MahaElection / MahaElection: शिवेंद्रराजे भोसले, पिचड पिता-पुत्रांसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 4 आमदारांनी केला भाजपात प्रवेश

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार 
 

दिव्य मराठी वेब

Jul 31,2019 03:06:16 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील नेत्यांचा शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश सुरु आहे. यामुळे भाजपमध्ये एक प्रकारची मेगा भरतीच सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 4 आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. मुंबईतील गरवारे क्लब हाऊसमध्ये हा भाजप प्रवेश सोहळा पार पडला.

शरद पवारांचे कट्टर समर्थक तसेच राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड, त्यांचे सुपुत्र वैभव पिचड, मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर, नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक, साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ हे आज भाजपात दाखल झाले.

मुंबईतील गरवारे क्लब हाऊसमध्ये भाजपची मेगाभरती होत आहे. इथेच भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील भाजपात प्रवेश केला होता. भाजपात प्रवेश करत असलेल्या या चारही आमदारांनी कालच विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला.


कोण काय म्हणाले -

भाजपचे विकासाला प्राधान्य आहे. ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, पक्ष त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे – सुधीर मुनगंटीवार


माझं वय 79 आहे. आज काही मागणार नाही. हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा केवळ एकच इच्छा आहे. देश ज्या दिशेने जातोय, त्या दिशेने जावे ही कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळेच आज भाजपमध्ये आलोय. – मधुकर पिचड


मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या प्रवेशाने मोठी खळबळ उडाली होती. एका नेत्यांनी आरोप केला त्यांना ईडीची धास्ती दाखवली जात आहे. पण भुजबळ, गणेश नाईकांना कसली धास्ती दाखवली होती? तुम्ही केले ते योग्य, आम्ही केले तर चुकीचे कसे? घरात मुलगा लग्न झाल्यावर बाहेर पडतो कारण त्याला पुढचे आयुष्य दिसतं. तशीच या लोकांची परिस्थिती आहे
- चंद्रकांत पाटील

X
COMMENT