आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकांसाठी आम्हाला यात्रा काढायची गरज नाही, प्रकाश आंबेडकर यांचा फडणवीसांना टोला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - निवडणुकांसाठी आम्हाला कोणतीही यात्रा काढायची गरज नाही. आम्ही लोकसभेच्या वेळेसच जमिनीची मशागत करून ठेवली आहे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता रवी भवन येथे पत्रकारांशी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १ आॅगस्ट रोजी महाजनादेश यात्रा काढत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता ते बोलत होते. यात्रेशिवाय आम्ही निवडणुका जिंकू शकतो, असे ते म्हणाले.    


आयडियालॉजीचे राजकारण कमी झाले आहे. अनेक दिवस एका पक्षात राहून आपल्याला स्थान मिळत नाही हे पाहून अनेक जण बाहेर पडत आहेत. हे फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच नव्हे, तर भाजप शिवसेनेमध्ये हेच होत असल्याचे सांगत आंबेडकर यांनी पक्षबदल करणाऱ्यांवर टीका केली. 


तिसऱ्या आघाडीसंदर्भात आम्ही ठाम आहोत. मात्र, उरलेले लोक ठाम नाहीत, असे म्हणावे लागेल. अनेक जण वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे कोण आमच्यासोबत येईल आणि कोण येणार नाही हे आताच सांगता येणार नाही. सीपीएममधला एक गट आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी आमच्यासोबत आहे. इतरांसोबत चर्चा सुरू असल्याचे आंबेडकर म्हणाले. येत्या १० ऑगस्टपर्यंत आघाडीचे चित्र स्पष्ट होणे अपेक्षित आहे. न झाल्यास १५ ऑगस्टनंतर आमचे उमेदवार जाहीर करणे सुरू करू. त्याच वेळी आमचे धोरणही जाहीर करू, असे ते म्हणाले. 


आघाडीमध्ये वंचितचा समावेश असेल : पवार
वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभा निवडणुकीत १२ ठिकाणी कॉँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साेलापुरात शुक्रवारी सांगितले. पवार म्हणाले, राज्यस्तरावर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांसाेबत चर्चा सुरू आहे. २८८ जागांच्या वाटपाबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी व वंचितचे नेते निर्णय घेतील. संबंधित जागेवरील राजकीय ताकद, भौगोलिक स्थिती याचा विचार करून जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी होणारच आहे, यामुळे कार्यकर्ते-पदाधिकारी यांना कोणतीही शंका राहण्याचा विषयच नसल्याचे पवार यांनी सांगितले.  दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेस वंचित आघाडीच्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांना गळ घालत आहेत. मात्र, आता या वर १० ऑगस्टनंतरच निर्णय होईल. दुसरीकडे काँग्रेस नेतेही आघाडीमध्ये वंचितमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे.


काँग्रेसकडून ऑफर आली, आत्ता उत्तराची वाट
काँग्रेसचे राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्व वेगवेगळी भाषा बोलते. त्यांच्यातच एकवाक्यता नाही. दुर्दैवाने काँग्रेस-राष्ट्रवादीचे राज्याचे नेतृत्व कुटुंबवादी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी कुटुंबशाहीची आघाडी आहे. त्यांच्या याच कुटुंबशाहीच्या राजकारणामुळे मागील निवडणुकीत त्यांना अपयश आले. काँग्रेसकडून ऑफर आली आहे. पत्रव्यवहारही झाला आहे. आता काँग्रेसच्या उत्तराची वाट असल्याचे आंबेडकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...