MahaElection / पक्षांतराची लाट : उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कारभाऱ्यांविना; विधानसभेत काय होणार? कार्यकर्ते अस्वस्थ

दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांचे पक्षांतर, राष्ट्रवादीत अनेक इच्छुक, काँग्रेसला नेत्याची प्रतीक्षा

प्रतिनिधी

Sep 06,2019 07:56:00 AM IST

उस्मानाबाद - पक्षांतराच्या लाटेमध्ये जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका बसला असून, दोन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष आठवड्यातच पक्षातून बाहेर पडल्याने सध्या दोन्ही पक्षाला जिल्हाध्यक्ष नाहीत. जिल्ह्यातील बहुतांश सहकारी संस्था, स्थानिक संस्था आणि ग्रामपंचायती, सोसायट्या ताब्यात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मिळण्यासाठी चढाओढ दिसत असली तरी काँग्रेसकडे अजून तशी स्पर्धा लागलेली दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्हाध्यक्षपद कोणाला, यावरच जिल्ह्याचे राजकारण अवलंबून आहे.


शिवसेना-भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतच असून, चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन दिवसानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे यांनीही शिवसेनेत प्रवेश करून राजकीय खळबळ उडवून दिली. त्यानंतर दोन्ही राजकीय पक्षांना दणका बसल्याचे मानले जात असले तरी या नेत्यांसोबत नेमका कोणी पक्ष सोडला, आणखी कोण-कोण बाहेर आहे, याबाबतचा खुलासा होऊ शकलेला नाही. मात्र, दोन्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षांतर केल्यामुळे राजकीय उलथापालथ नक्कीच होणार हे निश्चित. या पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकारी मात्र आपली भूमिका ठरवण्याच्या मानसिकेत दिसत आहेत.


आमदार राणा पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कळंब-तुळजापूर नगर परिषद, अशा प्रमुख संस्था होत्या. मात्र, या संस्था आता नेमक्या कोणाच्या ताब्यात आहेत, राजकीयदृष्ट्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी कोणाला स्वीकारले, याचा अंदाज अजूनही आलेला नाही. तुळजापूर नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र आम्ही भाजपमध्ये दाखल झालोय, असे स्पष्ट केले असले तरी अन्य संस्थांबाबत अजूनही संभ्रम आहे.


पक्षाचे जिल्हाध्यक्षपद रिक्त असल्याने इच्छुक नेत्यांनी पक्षनेतृत्वाच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. पक्षासाठी आजवर केलेली कामे आणि पुढील प्लॅनिंग घेऊन अनेक इच्छुक श्रेष्ठींकडे आपली ताकद वापरत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभारी कोण असेल, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्येही प्रचंड अस्वस्थता आहे. जिल्हाध्यक्ष चेडे पक्ष सोडून गेल्याने अनेक पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करून पक्षांतराचा मार्ग अवलंबला आहे.


पक्षामध्ये गटबाजी वाढलेली असून, या प्रकारामुळे नवीन प्रवेशही होत नसल्याने काँग्रेसचे काय होणार, असा प्रश्न आहे. उमरगा-तुळजापूर या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसचे प्राबल्य असून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची रणनीती काय असेल, या अनुषंगानेही चर्चा सुरू आहेत. एकंदर जिल्ह्यात प्रमुख संस्था आणि विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व असलेल्या दोन्ही काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे तसेच नेत्यांचे पक्षांतर झाल्याने येणाऱ्या काळात शिवसेना-भाजपला विरोधक कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात निवडणूक तयारी :
विधानसभा निवडणुकीची धांदल काही दिवसांत सुरू होऊ शकते. १२ ते १५ सप्टेंबरदरम्यान विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असल्याने राजकीय गोटात खलबते सुरू झाली आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादीची महाआघाडी तर विराेधात महायुती, असे एरव्ही चित्र दिसत असले तरी जिल्ह्यात सध्या तरी विरोधकांमध्ये ताळमेळ दिसत नाही. दुसरीकडे महायुती होण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज बांधून भाजप - सेनेतील इच्छुक कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीमधील मोठा गट बाहेर पडल्याने कुणाला नेतेपदासाठी तर कुणाला विधानसभेच्या उमेदवारीची संधीही मिळणार आहे.

X
COMMENT