आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी पक्षातील चार आमदार माझ्या बंगल्यावर, 17 आमदार संपर्कात : केंद्रीय मंत्री दानवेंचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - विरोधी पक्षातील १७ आमदार माझ्या संपर्कात असून त्यापैकी चार आमदार सध्या भोकरदनच्या बंगल्यावर आहेत. विश्वास वाटत नसेल तर आपण येऊन बघा, असा दावा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा जालना दौरा आणि मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते.  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत बुधवारी जालना येथे विजयी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय बुधवारीच दुपारी १२.३० वाजता महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस भोकरदन येथे जाहीर सभा घेणार आहेत, अशी माहिती मंत्री दानवे यांनी या वेळी दिली. राष्ट्रवादीने त्यांच्या झेंड्यासोबतच भगवा झेंडाही फडकवण्याचा निर्णय घेतला आहे, असा टाेला दानवे यांनी लगावला. ते म्हणाले अखेर राष्ट्रवादीला भगव्याची आठवण झाली आहे. परंतु त्यांच्या झेंड्याचा दांडा आमच्या हातात आहे, असे दानवे म्हणाले. विरोधी पक्षातून भाजपत येणाऱ्या कोणत्याही आमदाराला उमेदवारी देण्याचे आमिष दाखवलेले नाही. आताही १७ आमदार वेटिंगमध्ये आहेत. त्यापैकी चार आमदार आपल्या भोकरदनच्या बंगल्यावर थांबले आहेत, असा दावा दानवे यांनी केला.  आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे, असे दानवे म्हणाले. राज्य सहकारी बॅँकेतील घोटाळा प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसारच गुन्हे दाखल होत आहेत. ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यामुळे तत्कालीन संचालक मंडळांविरुद्ध सुडाचं राजकारण होत असल्याचा कांगावा वस्तुस्थितीला धरून नसल्याचे राज्यमंत्री दानवे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, शहराध्यक्ष सिध्दीविनायक मुळे, अशोक पांगारकर आदींची उपस्थिती होती. 

सत्तारांशी वैयक्तिक मैत्री; आमच्यात राजकीय मैत्री नाही
सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे आपले वैयक्तिक मित्र आहेत. मात्र आमच्यात राजकीय मैत्री नाही, असे दानवे म्हणाले. शिवाय सत्तार यांच्या भाजप प्रवेशाविषयी त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. बदनापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे, यासंदर्भात दानवे यांना विचारले असता बदनापूरची जागा भाजपच लढवेल, असे त्यांनी ठामपमणे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...