आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MahaElection: The Current Debate Is That Abdul Sattar Will Fight From Which Party

MahaElection : अब्दुल सत्तार काेणाकडून लढणार याचीच सध्या चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड (जि. औरंगाबाद) - यंदा लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघांतून सर्वाधिक मताधिक्य मिळाले. यात सिल्लाेड येथील  आमदार अब्दुल सत्तार यांचा ‘हात’भार लागल्याचे म्हटले जाते. सत्तार यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसला झुलवत ठेवत शेवटी राजीनामा दिला. यामुळे काँग्रेस अडचणीत आली तर भाजपचा फायदा झाला. परंतु आता भाजपमध्येही प्रवेश नाही आणि काँग्रेसही सोडलेले सत्तारही अडचणीत सापडले आहेत. यामुळे त्यांना यंदा विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवावी लागू शकते. तथापि, असे झाल्यास काँग्रेस-भाजप या दोन्ही पक्षांच्या मतांचे विभाजन होऊ शकते. त्याचा फायदा सत्तार यांनाच होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात सत्तारविरुद्ध भाजप असाच सामना राहिला आहे. येथे राष्ट्रवादी वा वंचितचा फारसा प्रभाव नव्हता. यावेळी मात्र विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्तारांची भाजप वरिष्ठ नेतृत्वाशी सलगी असली तरी स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध अाहे. यामुळे ते भाजपत जाणार की भाजपच्याच निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणार हे गुलदस्त्यात आहे. माजी जि. प. अध्यक्ष प्रभाकर पालोदकर हे काँग्रेसकडून इच्छूक आहेत. त्यांना उमेदवारी मिळाल्यास भाजप-काँग्रेस-अब्दुल सत्तार असा तिरंगी सामना पाहावयास मिळू शकतो. सत्तार भाजपत गेल्यास भाजपचे निष्ठावंत नेते दुखावून आपली मते काही प्रमाणात काँग्रेसकडे किंवा युती न झाल्यास शिवसेनेकडे वळवू शकतात. काँग्रेसमध्ये असताना सत्तारांनी आपली व्होटबँक तयार केलेली आहे. अपक्ष म्हणून लढताना ही व्होटबँक त्यांना फायद्याची ठरू शकते.
 

हे असू शकतात संभाव्य उमेदवार 
अब्दुल सत्तार निवडणूक लढवणार हे तर निश्चित आहे. कोणत्या पक्षाच्या चिन्हावर की अपक्ष हे मात्र स्पष्ट नाही. भाजपकडून सुरेश बनकर, सांडू पाटील लोखंडे, ज्ञानेश्वर मोठे व सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन इद्रिस मुलतानी यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसमध्ये माजी जि. प. अध्यक्ष प्रभाकर पालोदकर, श्रीराम महाजन व विजय दौड यांची दावेदारी आहे. युती न झाल्यास शिवसेना ऐनवेळी अन्य पक्षातील नाराज उमेदवारास संधी देऊ शकते. वंचितकडून एमआयएमचे तालुका अध्यक्ष बनेखाँ पठाण लढू शकतात.
 

या आहेत मतदारसंघातील समस्या
औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रखडल्याने वर्षभरापासून नागरिक त्रस्त आहेत. मोठा सिंचन प्रकल्प नसल्याने पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे या भागात फेब्रुवारीपासून पाणीटंचाई सुरू होते. पाणीपुरवठा योजनांची कामे होऊनही त्या योग्य प्रकारे कार्यान्वित नसल्याने निम्म्या तालुक्यात कायम टँकरची मागणी असते. विकासकामांसाठी निधी मंजूर असूनही वेळेत कामे पूर्ण न होणे ही एक मोठी समस्या आहे.
 

असा आहे सिल्लाेड-साेयगाव मतदारसंघ
एकूण मतदार : ३ लाख १७,२१६
पुरुष :१,६९,०४५
महिला : १,४८,१७१
 

२०१४ मधील विधानसभेची स्थिती
अब्दुल सत्तार :  काँग्रेस     ९६,०३८ 
सुरेश बनकर  :  भाजप     ८२,११७
सुनील मिरकर  :  शिवसेना     १५,९०९
दीपाली काळे   : मनसे     ३,४६५
 

२०१९ : लोकसभेत कुणाची सरशी
भाजप  : १ लाख २४,८१३
काँग्रेस : ४४ हजार ९८८

बातम्या आणखी आहेत...