आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MahaElection: Sangita Thombre Namita Mundada Again Face To Face Kej Assembly Election

MahaElection : ठोंबरे-मुंदडाच पुन्हा आमने-सामने, राष्ट्रवादीचे साठे वंचितकडून इच्छुक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज  - सलग ५ टर्म केजची आमदारकी व मंत्रिपद भूषवणाऱ्या विमल मुंदडा यांचे केज मतदारसंघावर एकहाती वर्चस्व हाेते. त्यांच्या निधनानंतर २०१२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही पृथ्वीराज साठे यांच्या रूपाने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिली. मात्र नंतर दाेन वर्षांनी २०१४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या संगीता ठोंबरे यांनी विमलताईंच्या स्नुषा व राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांचा ४२ हजार मतांनी पराभव केला. खरे तर विमलताईही सुरुवातीला भाजपच्याच आमदार हाेत्या, मात्र नंतर त्यांनी पक्षांतर केल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे गेली. मात्र गेल्या निवडणुकीत भाजपने पुन्हा हा मतदारसंघ खेचून आणला. गेल्या पाच वर्षांत भाजपने जिल्हा परिषद गट, पंचायत समिती, बहुतांश ग्रामपंचायतीतही सत्ता मिळवली. यंदाही ठाेंबरे विरुद्ध मुंदडा असाच सामना रंगण्याची चिन्हे आहेत. माजी आमदार पृथ्वीराज साठे आता वंचित आघाडीकडून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीचे नेते रमेश आडसकर यांचेही या मतदारसंघात चांगले वर्चस्व हाेते. पंकजा मुंडे यांनी त्यांना भाजपत आणले. त्यांच्या मदतीने भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगले बळ मिळाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग साेनवणे हे स्थानिक असूनही केज मतदारसंघातून भाजपच्या प्रीतम मुंडे यांना २० हजारांचे मताधिक्य मिळाले. यावरून भाजपचा प्रभाव दिसून येताे. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या डॉ. अंजली घाडगे भाजपमध्ये येऊन तिकीट मिळवण्याच्या तयारीत आहेत. २०१४ मध्ये काँग्रेसच्या उमेदवार असताना त्यांनी २३ हजार मते घेतली हाेती. 
 

हे असू शकतात संभाव्य उमेदवार 
भाजपकडून विद्यमान आमदार प्रा. संगीता ठोंबरे व राष्ट्रवादीकडून नमिता मुंदडा यांना पुन्हा संधी मिळणार आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, पत्रकार वैभव स्वामी हे बहुजन वंचित आघाडीकडून लढण्याची तयारी करीत आहेत. याशिवाय डॉ. अंजली घाडगे या भाजपकडून, तर शिवसेनेकडून अॅड. विशाल ढोबळे हे इच्छुक आहेत. 
 

या आहेत मतदारसंघातील समस्या
केजला अद्यापपर्यंत एमआयडीसीची उभारणी झालेली नाही. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न माेठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. एसटी महामंडळाच्या आगारासाठी जागा उपलब्ध असतानाही आगार सुरू नाही. उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने गंभीर रुग्णांना उपचारासाठी थेट अंबाजोगाई, लातूरचे रुग्णालय गाठावे लागते. क्रीडांगण, व्यापारी संकुलासह सिंचनाच्या समस्या सुटलेल्या नाहीत.
 

२०१४ मधील विधानसभेची स्थिती
संगीता ठोंबरे :   भाजप     १,०६,८३४ 
नमिता मुंदडा :     राष्ट्रवादी    ६४,११३
अंजली घाडगे :    काँग्रेस    २३,०११ 
कल्पना नरहिरे :       शिवसेना      ८,४६६ 
 

बातम्या आणखी आहेत...