावर दिसत आहे.

X फॅक्टर :

> येवला : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मतदारसंघात विकासपुरुष म्हणून ओळख असली तरी ईडीच्या तुरुंगवारीनंतर त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहाेचला आहे. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

> नांदगाव : छगन भुजबळांचे पुत्र पंकज यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीत ठरेल.

> संगमनेर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासमोर त्यांचेच परंपरागत प्रतिस्पर्धी राधाकृष्ण विखे यांच्याकडून होणाऱ्या गनिमी काव्याला प्रत्युत्तर देण्याचे आव्हान उभे राहू शकते.

> मुक्ताईनगर : एकनाथ खडसे यांना भाजप उमेदवारी देणार की नाही हाच खरा प्रश्न आहे.

> जळगाव : सुरेशदादा जैन यांचे राजकीय भवितव्य काय असणार, हेही कळेल.

> देवळाली : शिवसेना घोलप पिता-पुत्रापैकी कोणाला उमेदवारी देणार.

X
COMMENT