आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेला भाजपकडून राष्ट्रीय समाज पक्षाला हव्यात 52 जागा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडे ५२ जागांची मागणी केली आहे.  २५ आॅगस्ट राेजी मुंबईत ‘रासप’ने वर्धानपदिन निमित्त महामेळावा आयोजित केला आहे. मेळाव्याची जोरात तयारी  सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य निमंत्रित आहेत. धनगर समाजाला राज्य सरकारने आदिवासी उपाययोजनेप्रमाणे विविध २२ योजना दिल्याबद्दल फडणवीस यांचा मेळाव्यात सत्कार करण्यात येणार आहे. महामेळाव्याच्या निमित्ताने महोदव जानकर पक्षाचे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यासाठी राज्यभरातून दोन ते तीन लाख कार्यकर्ते मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आणण्याचे नियोजन आहे. ज्या मतदारसंघात भाजप आमदार नाही, भाजप उमेदवाराने कधी विजयी मिळवलेला नाही, असे १०० मतदारसंघ ‘रासप’ने निवडले आहेत. या मतदारसंघांत पक्षाने काम सुरू केले आहे. त्यातील ५२ मतदारसंघ आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळावेत, असे पत्र प्रदेश भाजपला दिल्याचे ‘रासप’चे महासचिव व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी- मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने रासपला ५ जागा दिल्या होत्या. त्यातील दौंडची जागा रासपने जिंकली होती. तसेच पक्षाध्यक्ष महादेव जानकर दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चिन्हाच्या हट्टाग्रहामुळे रासपने बारामती जागा देऊ केली असतानाही निवडणूक लढवली नव्हती. कमळ चिन्हावर रासप उमेदवार निवडणूक लढवणार नाहीत. जानकर यांची भूमिका कायम आहे, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. रासप यंदा १६ व्या वर्षात पदार्पण करत असून पक्षाचा वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम २९ आॅगस्ट रोजी आग्रा येथे होईल. त्यानिमित्त मुंबईत महामेळावा होणार आहे.

प्रा. शिंदे, पडळकर जानकरांमध्ये चुरस 
धनगर समाजाचा नेता म्हणून भाजप मंत्री राम शिंदे पुढे येत आहेत. तिकडे बहुजन वंचित आघाडीत गोपीचंद पडळकर हे युवा नेतृत्व पुढे येत आहे, तर रासपच्या माध्यमातून महादेव जानकर प्रयत्नशील आहेत. एकूण विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाचे नेतृत्व कुणाच्या हाती असणार, अशी चुरस तिघा नेत्यांमध्ये आहे.

बातम्या आणखी आहेत...